नांदूर, – दौडच्या पश्चिम पट्ट्यातील परिसरामध्ये सध्या ऊस तोडणीला वेग आला असल्याचे चित्र आहे. श्रीनाथ म्हस्कोबा, व्यंकटेश कृपा, दौंड शुगर, भीमा पाटस या चार खासगी साखर कारखान्यांच्या माध्यमातून सध्या ऊस तोडणी सुरू आहे. कारखान्याकडून लवकर ऊस तोडणी न मिळाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी दराचा विचार न करता गुऱ्हाळघरावरही ऊस गाळपासाठी दिलेला आहे. लवकर ऊस तोडणी करून गव्हाची पेरणी अथवा कांदा लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा भर आहे. मुळा-मुठा व पट्ट्यामुळे परिसर हा बारमाही बागायती परिसर आहे. दौंड तालुका परिसर उसाचे आगार समजला जातो. मध्यंतरीच्या पावसामुळे मंदावलेली ऊस तोडणी आता गती घेत आहे. यंदा विधानसभा निवडणुकीमुळे ऊस तोडणी कामगार उशिरा आल्यामुळे ऊस तोडणी विलंबाने होत आहे. ढगाळ हवामान काही दिवस राहिल्याने वाफसा अतिशय संथ गतीने येत होता. त्यामुळे कामगारांमार्फत जेमतेम ऊसतोडणी सुरू होती. काही दिवसांत मात्र ऊस पट्ट्यात समाधानकारक ऊन पडत आहे. उन्हाची तीव्रता फारशी नसली तरी वाफसा येण्यासाठी मोकळी हवा अनुकूल ठरत असल्याने तोडणीला वेग आला आहे. अंदाज पाहून ऊस तोडणी गाडी सेंटर, यंत्रधारकांनी हळूहळू ऊस तोडणी सुरू केली आहे. जितक्या वेगात ऊस तोडणी शक्य होईल. तितक्या वेगात ऊस तोडणी करण्यामागे शेतकऱ्यांच्या कल आहे.