जोहान्सबर्ग – मिस्टर 360 नावाने जागतिक क्रिकेटमध्ये प्रसिद्ध असलेला दक्षिण आफ्रिकेचा अव्वल आक्रमक फलंदाज ए. बी. डिव्हिलिअर्स याने ऑस्ट्रेलियात होणार असलेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा परतण्याचे संकेत दिले आहेत.
त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून काही महिन्यांपूर्वी निवृत्ती घेतली होती तेव्हापासूनच त्याने चुकीचा निर्णय घेतल्याचे मत अनेक दिग्गज खेळाडूंनी व्यक्त केले होते. दक्षिण आफ्रिकेचे माजी कसोटीपटू व यष्टिरक्षक फलंदाज मार्क बाउचर यांनी त्याची भेट घेत त्याला अनेकदा या निर्णयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला होता. आता डिव्हिलिअर्सने पुनरागमन केले तर त्याचे श्रेय बाउचर यांनाच जाणार आहे.
आपला निवृत्तीचा निर्णय बदलून पुन्हा संघात परतणे मलाही आवडेलच मात्र, ही स्पर्धा करोनाच्या धोक्यामुळे पुढे ढकलण्यात आली तर मात्र त्यावेळी माझी तंदुरुस्ती कशी आहे त्यावर सर्व अवलंबून राहील, असे डिव्हिलिअर्सने स्पष्ट केले आहे.
मला कोणालाही आशेवर ठेवायचे नाही. करोनामुळे ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्षाने पुढे ढकलण्यात आली आहे. तशीच जर टी-20 विश्वकरंडक स्पर्धादेखील पुढे ढकलली गेली तर मात्र, त्यावेळी माझा सराव, तंदुरुस्ती व मानसिक तयारी कशी असेल त्यावर निर्णय घेईन, असेही त्याने सांगितले.