SPPU News – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील दिरंगाई आणि पुनर्मूल्यांकनासाठी लागणारा प्रदीर्घ वेळ आता लवकरच इतिहासजमा होणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून रेंगाळलेली ‘ऑनस्क्रीन मूल्यांकन’ पद्धत विद्यापीठ प्रशासनाने पुन्हा एकदा अजेंड्यावर घेतली असून, लवकरच प्रायोगिक तत्त्वावर याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचणार असून, निकाल प्रक्रियेत पारदर्शकता येणार आहे. विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय अधिसभेच्या दुसऱ्या दिवशी पुनर्मूल्यांकनाच्या मुद्द्यावरून प्रशासनाला सदस्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. अधिसभा सदस्य ईशानी जोशी यांनी उत्तरपत्रिकांच्या फेरतपासणीला होणाऱ्या विलंबामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात येत असल्याचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी कबुली दिली की, वाढती स्वायत्त महाविद्यालये आणि शिक्षकांच्या उपलब्धतेअभावी पुनर्मूल्यांकन प्रक्रिया कठीण झाली आहे. ही मनुष्यबळाची मर्यादा लक्षात घेऊन आता तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या नव्या आराखड्यानुसार परीक्षेनंतर उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करून त्या ‘क्लाउड’वर जतन केल्या जातील. विद्यार्थ्यांनी मागणी केल्यास त्यांना घरबसल्या ऑनलाइन उत्तरपत्रिका सहज उपलब्ध करून देणे शक्य होईल. डॉ. सुरेश गोसावी यामुळे पुनर्मूल्यांकन प्रक्रिया अधिक वेगवान होणार आहे. सुरुवातीला काही ठराविक विभाग आणि विद्याशाखांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हे ऑनस्क्रीन मूल्यांकन राबविण्याचे नियोजन प्रशासनाने केले असून, त्याबाबतच्या प्राथमिक बैठका पार पडल्या आहेत. दुसरीकडे, अधिसभा सदस्य डॉ. अपर्णा लळिंगकर यांनी विद्यापीठाच्या ‘ॲक्सेसॅब्लिटी ऑडिट’बाबत प्रशासनाला धारेवर धरले. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनांनुसार अध्ययन स्रोत दिव्यांगांसाठी सुलभ नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर प्रशासनाने स्पष्ट केले की, १७ फेब्रुवारी २०२३ च्या तपासणीनंतर आता नवीन संकेतस्थळ विकसित केले असून, ते लवकरच कार्यान्वित होईल. दरम्यान, अधिसभेत सदस्यांच्या प्रश्नांना योग्य पद्धतीने उत्तरे दिली जात नसल्याने गोंधळ निर्माण झाला होता, अखेर सदस्यांच्या तीव्र नाराजीनंतर कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी सभागृहाची दिलगिरी व्यक्त केली. सागर वैद्य यांचे सभागृहाबाहेर उपोषण व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य यांनी अधिसभेच्या दुसऱ्या दिवशीचे कामकाज सुरू होताच कुलगुरूंच्या कार्यपद्धतीला विरोध दर्शवत सभागृहाबाहेर उपोषण सुरू केले. वैद्य म्हणाले, डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडून माझ्या कुटुंबियांची सोशल मिडियावर बदनामी करण्यात आली. त्यामुळे विद्यापीठाचे राज्यपाल यांनी कुलगुरूंचा राजीनामा घेऊन त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवत संपूर्ण प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी करावी, अशी मागणी वैद्य यांनी राज्यपालांना पाठविलेल्या पत्रात केली.