– संदीप बोरसे Editorial : महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 बाबत सुरू असलेली चर्चा ही केवळ कायद्याची (Editorial) किंवा राजकारणाची बाब नाही, तर ती भारतीय समाजाच्या मूलभूत रचनेला, वैयक्तिक स्वातंत्र्याला, सामाजिक विषमतेला आणि राज्याच्या भूमिकेला स्पर्श करणारी आहे. धर्म, ओळख आणि सत्ता यांचे परस्पर संबंध लक्षात घेतले, तर महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 या विधेयकाचे (Editorial) विश्लेषण करताना संतुलित आणि समालोचनात्मक दृष्टिकोन स्वीकारणे अत्यावश्यक ठरते. या विधेयकाचा मुख्य उद्देश जबरदस्ती, फसवणूक किंवा प्रलोभनाद्वारे होणारे धर्मांतर रोखणे हा सांगितला जातो. वरकरणी पाहता हा उद्देश लोकशाही मूल्यांशी सुसंगत वाटतो, कारण कोणत्याही व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर आघात होऊ नये, हे राज्याचे कर्तव्य आहे. मात्र, या उद्देशाच्या अंमलबजावणीतून निर्माण होणारे प्रश्न अधिक गुंतागुंतीचे आहेत. भारतीय समाजात धर्म हा केवळ श्रद्धेचा विषय नसून तो सामाजिक ओळख, सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक स्थानाशी घट्ट जोडलेला आहे. त्यामुळे धर्मांतर ही केवळ वैयक्तिक निवड नसून ती सामाजिक परिणाम घडवणारी प्रक्रिया आहे. इतिहासात पाहिले असता, अनेक वंचित समुदायांनी धर्मांतराचा वापर सामाजिक सन्मान, समानता आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी केला आहे. दलित आणि आदिवासी समाजासाठी धर्मांतर हे अनेकदा दडपशाहीतून मुक्त होण्याचे साधन ठरले आहे. Editorial याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 चा विचार केला तर समर्थकांचे म्हणणे असे आहे की काही ठिकाणी गरीब, आदिवासी किंवा सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आर्थिक किंवा सामाजिक प्रलोभने देऊन धर्मांतरास प्रवृत्त केले जाते. त्यामुळे त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर आघात होतो आणि अशा अनैतिक धर्मांतराला रोखण्यासाठी कायदेशीर चौकट आवश्यक आहे. त्यांच्या मते, हा कायदा व्यक्तीच्या स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यासाठी आहे. परंतु या भूमिकेच्या समोर विरोधक काही गंभीर प्रश्न उपस्थित करतात. प्रलोभन, जबरदस्ती आणि फसवणूक या संकल्पनांची व्याख्या अत्यंत अस्पष्ट आहे. उदाहरणार्थ, जर एखादी संस्था शिक्षण, आरोग्य सेवा किंवा आर्थिक मदत देत असेल आणि त्यातून काही लोक प्रभावित होऊन धर्म बदलत असतील, तर ते प्रलोभन ठरेल का? की ते सामाजिक सेवा मानायचे? या संकल्पनांची स्पष्ट व्याख्या नसल्यामुळे कायद्याच्या अंमलबजावणीत मनमानी होण्याची शक्यता वाढते. जेव्हा कायद्याच्या संकल्पना अस्पष्ट असतात, तेव्हा त्या सत्ताधार्यांच्या व्याख्यांवर अवलंबून राहतात. यामुळे कायदा संरक्षणाचे साधन न राहता नियंत्रणाचे साधन बनण्याचा धोका निर्माण होतो. या संदर्भात राज्यसत्तेची भूमिका अधिक स्पष्ट होते. सत्ता ही केवळ दडपशाहीद्वारे कार्यरत नसते, तर ती नियमन, नियंत्रण आणि निरीक्षणाद्वारेही कार्य करते. धर्मांतरविरोधी विधेयक हे अशा प्रकारच्या नियामक सत्तेचे उदाहरण ठरते. जेव्हा राज्य व्यक्तीच्या वैयक्तिक श्रद्धांवर आणि निवडीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करते, तेव्हा ते लोकशाहीतील मूलभूत स्वातंत्र्यावर परिणाम करणारे ठरू शकते. धर्मांतरविरोधी विधेयकाभोवती निर्माण होणारे सामाजिक वातावरणही महत्त्वाचे आहे. लव्ह जिहाद सारख्या संकल्पनांच्या माध्यमातून समाजात भीती आणि संशयाचे वातावरण तयार केले जाते. समाजशास्त्रात याला चेीरश्र झरपळल असे म्हटले जाते. एखाद्या मुद्द्याला अतिशयोक्तीपूर्ण स्वरूप देऊन समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण केली जाते. याचा परिणाम असा होतो की आंतरधर्मीय विवाह आणि नातेसंबंधांकडे संशयाने पाहिले जाते. ही परिस्थिती व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यावर सामाजिक आणि राजकीय नियंत्रण वाढवते. परिणामी, समाजात ध्रुवीकरण वाढते आणि सामाजिक सलोखा धोक्यात येतो.स्त्रियांच्या संदर्भात या विधेयकाचे विश्लेषण अधिक गुंतागुंतीचे ठरते. अनेकदा असे गृहीत धरले जाते की स्त्रियांना फसवून किंवा दबाव टाकून धर्मांतर केले जाते. त्यामुळे त्यांचे संरक्षण करण्यासाठी कायदे आवश्यक आहेत, असा युक्तिवाद केला जातो. परंतु हा दृष्टिकोन पितृसत्ताक आहे. तो स्त्रीला स्वतंत्र निर्णयक्षम व्यक्ती म्हणून न पाहता तिच्या निवडीवर संशय घेतो. आधुनिक समाजात स्त्री ही स्वायत्त आणि सक्षम व्यक्ती आहे. तिच्या निवडीचा आदर करणे आवश्यक आहे. अन्यथा, धर्मांतरविरोधी कायदे स्त्रियांच्या संरक्षणाच्या नावाखाली त्यांच्या स्वातंत्र्यावर मर्यादा आणणारे ठरू शकतात. कायद्याच्या अंमलबजावणीच्या संदर्भातही अनेक प्रश्न निर्माण होतात. धर्मांतरविरोधी कायद्याचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वैयक्तिकवाद, कौटुंबिक तणाव किंवा सामाजिक दबाव यामुळे खोटे आरोप लावले जाऊ शकतात. माध्यमांची भूमिकादेखील या संदर्भात महत्त्वाची ठरते. माध्यमे समाजातील विचारप्रवाह घडवतात. जरमाध्यमांनी या विषयाला सनसनाटी स्वरूप दिले, तर समाजात भीती आणि गोंधळ वाढतो. त्यामुळे या विषयावर संतुलित, तथ्याधारित आणि जबाबदारीने चर्चा होणे आवश्यक आहे. धर्मांतरविरोधी विधेयकाचा सामाजिक सलोख्यावर होणारा परिणामही गंभीर आहे. जर हा कायदा विशिष्ट समुदायांविरुद्ध वापरला गेला किंवा तसे भासवले गेले, तर समाजात अविश्वास निर्माण होतो. यामुळे सामाजिक विभाजन वाढते आणि समाजातील ऐक्य धोक्यात येते. तथापि, या विधेयकाच्या समर्थनार्थ दिले जाणारे मुद्दे पूर्णपणे नाकारता येत नाहीत. जबरदस्तीने किंवा फसवणुकीने धर्मांतर होणे ही गंभीर बाब आहे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. परंतु प्रश्न असा आहे की, या उद्देशासाठी तयार केलेले कायदे व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर किती मर्यादा आणतात. लोकशाही व्यवस्थेत व्यक्तीला स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार असतो. हा अधिकार तिच्या अंतःकरणाशी संबंधित असतो. त्यामुळे धर्मांतराचा प्रश्न हा अत्यंत संवेदनशील आहे आणि त्यावर नियंत्रण ठेवताना अत्यंत संतुलन राखणे आवश्यक आहे. धर्मांतराचा प्रश्न हा केवळ धार्मिक नसून सामाजिक, आर्थिक आणि राजकीय घटकांशीही जोडलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचे समाधान केवळ कायद्याद्वारे होऊ शकत नाही. सामाजिक विषमता, शिक्षणाचा अभाव, आर्थिक असुरक्षितता आणि सांस्कृतिक भेदभाव यांसारख्या मूलभूत समस्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अखेर, महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 हा केवळ कायद्याचा विषय नसून तो समाजातील मूल्यांचा, स्वातंत्र्याचा आणि सत्तासंबंधांचा प्रश्न आहे. एका बाजूला जबरदस्तीचे धर्मांतर रोखणे आवश्यक आहे, तर दुसर्या बाजूला व्यक्तीच्या निवडीचा आणि स्वातंत्र्याचा आदर राखणे तितकेच महत्त्वाचे आहे. समाज म्हणून आपण भीती आणि नियंत्रण यांवर आधारित व्यवस्था निर्माण करतो की स्वातंत्र्य, विश्वास आणि समानतेवर आधारित समाज उभारतो हा मूलभूत प्रश्न या विधेयकाच्या चर्चेतून पुढे येतो. म्हणूनच, याविषयावर विचार करताना केवळ कायद्याच्या (Editorial) चौकटीत न राहता व्यापक सामाजिक वास्तव, ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि लोकशाही मूल्यांचा विचार करणे आवश्यक आहे. संतुलित, संवेदनशील आणि विवेकी दृष्टिकोन स्वीकारणे हीच या चर्चेची खरी गरज आहे.