– स्नेहल बाकरे World Health Day : आज 7 एप्रिल रोजी ‘जागतिक आरोग्य दिन’ (World Health Day) जगभरात साजरा होत आहे. लोकांमध्ये आरोग्यविषयी जागरूकता निर्माण करणे, निरोगी जीवनशैलीचा प्रसार करणे आणि सार्वजनिक आरोग्याशी संबंधित महत्त्वाच्या समस्यांकडे लक्ष वेधणे हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे. धर्मार्थकाममोक्षणामारोग्य मूलमुत्तमम् । रोगास्तस्यापहर्तार: श्रेयसो जीवनस्य च ॥ असा आरोग्याबद्दलचा अर्थपूर्ण श्लोक ‘सुश्रुतसंहिता’ यामध्ये आढळतो. या एका श्लोकात (World Health Day) जीवनाचं खरं सार दडलं आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ही जीवनातील प्रमुख उद्दिष्ट पूर्ण करायची असतील, तर त्यासाठी सर्वात आधी निरोगी असणं आवश्यक आहे. रोग किंवा आजार हे या सर्व चांगल्या उद्दिष्टांच्या विनाशाचं मूळ कारण आहे. निरोगी शरीर (World Health Day) आणि शांत मन असेल तरच माणूस यश, आनंद आणि समाधान यांचा अनुभव घेऊ शकतो. शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक, आध्यात्मिक, बौद्धिक आणि पर्यावरणीय असे ढोबळमानाने आरोग्याचे सात प्रकार आहेत. त्यातील शारीरिक आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी योग्य आहार, व्यायाम आणि पुरेशी झोप आवश्यक आहे. पण मन निरोगी ठेवणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्यासाठी स्वतःशी संवाद साधणे, सकारात्मक विचार करणे महत्त्वाचे आहे. एकमेकांशी सलोख्याचे हितसंबंध राखल्याने सामाजिक आरोग्य जपता येते. तर स्वच्छ वातावरण आणि निसर्गावरील प्रेम व त्याची काळजीपूर्वक जपणूक याने पर्यावरणीय आरोग्य टिकवता येतं. World Health Day जागतिक स्तरावर आरोग्याचा गंभीर विचार होऊ लागला तो दुसरे महायुद्ध संपल्यानंतर. युद्धामुळे काही प्रदेश उद्ध्वस्त झाले, लाखो लोक मृत्यूमुखी पडले, अनेक देशांमध्ये आरोग्य व्यवस्था पूर्णपणे ढासळली आणि रोगांचा प्रसार वाढला. या परिस्थितीत जगाने एकत्र येऊन आरोग्यासाठी काम करण्याची गरज निर्माण झाली. त्यामुळे 1948 मध्ये जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) स्थापना करण्यात आली. 1950 पासून या जागतिक आरोग्य संघटनेने 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून घोषित केला. त्यानंतर प्रत्येक वर्षी हा दिवस जगभरात उत्साहाने साजरा केला जाऊ लागला. या दिवशी जगभरात आरोग्यविषयक जागरूकता मोहीम, मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, लसीकरण मोहीम, आरोग्यविषयक चर्चासत्रे आणि वेबिनार इत्यादी उपक्रम राबवले जातात. शालेय व महाविद्यालयीन स्तरावरही निरनिराळ्या मैदानी खेळांच्या स्पर्धेचे आयोजन करून मुलांमध्ये आरोग्यविषयक जागृती निर्माण केली जाते. सोशल मीडियावर ही डब्ल्यूएचओ व विविध आरोग्य संस्था ऑनलाइन व्हिडिओ, माहितीपत्रके आणि आरोग्यविषयी माहिती पूर्ण लेख प्रसिद्ध करतात. #Worldhealth #Healthforall चा वापर करून डिजिटल मोहीम राबवली जाते. रुग्णालयांमध्ये मोफत आरोग्य तपासणी, वैद्यकीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन असे कार्यक्रम आयोजित केले जातात. जागतिक आरोग्य संघटना (World Health Day) आणि विविध आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्था या दिवशी नागरिकांचे आरोग्य सुधारण्याविषयी नव्या धोरणांची घोषणा देखील करतात. अनेक देश, सरकार आणि स्वयंसेवी संस्था एकत्र येऊन ग्रामीण व शहरी भागात आजारांचे निदान व त्यावर उपचार करणे तसेच प्रत्येकाचे स्वास्थ्य उत्तम राहावे यासाठी कशाप्रकारे दक्षता घ्यावी याचे मार्गदर्शन करणे इत्यादी उपक्रम राबवतात. कंपन्या आणि कार्यालय आपल्या कर्मचार्यांच्या मानसिक व शारीरिक आरोग्य संवर्धनासाठी विविध उपक्रम आयोजित करतात. एक प्रकारे हा दिवस ‘सर्वांसाठी आरोग्य’ (Health for all) ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी जगभर महत्त्वपूर्ण पद्धतीने साजरा केला जातो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना आरोग्य संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी एका विशिष्ट संकल्पनेचे नियोजन केले जाते. या संकल्पनांमुळे आरोग्यविषयक जागरूकता वाढून सरकार व आरोग्य संस्थांना त्याप्रमाणे आपली धोरणे आखता येतात. त्याचप्रमाणे येणार्या साथीच्या रोगांसाठी संशोधनाला चालना मिळते आणि आरोग्य सेवा अधिक व्यापक व प्रभावी होतात. 1950 सालची पहिली थीम Know Your Health Services ही होती. जिच्या मार्फत लोकांना ठिकठिकाणी उपलब्ध असणार्या आरोग्य सेवा आणि त्यांचा वापर करण्याबाबत जागरूक करण्यात आलं होतं. जागतिक आरोग्य संघटनेने दरवर्षी हा दिन साजरा करताना वेगवेगळ्या विषयांवर भर दिला आहे. आजपर्यंत जागतिक आरोग्य संघटनेने त्या अंतर्गत निरोगी जीवनासाठी मौखिक आरोग्य, जागतिक पोलिओ निर्मूलन, मानसिक आरोग्य, शहरीकरण आणि आरोग्य, सूक्ष्मजीव प्रतिरोधकता, अन्नसुरक्षा, माझे आरोग्य माझा हक्क अशा अनेक संकल्पना राबवल्या आहेत. या विविध संकल्पनांद्वारे आंतरराष्ट्रीय, प्रादेशिक आणि स्थानिक स्तरांवर विविध कार्यक्रम आखून सार्वजनिक आरोग्य सुरक्षित राखण्याचे महत्त्वपूर्ण काम करत आहेत. 2026 साठी ‘टुगेदर फॉर हेल्थ, स्टँड विथ सायन्स’ ही थीम ठरवण्यात आली आहे. आज जगात काही देशांमध्ये युद्धपरिस्थिती निर्माण झाली आहे. बदलते हवामान तसेच ताणतणाव यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य संबंधित आजार वाढले आहेत. अशा परिस्थितीत विज्ञान संशोधन आणि जागतिक सहकार्य यावर भर देणे आवश्यक आहे. म्हणूनच यावर्षी लोकांनी विज्ञानाची साथ देत जगाने एकत्र येऊन आरोग्य जपावं हा संदेश या थीममधून दिला जात आहे. माणसाने तंत्रज्ञानात कृत्रिम बुद्धिमत्तेत एवढी प्रगती केली की चंद्रावर झेप घेतली. मंगळावर मोहिमा पाठवल्या. अलीकडे तर सूर्याच्या कक्षेत पोहोचून त्याचा अभ्यास करण्याचं संशोधन सुरू झालं आहे. एकीकडे वैद्यकीय क्षेत्रातही मानवाने विकसित केलेले रोबोट कार्यरत आहेत; परंतु दुसरीकडे अगदी लहान मुलांमध्येही डायबिटीज, डिप्रेशन, एन्झॉयटी, स्थूलपणा यांसारखे आजार वाढत आहेत. आज जरी अनेक दुर्दम्य आजारावर औषध शोधली गेली, रुग्णालयांची संख्या वाढली असली, तरी आजार होऊ नयेत यासाठी मात्र प्रत्येकाने स्वतः प्रयत्न करणे गरजेचे आहे. म्हणूनच जागतिक आरोग्य दिन हा एक प्रकारे आपल्या जीवनशैलीचा आरसा आहे. ‘आरोग्यम् धनसंपदा’ याची पुन्हा एकदा प्रत्येकाला जाणीव करून देण्याचा हा दिवस आहे.