– दत्ता पवार प्रेम म्हणजे काय किंवा प्रेमात काय आनंद मिळतो, हे कुणालाही शब्दात सांगता आलेले नाही. कारण, प्रेमात तुम्ही कितीही बुडाले तरी प्रेम नावाच्या अथांग सागरात तुमचा फक्त पायाचा अंगठाच भिजणार. प्रेम ही ईश्वराने मानवाला दिलेली मोठी देणगी आहे आणि आयुष्यात खरं प्रेम एकदाच होतं. ईश्वराच्या मनात असते त्यावेळी अचानक त्याला ‘ती’ आवडू लागते आणि तिलाही ‘तो’ आवडू लागतो. आनंदाला पारावार राहात नाही. आपण एकटेच स्वतःशीच हसतो. जगातले सर्व काही मिळाल्याची भावना निर्माण होते. एकमेकांशिवाय अजिबात करमत नाही. एकमेकांची काळजी घ्यावीशी वाटते. हृदयामध्ये धडधड चालू होते. एक दिवस बोलणे झाले नाही तरी चुटचुट लागून राहते. तिचा हात हातात घेतल्याशिवाय राहवत नाही. तिचा चेहरा बघितल्याशिवाय चैन पडत नाही. झोप उडते. तिचा चेहरा चंद्रच जणू भासतो. तिच्या सौंदर्याचे वर्णन करताना आपण कवी नसतानासुद्धा आपल्यातला कवी जागा होतो. मग त्या कवितेतून कधी ती चंद्र बनून येते, कधी ती चांदण्या बनून येते, कधी चंद्रावरचा डाग तिच्या गालावरचा तीळ बनून येतो. कधी ती लाल गुलाबंच फूल बनून येते. कधी कधी तर हद्दच होते आणि चक्क ती स्वप्नात येते. ती जेवली तरच आपण जेवायचं. ती नाही जेवली तर आपण पण नाही जेवायचं, मग तिने लटक्या रागाने म्हणायचं की, ‘तू जेवणार आहेस की नाहीये’ आणि मगच आपण जेवायचं. कारण, तिला त्याचा आणि त्याला तिचा ध्यास लागलेला असतो. कधी कधी तिच्या घरी जी भाजी असते ती आपल्याही घरी होते… मग ‘सेम-सेम’ होतं. आपण म्हणतो मला तुझ्या हातची भाजी खायची; पण ती संधी आपल्याला मिळत नाही. कधी मग सुरू होतं चोरून-चोरून भेटणं. तिला भेटायला आपण तब्बल दोन तास अगोदरच येऊन थांबायचं. ‘ती’ भेटल्यावर आताच आलोय असं सांगायचं. कधी-कधी तिनेही आपल्यासाठी एक तास आधी यायचं आणि भेटल्यावर आताच आलेय असं सांगायचं. बसस्थानकात अशा अनेक बस तिच्यासाठी सोडायच्या; पण तिला नाही सोडायचं. कधी भेट नाही झाली किंवा बोलणं नाही झालं तर उगाचच चुटचुट लागून राहते. अश्रू अलगद बाहेर येतात. ज्या हाताचा उलटा पंजा डोळ्याला लावायची कधीच आवश्यकता पडली नाही, त्या दिवशी मात्र हाताच्या उलट्या पंजाने अश्रू दूर सारायची गरज भासते. असं म्हटलं जातं की, जुने ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येत नाही म्हणूनच ती आपल्या आयुष्यात आलेली असते. प्रेम इतकं नितांत असतं की, तिने आठवण काढल्यानंतर आपल्याला उचकी लागतेच आणि आपण आठवण काढल्यानंतर तिला उचकी लागतेच. कधी कधी ठसका पण लागतो. मग नंतर आपण तिला विचारायचं की ‘तू माझी आठवण काढली होतीस का?’ तिने आश्चर्याने विचारायचं की, ‘तुला कसं माहिती?’ आपण म्हणायचं, ‘उचकी लागली होती ना’. असं हे प्रेम असतं. मंगेश पाडगावकर यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘तुमचं आमचं सेम सेम असतं’. ज्यांना आयुष्यात असं झालं त्यांनाच आयुष्यात खरं प्रेम झालेलं असतं. प्रेमाला जातपात, धर्म, प्रांत, विवाहित, अविवाहित अशा मर्यादा नसतात. अगदी सीमारेषा अर्थात ‘लाइन ऑफ कंट्रोल’ नसतात. म्हणूनच की काय प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पलीकडे अर्थात भारतीय लोकांचे पाकिस्तान, बांगलादेशात पण प्रेम झाल्याची उदाहरणे आपण पाहिलेली आहेत. कारण प्रेम ही एक निसर्गाने मानवाला दिलेली अनमोल अशी भेट आहे. ती एक पवित्र भावना आहे. प्रेम आयुष्यात एकदा तरी करून बघावं. कोणावर तरी एकदा मरून बघावं. कोणासाठी तरी आज लवकर निघावं. प्रेम आयुष्यात एकदा तरी करून बघावं. खरं प्रेम आयुष्यात फक्त आणि फक्त एकदाच होतं. प्रत्येक गोष्टीमागे आणि नात्यामागं काहीतरी कारण असतं. नाहीतर करोडोंची आबादी असणार्या देशात याच व्यक्तीशी आपली ओळख का होते? कोण घडवून आणतं हे? याचा मास्टर माईंड अर्थात सूत्रधार कोण? याचे उत्तर या जगात कोणीही देऊ शकत नाही. पण प्रेमाची दुसरी बाजू आपण बघत नाही. या जगात प्रत्येक जण खरं प्रेम करत नसतो. प्रेम करणारे खूप असतात; पण ते निभावणारे फारच थोडे मुलं आणि मुली या जगात आपल्याला आढळून येतात. प्रेमाच्या प्रांतात ‘सोडून जाणे’ हा विषयच नसतो. कारण जी व्यक्ती तुमच्यावर खरं प्रेम करते ती कधीच आपल्या आवडत्या व्यक्तीला दुःखाच्या सागरात सोडून जात नाही. जी व्यक्ती सोडून जाते तिने आपल्यावर खरं प्रेम केलेलं नसतं. ते एक नाटक असतं. ज्यात आपण फसले जातो आणि पर्यायाने बरबाद होतो. जिचं आपल्यावर खरं प्रेम असतं ती व्यक्ती कितीही संकटे आली तरी धरलेला हात कधीच सोडत नाही. जी व्यक्ती धरलेला हात सोडते ती धोकेबाज असते. अशावेळी खूप असह्य मनस्ताप, दुःख, यातना होतात. शेकडो सूर्य उगवले आणि मावळले तरी आठवणींचा एकच सूर्य आपल्या आयुष्यातून मावळायचे नाव घेत नाही. ज्या व्यक्तीने आपल्यावर प्रेम करावं किंवा निदान तसं नाटक करावं आणि जन्मभर साथ देण्याची शपथ घ्यावी. अचानक एक दिवस आपल्यावर बेछुट आरोप करावेत. स्वतःच्या कुटुंबीयापुढे आपली मानहानी करावी, असे अनेक प्रसंग घडतात आणि यापेक्षा मोठी वेदना नाही, म्हणून तरुण तरुणींनी प्रेम आंधळं असले तरी ते डोळसपणे करावं. कोणावर इतका विश्वास ठेवू नये की आपल्या मनात आत्महत्येच्या विचारांनी घर करावं. कोणामध्ये इतकं गुंतू नये की आपल्याला त्यातून बाहेर यायचाच विसर पडावा. कोणावर इतके प्रेम करू नये की त्यानं आपल्या भावनांशी खेळून निघून जावं. तरुण-तरुणींनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की प्रेम करणारे खूप आहेत; पण निभावणारे खूप कमी असतात. जो आपल्या प्रेमाला सोडून जातो तो आयुष्यभर पश्चाताप करत राहतो. जाता जाता एकच… जी जीवाच्या पलीकडची नाती तयार होतात. ती जीवाच्या पलीकडे जपावीत.