Accident Case : मावळ तालुक्यात अवघ्या २४ तासांत तीन भीषण अपघात घडल्याने परिसर हादरला आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग, जुना महामार्ग आणि तळेगाव-चाकण रस्ता या तिन्ही ठिकाणी झालेल्या दुर्घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. वाढता वेग आणि निष्काळजीपणामुळे रस्ते अक्षरशः मृत्यूचे सापळे ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. पहिली दुर्घटना पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावरील ओझर्डे गावच्या हद्दीत सोमवारी (दि. ४) पहाटे घडली. भरधाव कारने समोरील ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात सुनीता भट (वय ५५, रा. विले पार्ले, मुंबई) यांचा मृत्यू झाला. तर सौदागर गायकवाड, बिपीन प्रजापती, एम.डी. नईम अकबर आणि चालक प्रतिक सरवदे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी ट्रेलर चालक प्रविण धन्ना सिंग यांच्या फिर्यादीवरून आरोपी प्रतिक सरवदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शिरगाव पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.= दुसरी घटना तळेगाव-चाकण रस्त्यावर भंडारा डोंगराच्या पायथ्याशी रात्री घडली. दुचाकीवरून जाणाऱ्या बधाले दाम्पत्याला एका भरधाव टेम्पोने धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की टेम्पो दोघांवरून गेला. यात उषा बधाले (वय ४५, रा. बधालेवाडी, ता. मावळ, जि. पुणे) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे पती तानाजी बधाले गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. संतप्त नागरिकांनी टेम्पो चालक सलीम खलिद अहमद याला पकडून मारहाण केली. याघटनेचा पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करत आहेत. तिसरी आणि सर्वाधिक धक्कादायक घटना मंगळवारी (दि. ५) पहाटे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील कामशेत उड्डाणपुलावर घडली. एका भरधाव कारने रस्ता दुभाजकाला जोरदार धडक दिली. यावेळी कारने अचानक पेट घेतला. आग इतकी वेगाने भडकली की चालकाला बाहेर पडता आले नाही. परिणामी चालकाचा कारमध्येच होरपळून मृत्यू झाला. ओळख पटवण्याचे काम सुरू असून कामशेत पोलीस घटनेचा तपास करत आहेत. या सलग घटनांमुळे मावळ तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाहतूक नियमांचे पालन, वेगावर नियंत्रण आणि सुरक्षित ड्रायव्हिंग याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अपघात टाळण्यासाठी महत्त्वाचे उपाय – वेग मर्यादेत वाहन चालवा – हेल्मेट आणि सीटबेल्ट वापरा – चालकाने मोबाइल वापर टाळावा – मद्यपान करून वाहन चालवू नका – सिग्नल आणि नियमांचे पालन करा – वाहनाची नियमित तपासणी करा – ओव्हरटेक करताना काळजी घ्या – पावसात किंवा धुक्यात सावध रहा – थकवा आल्यास विश्रांती घ्या – सुरक्षित अंतर कायम ठेवा Talegaon Dabhade : विजयोत्सवानंतर नगराध्यक्षांकडून स्वच्छता; फटाक्यांच्या कचऱ्यावर झाडू फिरवत दिला स्वच्छतेचा संदेश