– प्रा. विजय कोष्टी डॉ. अनंत क्षीरसागर एक कथाकार, सज्जन व्यक्ती आणि जगातील आघाडीच्या जैवसांख्यिकी शास्त्रज्ञांपैकी एक होते. त्यांच्या कार्याविषयी… आंतरराष्ट्रीय स्तरावर सांख्यिकीचे सिद्धांत (थेअरी) आणि अभ्यास (प्रॅक्टिस)मध्ये विशेषत: प्रायोगिक रचना (एक्सपेरिमेन्टल डिझाइन), बहुविध विश्लेषण (मल्टीव्हेरियेंट अॅनालिसिस) आणि रेखीय नमुने (लिनियर मॉडेल्स), वाढ वक्र विश्लेषणाच्या (ग्रोथ कर्व्ह अॅनालिसिस) क्षेत्रातील भरीव योगदानासाठी ओळखले जाणारे अमेरिकेत कार्य करणारे भारतीय जैवसंख्याशास्त्रज्ञ (बायो स्टॅटिस्टिशियन) डॉ. अनंत एम. क्षीरसागर यांचा 21 जून हा पहिला स्मृतिदिन होता. विद्यार्थी, माजी विद्यार्थी, सहकारी आणि कर्मचारी त्यांना प्रेमाने डॉ. के. म्हणून ओळखतात. आजवर अनेक महान हस्ती होऊन गेल्या. तथापि, बहुतेकदा त्या क्षेत्रातील लोकांनाच त्यांच्या कार्याची महानता जाणवते. इतरांपर्यंत ती फारशी पोहोचत नाही. कधी कधी तर आपल्या घरापासून हाकेच्या अंतरावर राहणार्या दिग्गजांचीही आपल्याला माहिती नसते. अशीच एक हस्ती म्हणजे अमेरिकेत कार्य करणारे भारतीय जैवसंख्याशास्त्रज्ञ डॉ. अनंत एम. क्षीरसागर. गतवर्षी त्यांचे वयाच्या 91व्या वर्षी निधन झाले. त्यांचा जन्म 1931 मध्ये झाला. त्यांनी 1948 मध्ये बी.एस्सी. तर 1951 मध्ये एम.एस्सी. पदवी मुंबई विद्यापीठातून प्राप्त केली. ते 1951 ते 1963 पर्यंत मुंबई विद्यापीठात प्राध्यापक होते आणि त्यांनी 1961 मध्ये मँचेस्टर विद्यापीठातून एम. एस. बार्टलेट यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. मिळविली. मँचेस्टर विद्यापीठातूनच 1976 साली त्यांनी डी. एस्सी. (शाश्वत प्रकाशन रेकॉर्ड आणि संशोधन विकासकांच्या गुणवत्तेसाठी) ही पदवी देखील संपादन केली. 1968 पूर्वी ते बॉम्बे विद्यापीठ आणि दिल्लीतील संरक्षण विज्ञान प्रयोगशाळेत होते. त्यांनी टेक्सास ए अँड एम विद्यापीठ आणि पुणे विद्यापीठात व्हिजिटिंग प्रोफेसरशिप भूषविली आहे. त्यानंतर 1968 मध्ये ते डॅलस, टेक्सास येथील सदर्न मेथोडिस्ट विद्यापीठात रुजू झाले आणि 1972 मध्ये ते टेक्सास ए अँड एम विद्यापीठात पूर्णवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत झाले. 1977 मध्ये ते मिशिगन विद्यापीठात दाखल झाले, जिथे ते 2005 म्हणजेच त्यांच्या निवृत्तीपर्यंत राहिले. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. त्यामध्ये प्रामुख्याने बहुविविध विश्लेषणे (मल्टीव्हेरियेट अॅनालिसिस), रेखीय नमुने (लिनियर मॉडेल्स), वाढीचा वक्र (ग्रोथ कर्व्ह्) आदींचा समावेश होतो. त्यांनी शंभरहून अधिक संशोधन पेपर प्रकाशित केले. त्यांनी सांख्यिकी आणि जैवसांख्यिकी (बायो स्टॅटिस्टिक्स)च्या विविध क्षेत्रांमध्ये काम केले असून बहुविविध विश्लेषण, प्रयोगाची रचना, वाढ वक्र याशिवाय मार्कोव्ह नूतनीकरण प्रक्रिया (मार्कोव्ह रिनिव्हल प्रोसेसेस), प्रतिसाद पृष्ठभाग (रिस्पॉन्स सरफेसेस), भेदभाव विश्लेषण (डिसक्रीमिनंट अॅनालिसिस), रेखीय मॉडेल्स (लिनियर मॉडेल्स) आणि बायोसेस यांचा समावेश आहे. सन्मान आणि संशोधनाची आवड अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशन आणि इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल स्टॅटिस्टिक्सचे फेलो होण्याचा त्यांना सन्मान प्राप्त झाला. त्यांची आंतरराष्ट्रीय सांख्यिकी संस्थेचे सदस्य म्हणूनही निवड झाली होती. ते सांख्यिकीमध्ये संप्रेषण (कम्युनिकेशन्स इन स्टॅटिस्टिक्स)च्या संपादकीय मंडळाचे सदस्य होते. त्यांच्या विविध योगदानांसाठी त्यांना मानाचा ‘डॉन ओवेन’ पुरस्कार मिळाला. डॉ. क्षीरसागर यांना बायोमेट्री आणि वैद्यकशास्त्रात उपयुक्त असलेल्या लॉनजीट्यूडनल डेटा विश्लेषणामध्ये निर्माण होणार्या ग्रोथ वक्र मॉडेल्सच्या विस्तारामध्ये संशोधनाची आवड होती. उद्योगात उपयुक्त असलेल्या मिश्र पारंपरिक प्रतिकृती डिझाइन्सच्या सास (एसएएस)-केंद्रित विश्लेषणामध्येही त्यांना स्वारस्य होते. तसेच, त्यांना मिश्रित रेखीय मॉडेल्समध्ये, बहुविविध तंत्रांमध्ये, विशेषत: चुकीच्या मोजणीच्या शक्यतांचा अंदाज लावण्यात रस होता. डॉ. संजय शेटे यांची एक आठवण डॉ. संजय शेटे (मूळचे सांगली, महाराष्ट्र) हे अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठाच्या एमडी अँडरसन कॅन्सर सेंटर, ह्यूस्टन येथे बायोस्टॅटिस्टिक्स आणि एपिडेमिओलॉजीचे प्राध्यापक आहेत. त्यांची डॉ. क्षीरसागर यांच्या विषयीची एक आठवण त्यांच्याच शब्दात, ‘मी त्यांना 2001 च्या सुमारास भेटलो. आमच्या कॉमन फ्रेंडने आम्हाला त्यांच्या ह्यूस्टन येथील घरी जेवायला बोलावले होते. तिथे क्षीरसागर यांनी एक किस्सा सांगताना त्यांची बायको त्यांना गाडी चालवायला कशी मदत करायची याची एक कथा सांगितली. जेव्हा ते यूएसमध्ये नवीन होते, तेव्हा अनेक ट्रॅफिक सिग्नलवर अनेक लाइट लागले होते. ग्रिन सिग्नल लागल्यावरही त्यांनी गाडी का पुढे नेली म्हणून पोलिसाने त्यांना विचारले. डॉ. क्षीरसागर यांनी उत्तर दिले की अनेक लाइट असल्याने त्यांना कोणता फॉलो करायचा याची खात्री नव्हती. तेव्हा पोलिसाने त्यांना केवळ आपल्या समोरच्या लाइटचे अनुकरण करण्यास सांगितले. त्यांनी ज्या पद्धतीने कथा सांगितली ती मजेशीर होती.’