पुणे -राज्यातील विविध विभागाचे मंत्री तसेच अधिकारी, आयुक्त, सहआयुक्त, प्रधान सचिव, उपसचिव अशा ‘सरकारी’ मंडळींचा विदेश दौरा सुरू झाला आहे. शालेय शिक्षणमंत्र्यांसह राज्य प्रकल्प संचालक हे लंडन येथील जागतिक शिक्षण मंचच्या कार्यक्रमासाठी 7 ते 13 मे या कालावधीसाठी दौऱ्यावर गेलेले असताना आता क्रीडा मंत्री, आयुक्त, प्रधान सचिव, उपसचिव हे ही जर्मनी, स्वित्झर्लंड या परदेश दौऱ्यावर 18 ते 26 मे असे एकूण 9 दिवसांसाठी जाणार आहेत. याचा संपूर्ण खर्च शालेय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत असलेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनामार्फत केला जाणार आहे.
राज्यात फुटबॉल खेळाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न आहेत. यासाठी शासनाच्या क्रीडा विभागाने जर्मनीतील म्युनिस येथील फुटबॉल क्लब बायर्न या जगप्रसिद्ध व फुटबॉल स्पर्धेत अत्यंत यशस्वी ठरलेल्या संस्थेसोबत फुटबॉल या खेळाच्या प्रशिक्षण व विकासाच्या अनुषंगाने सहकार्य करार केलेला आहे. यासाठी राज्यातील 14 वर्षांखालील 20 खेळाडू, क्रीडा मागदर्शक, व्यवस्थापक यांना फुटबॉल खेळाच्या अद्ययावत प्रशिक्षणासाठी थेट जर्मनीलाही पाठविण्यात येणार आहे.
तत्पूर्वी जर्मनीतील संस्थेची पाहणी व अभ्यास करण्यासाठी क्रीडा मंत्री व अन्य संबंधित अधिकारी जर्मनीच्या दौऱ्यावर निघाले आहेत. याबरोबरच स्वित्झर्लंडमधील लॉसने येथील इटंरनॅशनल अकॅडमी ऑफ स्पोर्टस सायन्य ऍन्ड टेक्नॉलॉजीचे कार्यकारी संचालक डॉ. क्लाउंडे स्ट्रीकर यांनीही आमंत्रित केले आहे. स्वित्झर्लंडच्या आंतरराष्ट्रीय दर्जाचा क्रीडा विषयक अभ्यासक्रम, प्रशिक्षणाचा लाभ ऑनलाइन राज्यातील खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडा शिक्षकांना देण्याबाबत करार करण्याचेही प्रस्तावित आहे.