शिवसंग्राम संघटनेत फूट; अध्यक्ष तानाजीराव शिंदे नवीन संघटना काढणार

बीड : आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर असतांना दिवंगत विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम संघटनेत फूट पडली आहे. शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष असलेले तानाजीराव शिंदे हे संघटनेतून बाहेर पडले आहेत. त्याचबरोबर त्यांच्यासोबत संघटनेतील हजारो कार्यकर्ते देखील तानाजी शिंदे यांच्यासोबत जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. तसेच, तानाजी शिंदे हे स्वतःची संघटना काढणार असल्याचे समजते.
तानाजीराव शिंदे हे रायगड किल्ल्यावर जाऊन आपल्या कार्यकर्त्यांसह शिवरायांचे दर्शन घेणार आहेत. त्यावेळी ते नवीन संघटनेची घोषणादेखील करणार आहेत. शिवसंग्राममध्ये ज्योती मेटे यांच्या एकाधिकारशाहीमुळे संघटनेतील अनेक पदाधिकारी बाहेर पडण्याच्या मार्गावर असल्याची माहिती आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्याआधी शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्षा ज्योती मेटे यांना मोठा धक्का बसला आहे.
विधानसभा निवडणूक लढवणार- ज्योती मेटे
यावर ज्योती मेटे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी मी मतदार संघात फिरत आहे. शिवसंग्राम विधानसभा निवडणूक लढविणार आहे. कोणाच्या व्यासपीठावर निवडणूक लढविणार हे अद्याप ठरलेले नाही. शिवसंग्राम हा वेगळा पक्ष आहे. राज्यात कोणत्याही पक्षाची भूमिका स्पष्ट नाही. त्यामुळे आम्हीही त्याचवेळी भूमिका स्पष्ट करू.
बीडसह पाच विधानसभा जागेवर आम्ही निवडणूक लढणार आहे. तशी आमची प्राथमिक चाचपणी झाली आहे. मराठवाडा विदर्भ आणि कोकणात तयारी पूर्ण झाली आहे. आता आमचे लक्ष पुणे आहे. मनोज जरांगे यांना आमचे शिष्टमंडळ भेटून आले आहे. त्यांनी राजकीय भूमिका स्पष्ट केल्यास आम्ही त्यांच्याकडे दावेदारी करू, असे ज्योती मेटे यांनी म्हटले आहे.





