नाशिक : मागच्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. यामध्ये राज्यातील दोन मोठे पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले. शिवसेनेमध्ये शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना असे दोन गट पडले तर राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी असे दोन गट पडले. आताच्या राजकीय परिस्थितीनुसार कोण कोणत्या पक्षात प्रवेश करेल हे सांगता येणार नाही. आज आपण अश्या एका आमदाराबद्दल जाणून घेणार आहोत. जे शरीराने अजित पवारांसोबत आहेत मात्र त्यांचे काम पाहता त्यांचे मन अजूनही शरद पवारांसोबत असल्याची जाणीव होते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि हे आमदार कोण? आपण ज्यांच्या बद्दल बोलत आहोत त्यांचे नाव आहे नरहरी झिरवळ. सध्या ते नाशिकच्या दिंडोरी मतदारसंघातून आमदार आहेत, तसेच राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत.
या कारणामुळे आले चर्चेत ?
नरहरी झिरवळ हे नाव शिवसेना फुटीनंतर राज्याच्या विधानसभा अध्यक्षांकडे अपात्र आमदारांचे प्रकरण आल्यानंतर राज्यात चर्चेत आलेलं नाव. कारण तेव्हा विधानसभेला अध्यक्ष नसल्याने नरहरी झिरवळ यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा होती आणि निकालाचीही जबाबदारी झिरवळ यांच्याकडेच होती. या सगळ्या प्रकरणानंतर नरहरी झिरवळ मोठ्या प्रमाणात चर्चेत आले.
राष्ट्रवादीमध्ये फूट –
शिवसेना फुटीनंतर राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली. यानंतर राष्ट्रवादीमध्ये अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट निर्माण झाले. यानंतर नरहरी झिरवळ यांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांना साथ दिली. झिरवळ सध्याचे राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिंडोरीतील आमदार आहेत. मात्र सध्या ते अजित पवारांसोबत असले तरीही त्यांचं वर्तन मात्र ते शरद पवारांसोबत असल्यासारखं आहे. याची काही उदाहरणे आहेत. यावरून ते शरद पवारांसोबत असल्याचे दिसून येईल.
शरीराने अजित दादांकडे मन मात्र शरद पवारांकडे –
1) लोकसभा निवडणुकीतही त्यांनी भास्कर भगरे या शरद पवार गटातील उमेदवाराच्या प्रचारात सहभागी झाले होते.
2) आजही त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या होर्डिंगवर आणि वर्तमानपत्रातील जाहिरातींवर शरद पवार यांचा फोटो वापरल्याचे दिसून आले.
3) नरहरी झिरवळ यांनी नाशिक शिक्षक मतदार संघात महायुतीचे उमेदवार असलेल्या संदीप गुळवे यांना जाहीर पाठिंबा दिला. अजित पवार गटाने अर्थात नरहरी झिरवळांच्या पक्षाने नाशिकमध्ये महेंद्र भाऊ सर यांना उमेदवारी दिलेली असताना नरहरी झिरवळ यांनी विरोधी पक्षातील उमेदवार असलेल्या गुळवे यांना पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
4) नरहरी झिरवळ यांनी लोकसभा निवडणुकीतही भाजपच्या भारती पवार यांचं काम न करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांचं काम केले होते.
अजित पवारांचा गेम?
नरहरी झिरवाळ यांच्या या सगळ्या बदलत्या राजकीय भूमिकांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेतेही बुचकळ्यात पडले आहेत. ते शरीराने तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत दिसताहेत मात्र मनाने ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आहेत. हे आता समोर आले आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत झिरवळ कोणत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निवडणूक लढवणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. जर नरहरी झिरवाळ यांनी शरद पवार गटात प्रवेश केला तर तो अजित पवारांसाठी मोठा धक्का असेल.