पुना क्‍लब आणि सनी इलेव्हन यांच्यात विजेतेपदासाठी लढत!!

एस. बालन आंतर क्‍लब अजिंक्‍यपद’ टी-20 क्रिकेट स्पर्धा

पुणे -पुना क्‍लब आणि सनी इलेव्हन या दोन संघांमध्ये येथे होत असलेल्या “एस. बालन करंडक आंतर क्‍लब अजिंक्‍यपद’ टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी लढत होणार आहे. शुभम कोठारी याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर सनी इलेव्हन संघाने पिल्सनर्स क्रिकेट क्‍लबचा 15 धावांनी पराभव करून अंतिम फेरी गाठली. पहिल्यांदा फलंदाजी करताना सनी इलेव्हन संघाने 20 षटकांत 9 गडी गमावून 157 धावा केल्या.

सनी संघाच्या कोणत्याही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. अविनाश शिंदे (38 धावा), योगेश चव्हाण (28), मंदार भंडारी (21) व किर्तीराज वाडेकर (24) यांच्या फलंदाजीमुळे संघाला दिडशे धावांचा टप्पा गाठता आला. सुदीप फाटक याने 31 धावांत 4 गडी बाद करून सनी इलेव्हन संघाला मोठी धावसंख्या उभी करण्यापासून रोखले.

या आव्हानाला उत्तर देताना पिल्सनर्स क्रिकेट क्‍लबचा डाव 20 षटकांत 6 गडी बाद 142 धावांवर मर्यादित राहीला. स्वप्निल कुलकर्णी (नाबाद 30), देवदत्त (22) व सिध्दांत गोडबोले (21) यांच्या छोट्या खेळी संघाचा पराभव वाचवू शकला नाही. सनी इलेव्हनच्या शुभम कोठारी याने 14 धावात 3 तर, अक्षय जाधव याने 25 धावात 2 मोहरे टिपत संघाचा विजय सोपा केला.

हृषीकेश मोटकरच्या नाबाद 104 धावांच्या खेळीच्या जोरावर पुना क्‍लब संघाने डेक्कन जिमखाना अ संघाचा 8 गडी राखून सहज पराभव करून अंतिम फेरी गाठली. डेक्कन जिमखाना अ संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 152 धावा केल्या. अभिषेक ताटे (55 धावा), हर्ष शहा (23) व गणेश महापुरे (22) यांच्या उपयुक्त खेळीमुळे डेक्कन संघाने दिडशे धावांचे आव्हान उभे केले.

पुना क्‍लब संघाने हे आव्हान 17.4 षटकात व 2 गडी गमावून पूर्ण केले. हृषीकेश मोटकर हा विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने पुना क्‍लबला एकहाती विजय मिळवून देताना 59 चेंडूत 9 चौकार व 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 104 धावांची खेळी केली. हृषीकेश याने दिपकच्या साथीत 46 चेंडूत नाबाद 84 धावांची भागिदारी करून संघाला विजय मिळवून दिला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.