उड्डाणादरम्यान स्पाइसजेटच्या विमानाचे चाक पडले; मुंबईत आपत्कालीन लँडिंग

मुंबई – कांडला (गुजरात) येथून मुंबईकडे येणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाचे उड्डाणानंतर काही क्षणातच पुढील बाह्य चाक खाली पडल्याने मुंबई विमानतळावर शुक्रवारी दुपारी आपत्कालीन परिस्थिती जाहीर करण्यात आली होती. मात्र, विमानाने सुरक्षित लँडिंग करत सर्व ७८ प्रवाशांची सुटका झाली.
स्पाइसजेटचे बॉम्बार्डियर DHC8-400 (Q400) हे विमान (फ्लाईट क्र. SG-2906) शुक्रवारी दुपारी २.३९ वाजता कांडला विमानतळावरून उड्डाण केले. टेकऑफनंतर कंट्रोल टॉवर अधिकाऱ्यांनी रनवेवर काळ्या रंगाचा मोठी वस्तू पडल्याचे पाहिले. तपासणीदरम्यान ती वस्तू विमानाचे चाक असल्याचे निष्पन्न झाले.
याबाबत मुंबई विमानतळ प्रशासनाला कळविण्यात आल्यानंतर दुपारी ३.५१ वाजता विमान मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. सावधगिरीचा उपाय म्हणून पूर्ण आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली होती. मात्र, पायलटच्या कौशल्यामुळे विमानाने रनवे क्रमांक २७ वर सुखरूप लँडिंग केले. विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित उतरले.
स्पाइसजेटच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “१२ सप्टेंबर रोजी कांडला-मुंबई या मार्गावरील Q400 विमानाचे एक बाह्य चाक उड्डाणानंतर रनवेवर आढळले. विमानाने आपला प्रवास पुढे चालू ठेवत सुरक्षितरीत्या मुंबईत लँडिंग केले. सर्व प्रवासी व्यवस्थित उतरले आहेत.”





