पुणे जिल्हा | पश्चिम भागात कांदा काढणीला वेग

मोरगाव, (वार्ताहर)- कांद्याचे दर वाढल्यामुळे बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात कांदा पिक काढणी सुरु झाली आहे. वाढलेला भाव मिळण्यासाठी कांदा लवकर बाजारात विक्रीस नेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे.
बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील मोरगाव, तरडोली, लोणी भापकर, पळशी, मासाळवाडी, मुर्टी, जोगवडी, माळवाडी परीसरातील शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर गरवी कांद्याचे पिक घेतले आहे. मात्र कांद्याचा दर पडल्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा बाजारात नेणे टाळले होते. मात्र गेल्या आठ दिवसांपासून कांद्यांचा भाव वाढल्यामुळे शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे.
मोरगाव परिसरातील शेतकऱ्यांनी कांदा काढणी सुरु केली आहे. कांद्याचा वाढलेला दर आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी शेतकरी सरसावत आहे. अचानक वाढलेल्या भावामुळे शेतकरी आनंदीत झाला आहे. दरात वाढ झाल्यामुळे निदान उत्पादक खर्च तरी शेतकऱ्यांचा निघण्यास मदत होणार आहे.





