राष्ट्रीय शिबिरासाठी पुण्याच्या तिघींची निवड

पुणे -कुमार गटाच्या मुलींच्या राष्ट्रीय हॉकी शिबिरासाठी पुण्याच्या अक्षता ढेकळे, वैष्णवी फाळके आणि ऋतुजा पिसाळ या तिघींची निवड करण्यात आली आहे. हे शिबिर साई’च्या बंगळूर येथील केंद्रावर 1 एप्रिलपासून सुरू होणार आहे.
राष्ट्रीय शिबिरासाठी प्रथमच पुण्याच्या तीन मुलींची एकाचवेळी निवड झाली आहे. महाराष्ट्राबरोबर पुण्यासाठी ही मोठी उपलब्धी आहे, असे हॉकी महाराष्ट्राचे सचिव मनोज भोरे यांनी सांगितले. ते म्हणाले,ही खरच मोठी उपलब्धी आहे.

पुण्यातील मुली आपल्या खेळाचा दर्जा उंचावत असल्याचे हे उदाहरण आहे. या तिघींच्या निवडीमुळे भविष्यात अन्य खेळाडूंनाही प्रेरणा मिळेल यात शंका नाही. या तिघींनी कुमार गटाच्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेतून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
ऋतुजा आणि अक्षता या दोघी साताऱ्याच्या असून, त्या क्रीडा प्रबोधिनीत मार्गदर्शन घेतात.

कुमार राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत या दोघींची महाराष्ट्र संघात निवड झाली होती. या स्पर्धेत महाराष्ट्राने अ विभागातून उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. महाराष्ट्राने या स्पर्धेत सहावे स्थान मिळविले होते. त्यापूर्वी ऋतुजाची युवा ऑलिंपिक स्पर्धेसाठी देखील संभाव्य संघात निवड झाली होती. मात्र, परिक्षेमुळे तीला या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर राष्ट्रीय हॉकी अकादमीच्या हॉलंड दौऱ्यासाठी तिची निवड झाली होती.

पुण्याची 15 वर्षीय वैष्णवी या तिघींत सर्वांत लहान खेळाडू आहे. तिची देखील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. तिने या स्पर्धेत दोन गोल केले. सध्या ती राष्ट्रीय अकादमीत प्रशिक्षण घेत आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी अक्षता महाराष्ट्राची कर्णधार होती. अक्षता आणि ऋतुजा यांनी स्पर्धेत प्रत्येकी तीन गोल केले. महाराष्ट्राच्या स्पर्धेतील एकूण 13 गोलपैकी अक्षता, ऋतुजा आणि वैष्णवी यांचा 8 गोलचा वाटा होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.