पोलीस आयुक्त सत्ताधाऱ्यांचे प्रवक्ते!
दत्ता साने यांचा आरोप : “संवाद’ कार्यक्रमातून उमेदवाराचा प्रचार
पिंपरी – स्वतंत्र पोलीस आयुक्तालय होऊनही पिंपरी-चिंचवड शहर हे गुन्हेगारांचे आगार झाले आहे. ज्यांच्या बगलबच्च्यांमुळे गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात वाढली तेच लोक नागरिकांना सुरक्षेची हमी देत फिरत आहेत.
कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कडक योजना करण्याचे सोडून पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते म्हणून उमेदवारांचा प्रचार करत असल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी सोसायट्यांसोबत काल (रविवारी) पोलीस आयुक्तांच्या संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
दत्ता साने यांनी पत्रकारांशी बोलताना या कार्यक्रमावर टीकेची झोड उठविली. ते म्हणाले की, ज्यांनी आपले कार्यकर्ते गोरगरीब दुकानदारांपासून मोठ्या ठेकेदारांकडून हप्ते घेत फिरवले आणि जगवले. त्यांनी गुन्हेगारी नष्ट करण्यावर बोलावे, हे म्हणजे उंदराला मांजर साक्ष असल्यासारखे झाले. निवडणुका जवळ आल्या म्हणून स्वतःची गुन्हेगारी पार्श्वभूमी लपवत शांतीदूताचा अवतार घेत फिरणाऱ्या आमदारांनी कितीही झाकल तरी त्यांची कर्म लपणार नाहीत.
आगामी निवडणुकीत आमदाराला पराभूत करुन भोसरीतील नागरिकांना दहशतमुक्त करणार आहोत. गेल्या वर्षभरात शहरात 12 हजाराच्यावर गुन्हे घडले. 69 खून, 83 खुनाचे प्रयत्न, 32 दरोडे, 355 जबरी चोरी, 118 बलात्कार, 469 विनयभंग एवढे गुन्हे घडले. सरासरी महिन्याला 6 खून शहरात पडत असल्याचा आरोपही साने यांनी केला.





