पिंपरी | हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गाला गती

पिंपरी, (प्रतिनिधी) – हिंजवडीच्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) केंद्राला शिवाजीनगरशी जोडणाऱ्या पुणे मेट्रो लाइन ३ प्रकल्पाला आणखी गती मिळणार असून या प्रकल्पामध्ये विद्युत पुरवठ्यासाठी अत्याधुनिक थर्ड रेल सिस्टिमचा वापर केला जाणार आहे.
गुरूवारपासून (दि.२०) थर्ड रेल प्रणालीचे विद्युतीकरण प्रत्यक्ष कार्यान्वित केले जाणार आहे. त्या अंतर्गत हिंजवडी येथे ३३००० व्हॉल्ट, ५० हर्टझ् एसी पॉवर केबल आणि ७५० व्हॉल्ट डीसी थर्ड रेल ट्रॅक्शन प्रणालीची प्रत्यक्ष वीजपुरवठा यंत्रणा कार्यान्वित केली जाईल.
शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोचे काम पूर्णत्वाकडे आले असून ती पूर्ण झाल्यानंतर ४० मिनिटांत हिंजवडीहून शिवाजीनगरला पोहचता येणार आहे.
माण-हिंजवडी-शिवाजीनगर हा २३ किलोमीटरचा मेट्रो मार्ग असून शिवाजीनगर ते हिंजवडी-माण या तिसऱ्या मेट्रो मार्गाच्या कामासाठी वाकड आणि हिंजवडी (फेज १) भागात गर्डर आणि खांबावर पिअर कॅम्प बसविण्याचे काम वेगाने सुरू आहे.
पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्याकडे या प्रकल्पाचे नियंत्रण आहे. सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर टाटा समूहाने हे काम हाती घेतले आहे. सध्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे खांब बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे.
स्थानक उभारणी सुरू आहे. तसेच रुळ बसविण्याचेही काम सुरू असून आजपासून (दि.२०) थर्ड रेल प्रणालीचे विद्युतीकरण प्रत्यक्ष कार्यान्वित केले जाणार आहे. तर, जूनच्या पहिल्याच आठवड्यात पुणे मेट्रो प्रकल्प ३ मधील पहिली मेट्रो या मार्गिकेच्या माण येथील आगारात दाखल झाली आहे.
दरम्यान सर्व प्रकारची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी या भागात सामान्यांनी कोणत्याही कारणास्तव विद्युत क्षेत्राजवळ जाण्यास किंवा कसलेही काम करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. त्यानुसार या परिसरातील सर्व नागरिकांनी तसेच कर्मचाऱ्यांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन मेट्रो विकासकांनी केले आहे.
नागरिकांनी सहकार्य करावे
नागरिकांच्या सोयीसाठी हाती घेण्यात आलेल्या पुणेरी मेट्रो प्रकल्पाच्या सर्व टप्प्यांमध्ये सुरक्षिततेशी कुठलीही तडजोड न करण्याचे टाटा समूहाचे धोरण आहे. पुणेरी मेट्रोचे कामकाज सुरक्षित आणि कार्यक्षमतेने चालावे यासाठी सर्व नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे.
यामुळे प्रकल्प विकासकांनी सर्व व्यक्तींना सुरक्षिततेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आणि विद्युतीकरण झालेल्या भागात अनधिकृत प्रवेश टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मेट्रो मार्गावर ३१ स्थानके
मेगापोलिस सर्कल, एम्बेसी क्चाड्रॉन बिझनेस पार्क, डोहलर, इन्फोसिस फेज २, विप्रो फेज २, पाल इंडिया, शिवाजी चौक, हिंजवडी, वाकड चौक, बालेवाडी स्टेडियम, एनआयसीएमएआर, रामनगर, लक्ष्मीनगर, बालेवाडी फाटा,
बाणेर गाव, बाणेर, कृषी अनुसाधन, सकाळनगर, विद्यापीठ, आरबीआय, कृषी महाविद्यालय, शिवाजीनगर आणि दिवाणी न्यायालय आदी मार्गाचा समावेश आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गापैकी वाकड चौक ते मेगापोलिस सर्कल साडे आठ किलोमीटरचे अंतर असून एकूण नऊ स्थानके असणार आहेत.





