दिल्ली विमानतळावरून उड्डाण करण्यापूर्वी स्पाइसजेटचे विमान धडकले खांबाला

नवी दिल्ली – स्पाईस जेट कंपनीचे प्रवासी विमान एका विजेच्या खांबाला धडकल्याचा प्रकार आज दिल्ली विमानतळावर घडला. जम्मूसाठीच्या प्रवासासाठी विमान पार्किंगच्या क्षेत्रापासून बाहेर काढण्यात येत असताना विमानाचा एक पंखा या विजेच्या खांबाला धडकला.
त्यामुळे विमानाच्या पंखाचे नुकसान झाले, असे नागरी हवाई वाहतूक महासंचलनालयाने सांगितले. या दुर्घटनेमुळे विमानातील कोणाही प्रवाशाला दुखापत झाली नाही. “डीजीसीए’च्या वतीने या घटनेच्या कारणांचा तपास करायला सुरुवात केली आहे.
स्पाईसजेट कंपनीच्या बोईंग 737-800 हे विमान पार्किंगमधून मागे आणले जात असताना उजव्या बाजूचा पंखा एका विजेच्या खांबाला धडकला, असे स्पाईस जेट कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले. हे विमान आज सकाळी दिल्लीवरून जम्मूला जाणार होते. मात्र, या दुर्घटनेमुळे या विमानाच्या जागेवर दुसऱ्या विमानाची व्यवस्था करून देण्यात आली, असेही या प्रवक्त्याने सांगितले.





