Pune : विशेष शिक्षकांना वेतन मिळणार

पुणे : केंद्र पुरस्कृत अपंग एकात्म शिक्षण योजनेतील ५२ विशेष शिक्षकांचे नोव्हेंबर २०२३ ते ऑगस्ट, २०२४ या कालावधीतील दहा महिन्यांचे थकीत वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
केंद्र शासनाने सन १९७८ पासून विशेष गरजा असलेल्या अपंग विद्यार्थ्यांना सामान्य मुलांबरोबर शाळेत शिक्षण घेता यावे, यासाठी अपंग एकात्म शिक्षण योजना (प्राथमिक स्तर) सुरू केली आहे. योजनेंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या माध्यमिक युनिटवर कार्यरत असलेल्या विशेष शिक्षकांचे एप्रिल २०२२ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीतील वेतन शासन निर्णयान्वये अदा करण्यात आले आहे. त्यानंतरचे वेतन तांत्रिक कारणांमुळे थकीत होते. याबाबत प्राथमिक शिक्षण संचालकांनी शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. तो मंजूरही करण्यात आला आहे. यासाठी ५ कोटी १४ लाख १९ हजार रुपयांचा निधी समग्र शिक्षा योजनेंतर्गत उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
वेतनाची रक्कम संबंधित विशेष शिक्षकांच्या खात्यात जमा होईल, याची काळजी घावी. एखाद्या शिक्षकाचे नाव दुबार आढळून आल्यास अशाप्रकरणी एकदाच वेतन अदा होईल, याची दक्षता घ्यावी. अधिकचे वेतन अदा झाल्याचे निदर्शनास आल्यास प्राथमिक शिक्षण संचालकांना जबाबदार धरण्यात येणार आहे.
वेतन अदा केल्यानंतर निधी शिल्लक राहिल्यास त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करावा. शिल्लक निधीचा विनियोग करण्यापूर्वी शासनाची पूर्वपरवानगी घेण्यात यावी. वितरीत करण्यात आलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र एक महिन्याच्या कालावधीत शासनास सादर करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.




