– अरुण गोखले अवघे विश्व आपले कुटुंबच आहे असा संदेश देणारे तसेच अखिल मानवजातीच्या कल्याणाचा विचार मांडणारे श्रीज्ञानेश्वर महाराज यांचा आज संजीवन समाधी दिन. निमित्याने… धन्य अलंकानगरी, धन्य इंद्रायणी तीर। जिथे समाधिस्त असे, योगीराज ज्ञानेश्वर॥ अशा शब्दात ज्याचे यथार्थ वर्णन केले आहे, असे पुण्य पावन स्थान म्हणजेच आळंदी. येथील श्री संत ज्ञानेश्वराची संजीवन समाधी असणारे हे स्थान. कार्तिक वद्य त्रयोदशी शके बाराशे अठरा. या दिवशी अमृताची पैजा जिंकणार्या, अवघ्या महाराष्ट्रभर भागवत धर्माची पताका फडकविणार्या, भगवत गीतेचा अर्थ सर्व सामान्य जीवांना समजावा म्हणून त्यावर प्राकृत मराठी भाषेत श्रीज्ञानेश्वरी अर्थात भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिणार्या, त्या बालयोगीराजाने जिवंत समाधी घेतली. श्री ज्ञानेश्वर, इंद्रायणीचा मानसपुत्र. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी या दंपतीचा हा दुसरा मुलगा. पहिला निवृती, दुसरा ज्ञानेश, तिसरा सोपान आणि चौथी मुक्ताबाई. आळंदीच्या पवित्र मातीत सुसंस्कृत माता पित्यांच्या पोटी जन्माला आलेले हे खरे तर चार ईश्वरी अवतार. पण तत्कालिन धर्ममार्तंडांनी या मुलांची संन्याशाची मुले म्हणून अवहेलनाच केली. साध्या माणुसकीच्या माधुकरीलाही त्यांना वंचित केले. आपल्या मुलांच्या मुक्तीचा मार्ग मोकळा व्हावा, म्हणून धर्ममार्तंडांनी दिलेली देहांत प्रायश्चिताची शिक्षाही त्या दंपत्तीने स्वीकारली. पण तरीही त्या मुलांना काही समाजाने आपले म्हणून जवळ केले नाही. ज्ञानदेवांनी नेवासे गावात सिद्धेश्वराच्या मंदिरात आपले गुरू निवृत्तीनाथ ह्यांच्या आज्ञेने भगवतगीतेवर प्राकृत भाषेत भाष्य करण्यास सुरुवात केली. भगवतगीतेच्या सातशे श्लोकांवर सुमारे नऊ हजार ओव्यांचे महाभाष्य त्यांनी केले. तो महान ग्रंथ श्रीज्ञानेश्वरी अर्थात भावार्थ दीपिका या नावाने प्रसिद्ध झाला. त्याचे लेखनकार्य हे सच्चिदानंद बाबांनी केले. ते या ग्रंथाचे लेखकू झाले. श्री ज्ञानेश्वरी या ग्रंथात ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग यासह बर्याच गोष्टी ज्ञानदेवांनी सहज सुलभ पद्धतीने आणि परिणामकारक भाषेमध्ये सामान्य लोकांना समजतील अशा पद्धतीने सांगितल्या. त्या वाग्यज्ञांची सांगता हीसुद्धा त्या अवघ्या मानव जातीच्या कल्याणार्थ मागितलेल्या पसायदानाने झाली. मानवतेचा धर्म शिकवला गेला. लोकजागृती, लोककल्याण आणि समाज परिवर्तनाचे मोठे कार्य केले गेले. भागवतधर्माचा पाया घातला गेला. सर्वांसाठी धर्माची, भक्तीची दारे उघडी करून देण्यात आली. या धर्मकार्याला तत्कालिन अठरापघड जातीतील साधू संतांनी आपापल्या परीने हातभार लावला. सर्वत्र एक आगळी वेगळी धर्मक्रांती घडून आली. ज्ञानदेव आणि नामदेव ही नाव ज्याच्या त्याच्या मुखावर नाचू लागली. धर्मस्थापनेसाठी प्रदेशाच्या सीमा ओलांडल्या गेल्या. भारतभर यात्रा केली गेली. घरघरात आणि लोकांच्या मनामनात ज्ञानाचे भक्तीचे, प्रेमाचे दीप लावले गेले. सर्वत्र सुखानंदाची दिवाळी घडू लागली आणि त्याच वेळी अचानक ज्ञानदेवांनी आपल्या संजीवन समाधीची घोषणा केली. तो निर्णय ऐकला मात्र आणि हजारो लाखो मने आक्रंदून उठली. संतांचं प्रेम, नामदेवांचा हट्ट, भावंडांची माया, कुणा कुणालाही तो निर्णय बदलता आला नाही. आपल जीवितकार्य झाल्या बरोबर दृष्टीआड होण्याचा केवढा मोठा निर्णय… आणि अखेर तेव्हढ्याच निश्चयाने केलेली ती त्या निर्णयाची अंमलबजावणी. कार्तिकी वद्य एकादशीच कीर्तन रंगलं. द्वादशीला पारण्याचा कार्यक्रम झाला. आणि कार्तिक वद्य त्रयोदशी शके बाराशे अठरा हा दिवस उजाडला. समाधी स्थानाची पूर्णता झाली. माऊलींनी इंद्रायणीत स्नान केलं, नामदेवांनी ज्ञानदेवांच्या माथी बुक्का लावला आणि आपली भावपुष्पांची माळा त्यांच्या गळ्यात घातली. भगवी वस्त्र परिधान केलेला तो बालयोगी हळूहळू समाधी सुखाच्या वाटेवर वाटचाल करू लागला. सर्वांची अंत:करण कळवळली. समाधीचे स्थान जवळ आले. शिळा दूर केली गेली… माऊलीचं अखेरचं दर्शन घेताना सर्वांच्या नेत्रज्योती पाझरल्या. त्या ज्ञानभास्कराला तसे समाधिस्त होताना पाहून संत नामदेवरायांना तर भर माध्यांनीच सूर्यास्त झाल्यासारखे वाटले. त्यांनी समाधीच्या अभंगात मोठ्या मार्मिकतेने त्या प्रसंगाचे यथार्थ वर्णन केलेले आहे. संजीवन समाधी ही खरंच केवढी मोठी कल्पना. सहजासहजी कोणालाही न मानवणारी, न पेलणारी आणि न रुचणारी सुद्धा. जिवंतपणी घेतलेली समाधी असा साधा अर्थ निदान ज्ञानदेवांच्या या संजीवन समाधीला तरी नक्कीच लावता येत नाही. कारण एका अर्थाने त्या संजीवन समाधीच्या माध्यमातून, त्या चैतन्य चक्रवर्ती ज्ञानराजाला अधिक व्यापक आणि विश्वव्यापक व्हायचे होते जणू. ती ज्ञानदेवांची समाधी ही खर्या अर्थानेच संजीवन आहे. कारण तिच्यातून मिळणार्या ज्ञान, शक्ती, भक्ती आणि प्रेमामृताच्या जोरावरच अवघ्या महाराष्ट्रभर हा भागवत धर्म विस्तारलेला आहे. ज्ञानेशाचे ज्ञानेश्वरीतले तत्त्वज्ञान, बोध, शिकवण ही आता विश्वव्यापक झाली आहे. त्यांनी शिकवलेला मानवतेचा आणि माणुसकीचा धर्म हाच आज विश्वशांतीच्यासाठी जास्त गरजेचा झाला आहे. आजही अनेक शतकांचा काळ लोटला असला तरी इथून पंढरीच्या वारीला जाणारा भक्त भाविकांचा, वारकर्यांचा लोट पाहिला की त्या समाधीतल्या चैतन्याचा तो विश्वात्मक अविष्कार सर्व सामान्यांचे डोळेच दीपवून टाकतो. इथूनच एक अलौकिक ऊर्जा घेऊन असंख्य वारकरी हे वारीला बाहेर पडतात. त्याला ऊन, थंडी, वारा, पाऊस पाणी कशाची तमा नसते. ही शक्ती हे सामर्थ्य कुठून मिळत? त्या माऊलीच्या संजीवन समाधीतून आणि त्यांच्या ‘ज्ञानोबा माऊली तुकारामऽऽ’ या नामातूनच ना? हजारो, लाखो जीवांना ज्ञानामृताची संजीवनी पाजणारी ती समाधी ही खर्या अर्थाने संजीवन समाधीच आहे. तिथल्या चैतन्याने आजही लक्ष लक्ष मनात ज्ञानाच्या ज्योती लावल्या आहेत आणि लावल्या जात आहेत. हरिपाठाच्या सोपानाने मोक्षाच्या मंदिराकडे मार्गस्थ होणारे असंख्य आर्त जीव आजही ती ज्ञानदेवांनी दाखवून दिलेली साधी भोळी भक्तीची वाट ‘हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा’ असे म्हणत चालत आहेत. आर्तजीवाचे खर्या अर्थाने कल्याण करणारी ही समाधी आहे. तिचा अमृतस्पर्श जीवनाचे सोने करणारा आहे. त्या समाधीतून मिळणारी ऊर्जा अनेकांना सन्मार्गाला लावत आहे. ज्ञान, भक्ती आणि मानवता जागवणारी आणि खर्या अर्थाने जीवा शिवाची जोडणी करून देणारी ती संजीवन समाधी खरोखरच जीवनदात्री आहे. ती तशीच पुढेही राहणारच आहे. त्या संजीवन समाधीस्त श्री ज्ञानदेवांच्या सिद्ध चरण कमलांवर विनम्रभावे वाहिलेली ही एक भाव पुष्पांजली.