– डॉ. आश्लेषा मुंगी दरवर्षी विविध कारणांसाठी विविध दिवस साजरे केले जातात. काही दिवस काही ठराविक कारणांसाठी विशेष महत्त्वाचे असतात. त्यापैकीच एक आजचा दिवस म्हणजे सामाजिक न्याय दिन. सामाजिक न्यायाबद्दल सामाज जनजागृती करणे हा या दिनामागचा मूळ हेतू असतो. भेदभावाला तिलांजली देऊन एकतेच्या मार्गावर आगेकूच करण्यासाठी सर्वांनाच एकत्र आणणे, बेरोजगारीचे प्रमाण कमी करणे, रोजगाराच्या संधी निर्माण करणे, कामाच्या ठिकाणी एक सहजता साध्य करणं हे सामाजिक न्याय दिनामागचे उद्देश आहेत. सर्व राष्ट्रांमध्ये शांतता व आणि सुरक्षितता साध्य करण्यासाठी आणि ती राखण्यासाठी सामाजिक विकास आणि सामाजिक न्याय अपरिहार्य आहे हे मान्य झाले. जागतिकीकरण आणि परस्परावलंबन हे जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी आणि जगभरातील राहणीमानाच्या विकासासाठी, सुधारण्यासाठी व्यापार, गुंतवणूक, माहिती तंत्रज्ञानासह प्रगतिशील नवीन संधी उघडत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत सहभागीत्वासाठी आर्थिक संकटे, सामाजिक असमानता अशासारखी आव्हाने अडथळे ठरत होती. या सर्वांवर तोडगा म्हणून 20 फेब्रुवारी रोजी दरवर्षी जागतिक सामाजिक न्याय दिन साजरा करायला सुरुवात झाली. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने हे मान्य केले की, राष्ट्रांमध्ये शांतता आणि सुरक्षितता साध्य करण्यासाठी सामाजिक विकास व न्याय अपरिहार्य आहे. या दिवसाचा इतिहास मानवी हक्कांच्या चळवळीशी आणि सामाजिक समतेच्या जागतिक प्रयत्नांशी जोडलेला आहे. औद्योगीकरणानंतर जगभरात यांत्रिक, आर्थिक प्रगती झाली; पण त्याचबरोबर विविध देशांपुढे अनेक प्रश्न आ वासून उभे होते. या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय हा केवळ नैतिक मुद्दा न राहता मानवी हक्कांचा मूलभूत भाग ठरला. संयुक्त राष्ट्र संघाच्या मते, शाश्वत विकास लोकशाही आणि जागतिक शांतता यांची पायाभरणी सामाजिक न्यायावरच होते. त्यामुळे शिक्षण, आरोग्य, रोजगार, समान संधी या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून जागतिक सामाजिक न्याय दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. शासन संस्था, समाज आणि व्यक्तींनी एकत्र येऊन अन्यायाविरुद्ध उभे राहावे, दुर्बल घटकांना समान संधी मिळावी, हाच या दिवसाचा खरा अर्थ आहे. समाज म्हणजे नुसत्या विकसित बाजारपेठा, रस्ते, इमारती, भौतिक साधने नाहीत तर समाज म्हणजे माणसं, वेगवेगळ्या जातीची धर्माची विचारांची. कोणासाठी शिक्षण हाच खरा न्याय, तर कोणासाठी श्रम हेच जीवन, हाच असमतोल नष्ट करण्यासाठीच्या प्रयत्नांचा हा दिवस. हा दिवस सर्वांना आठवण करून देतो की न्याय म्हणजे फक्त न्यायालयात मिळणारा निकाल नाही, तर तो रोजच्या जगण्यातला समतोल आणि सारखेपणा आहे. स्त्रीला सन्मानपूर्वक वागणूक, कामगाराला न्याय, वृद्धांना आधार, मुलांना शिक्षण इत्यादी सारखे सामाजिक न्यायाचे वेगवेगळे चेहरे आहेत. संयुक्त राष्ट्र संघाने जरी ही संकल्पना मांडली तरी ती पूर्ण करण्यासाठी प्रत्येक माणसाला प्रयत्नशील राहावे लागते. कारण कायदे असतात कागदावर पण न्याय जिवंत राहतो तो माणसांच्या कृतीत आणि एकमेकांशी असणार्या वर्तनात. आजही कुठेतरी जात, लिंग, भाषा, आर्थिक परिस्थिती यावरून मतभेद होताना दिसतात. माणूस माणसापासून दूर जाताना दिसतोय म्हणून सामाजिक न्याय दिन हा उत्सवाच्या दिवसापेक्षा योग्य कृती करण्याचा आहे. आपल्याकडून कोणावर अन्याय तर होत नाही ना? कुणाचं तरी आपण काही हिसकावून तर घेत नाहीये ना? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःसाठी विचारावा. समानतेच्या पायावर प्रत्येकाने उभे राहण्यासाठी शिकवणारा हा दिवस आहे. जेव्हा समाजातील शेवटचा माणूसही ताठ मानेने उभा राहील, तेव्हाच या दिवसाचं खरं सार्थक होईल. सामाजिक न्याय हा घोषणा देऊन संपणारा विषय नाही तर तो रोजच्या वागण्यातून उमटणारा, दिसणारा संस्कार आहे. जेव्हा आपण दुसर्याच्या वेदनेला आपली वेदना समजतो, हक्कांबरोबर कर्तव्यही ओळखतो आणि माणूस म्हणून माणसाशी वागतो तेव्हाच समाज खर्या अर्थाने समृद्ध होतो. माणुसकीचा अर्थ प्रत्येक माणसाने समजून, संवेदनशील मनाने व्यवहार केले, तर समाजाचे हिंसक चित्र बदलण्यास वेळ लागणार नाही. न्याय नसता कागदावर उतरवून चालणार नाही तर तो हृदयात रुजला पाहिजे, तेव्हाच समतेची बीज रुजून दिसू लागतील. प्रत्येकाने आपल्या जीवनाची रूपरेषा अशी आखली तर उद्याचा समाज अधिक माणुसकीचा अधिक उजळ आणि अधिक सुरक्षित नक्कीच होईल. आज वाढत्या सामाजिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय दिन अधिकच महत्त्वाचा ठरतो. कारण जातीय तणाव, बेरोजगारी, आर्थिक विषमता अशा विविध प्रश्नांमुळे सामाजिक दरी वाढत आहे. अशावेळी हा दिवस आठवण करून देतो की सामाजिक न्याय हा शांतता आणि लोकशाहीचा पाया आहे. जेव्हा दुर्बल घटकांचा आवाज ऐकला जातो, अन्यायाविरुद्ध संवेदनशीलता निर्माण होते आणि माणसा-माणसातील विश्वास मजबूत होतो, तेव्हाच अस्थिरतेचे धुके दूर होऊ लागते. म्हणून सामाजिक न्याय दिन हा केवळ स्मरणाचा नसून तुटत चाललेल्या समाजाला पुन्हा एकत्र बांधणारा आशेचा आणि संतुलनाचा दीप आहे.