Wagholi News : “क्लीन वाघोली, ग्रीन वाघोली” अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

वाघोली : वाघोली परिसरातील अस्वच्छता, दुर्गंधी, कचऱ्याचे अव्यवस्थापन आणि त्यामुळे पसरणारे साथीचे विविध आजार यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. पुणे महानगरपालिकेवर सध्या प्रशासन बसलेले असल्याने आणि लोकप्रतिनिधी नसल्याने वाघोलीकरांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आले. या सर्व अडचणी लक्षात घेऊन, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदिप सातव आणि रत्नदीप सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा रत्नमाला संदिप सातव यांनी “क्लीन वाघोली, ग्रीन वाघोली” ही मोहीम हाती घेतली आहे.
मोहिमअंतर्गत अंतर्गत, वाघोलीतील विविध परिसरात “क्लीन वाघोली, ग्रीन वाघोली” अभियान राबवले जात आहे. या अभियानात परिसराची स्वच्छता करणे, कचरा गोळा करणे व त्याची योग्य विल्हेवाट लावणे, परिसराचे सौंदर्य वाढवणे, तसेच स्वच्छ व निरोगी वातावरणाबद्दल जनजागृती करणे असे विविध उपक्रम समाविष्ट आहेत.
रत्नदीप सोशल फाउंडेशन आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी कोणार्क ऑर्चिड, पाल्म नेस्ट बंगलो, अरोरा बंगलो, ब्लॉसम, अर्बनो, चैतन्य टेक्नो स्कूल या सोसायटी परिसरात “क्लीन वाघोली, ग्रीन वाघोली” अभियानाची अंमलबजावणी करण्यात आली. या अभियानाबद्दल वाघोलीतील नागरिकांमध्ये एवढे कुतूहल निर्माण झाले की, जवळपास 250-300 नागरिक उत्स्फूर्तपणे या अभियानात सहभागी झाले होते. प्रशासकीय स्तरावर देखील या उपक्रमाचे कौतुक होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
या वेळी नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्रीमती सुषमा मुंडे, आरोग्य निरीक्षक संजय भुसारे, मुकादम अजय थोरात ,दिपक वाघमारे, सहमुकादम प्रशांत कुंभार, अनिल राठोड तसेच सर्व कर्मचारी व ड्रायव्हर, सेवक तसेच शाळेचे शिक्षक, पदाधिकारी आदी मान्यवरांचे “क्लीन वाघोली ग्रीन वाघोली” या मोहिमेला विशेष सहकार्य लाभले.
“रत्नमाला सातव आणि संदिप सातव यांनी ‘क्लीन वाघोली, ग्रीन वाघोली’ या अभियानाची सुरुवात केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. या अभियानामुळे ‘आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवणे हे आपले कर्तव्य आहे’ अशी भावना सर्व नागरिकांमध्ये तयार होत आहे.”
कणिक पांडा (नागरिक)“प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी साहेबांच्या स्वच्छ भारत अभियानाच्या संकल्पनेतून प्रेरित होऊन, वाघोलीत ‘क्लीन वाघोली, ग्रीन वाघोली’ या उपक्रमाची सुरुवात आम्ही केली आहे. यामध्ये नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला असून, स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. या उपक्रमामुळे वाघोली परिसर अधिक स्वच्छ आणि सुंदर बनत आहे. नागरिकांचा सहभाग हे या उपक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.”
संदिप सातव (पुणे जिल्हाध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा)





