सुरेंद्र पठारे फाऊंडेशन आयोजित खेळ मंगळागौरीचा उत्सवाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

विश्रांतवाडी । झिम्मा फुगडी घालत, फेर धरत तसेच इतर पारंपरिक खेळ खेळत व गाणी म्हणत सुरेंद्र पठारे फाऊंडेशन आयोजित ‘खेळ मंगळागौरीचा’ उत्सव पार पडला. येरवडा येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिरमध्ये आयोजन करण्यात आले होते. उत्सवात एकूण १५७२ महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत मंगळागौर साजरी केली.
महिला भगिनींच्या आयुष्यातील आनंदाचा ठेवा म्हणून मंगळागौरीकडे पाहिले जाते. श्रावण महिन्यात साजऱ्या होणाऱ्या मंगळागौरीचे महिलांच्या भावविश्वात विशेष स्थान आहे. मंगळागौरीची समृद्ध परंपरा जपण्याचा व नव्या पिढीपर्यंत पोहचवण्याचा उद्देश आयोजनामागे होता. यावेळी वडगावशेरी मतदारसंघाचे प्रथम आमदार बापूसाहेब पठारे व माजी नगरसेविका संजीला पठारे उपस्थित होत्या.
महिलांच्या विविध ग्रुपने पारंपरिक वेशभुषेत मंगळागौरीच्या विविध खेळ अतिशय सुंदर पद्धतीने सादर केले. लहान मुलींपासून ते ज्येष्ठ महिलाचाही यात उत्स्फूर्त सहभाग होता. सर्व सादरीकरणातून मंगळागौरीच्या सण-संस्कृतीचा अनोखा अनुभव उपस्थित महिलांनी घेतला. यासोबतच, विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. प्रांजली सोनवणे (साहाय्यक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग), पल्लवी मेहेर (पोलीस निरीक्षक गुन्हे, येरवडा पोलीस), कांचन जाधव (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन), ज्योती मीना (महिला व सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ), संगिता जाधव (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ‘भरोसा सेल’ पुणे शहर गुन्हे शाखा) या पोलिस खात्यातील महिला अधिकाऱ्यांचा तसेच, सोनाली निकम (व्यवस्थापकीय संचालक, हेस्प्रो स्पोर्ट्स) यांचा यात समावेश होता. बापूसाहेब पठारे व माजी नगरसेविका संजीला पठारे यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.
“खेळ मंगळागौरीचा या उत्सवाच्या माध्यमातून आपली समृद्ध परंपरा जपण्याचा चांगला उपक्रम सुरेंद्र पठारे फाऊंडेशनने केला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात आपली मंगळागौरीसारखी संस्कृती-परंपरा विसरत चाललो आहोत की काय, असे वाटत असताना हा उत्सव पाहून नक्कीच नवी आशा मिळाली.
जमलेल्या माता-भगिनींचा उत्साह पाहून दरवर्षी हा उत्सव चालू राहील ही खात्री आहे”, असे म्हणत माजी नगरसेविका संजीला पठारे यांनी कौतुक केले. बापूसाहेब पठारे यांनीदेखील शुभेच्छा व्यक्त करत, आपली समृद्ध परंपरा पुढे नेण्याच्या दृष्टीने या उत्सवाचे आयोजन फार महत्त्वाचे असल्याचे म्हटले.









