खालापूर : तालुक्यात शेतीचा मुख्य हंगाम समजल्या जाणाऱ्या भातशेतीला यंदा उशिरा का होईना, सुरुवात झाली आहे. मे महिन्यापासून सुरू झालेल्या अवकाळी आणि संततधार पावसामुळे जमिनीत वाफसा मिळाला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना रोपे तयार करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या समाधानकारक पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी भात लागवडीला सुरुवात केली आहे. तालुक्यातील अनेक भागांत भात लागवडीची कामे वेगाने सुरू झाली असून काही ठिकाणी ती अंतिम टप्प्यात आली आहेत. काही शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने, तर काहींनी यंत्रसामग्रीच्या मदतीने नांगरणी व लागवड सुरू केली आहे. यंदाच्या अनियमित पावसामुळे सुरुवातीला पेरलेली बियाणे कुजून गेली होती, त्यामुळे पुन्हा पेरणी करावी लागल्याने खर्चात वाढ झाली. तरीही, पारंपरिक भातशेती टिकवण्यासाठी शेतकरी राजाने मोठी मेहनत घेतली आहे. जिथे पावसाने साथ दिली, तिथे शेतकरी वर्ग सुखावलेला दिसत आहे. मात्र काही भागांत पावसाचा अतिरेक झाल्याने नुकसान होऊन शेतकरी हवालदिल झाल्याचेही चित्र दिसत आहे. विविध जातींची पेरणी, अधिक उत्पादनाचा प्रयत्न तालुक्यात विविध जातीचे भात बियाणे वापरून शेतकरी अधिकाधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न करत आहेत. काही ठिकाणी भाताचे रोप बहरले असून लागवड सुरू झाली आहे, तर काही भागात लागवड अंतिम टप्प्यात आली आहे. खालापूर तालुक्यात संततधार पावसाने भात शेतीचे तीनतेरा वाजवले होते. तर अनेक ठिकाणी पेरणी केलेले भात बियाणे कुजून मेली असताना बहुसंख्य शेतकऱ्यांनी आपली पारंपारिक भात शेती टिकवण्यासाठी मोठे प्रयत्न केले. काही प्रमाणात शेतकऱ्यांना यश आले असून काही ठिकाणी भात लागवड शेतीच्या कामांनी वेग घेतला आहे. – अँड.जयेश तावडे, प्रगतशील शेतकरी