– प्रा. डॉ. सुभाष राठोड Tukdoji Maharaj : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (Tukdoji Maharaj) यांचा जीवनप्रवास केवळ आध्यात्मिक नव्हे, तर समाज सुधारणा, शिक्षण आणि राष्ट्रनिर्मितीच्या दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचा ठरतो. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याला उजाळा देणे गरजेचे आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (Tukdoji Maharaj) यांचा जन्म 30 एप्रिल 1909 रोजी अमरावती जिल्ह्यातील यावली येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बंडोजी इंगळे व आईचे नाव मंजुळाबाई असे होते. त्यांचे मूळ नाव माणिक बंडोजी इंगळे (ठाकूर) असे होते. त्यांचे शिक्षण तिसरीपर्यंतच झाले, मात्र त्यांनी आत्मिक ज्ञान आणि समाजकार्याचा वारसा मोठ्या श्रद्धेने उचलला. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनाचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते. लहानपणी वरखेड येथे आजोळी असताना त्यांना आडकूजी महाराज हे गुरूस्थानी लाभले. त्यांनी ‘तुकड्या म्हणे’ या शब्दांनी अभंगांची सुरुवात करण्याचा सल्ला दिला आणि त्यामुळे माणिक ‘तुकडोजी’ (Tukdoji Maharaj) या नावाने ओळखले जाऊ लागले. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्रभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. 1935 मध्ये त्यांनी अमरावतीजवळ मोझरी येथे ‘गुरुकुंज आश्रम’ स्थापन केला. या आश्रमाच्या माध्यमातून त्यांनी शिस्तबद्ध कार्यकर्त्यांची फळी तयार केली, जी आजही अखंड सेवा कार्य करत आहे. त्यांच्या कीर्तनातील ‘आते हैं नाथ हमारे’ हे देशभक्तीपर भजन स्वातंत्र्य संग्रामात प्रेरणास्रोत ठरले. Tukdoji Maharaj तुकडोजी महाराजांनी अंधश्रद्धा, जातिभेद आणि सामाजिक विषमतेच्या निर्मूलनासाठी कठोर प्रयत्न केले. त्यांनी धर्माचे स्वरूप सामाजिक समरसतेच्या अनुषंगाने नव्याने मांडले आणि अनावश्यक कर्मकांडांचा निषेध केला. विवेकनिष्ठ एकेश्वरवादाच्या विचारांची ठाम भूमिका घेतली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. ‘ग्रामगीता’ या ग्रंथातून त्यांनी ग्रामीण समाजासाठी वैचारिक मार्गदर्शन केले. या ग्रंथात त्यांनी ग्रामीण लोकांचे वास्तव, त्यांचे प्रश्न आणि त्यावर उपाय यांचा सखोल विचार मांडला आहे. ग्रामगीता म्हणजेच खेड्यांसाठीची दिशा दाखवणारी गीता आहे. तिच्यामध्ये धार्मिकतेपेक्षा सामाजिक जाणिवा, समता, बंधुता आणि सर्व सजीवांवर प्रेमाचा संदेश आहे. या ग्रंथातून आत्मसंयमन, स्वावलंबन, ग्रामोद्योग, ग्रामस्वच्छता, शिक्षण, नैतिकता आणि लोकनेतृत्व या क्षेत्रात प्रभावी उपाय मांडले. त्यांनी ‘भारत हा खेड्यांचा देश आहे’ या तत्त्वावर आधारित सर्वांगीण ग्रामविकासाचे दिशादर्शन केले. गाव सुशिक्षित, सुसंस्कृत व स्वावलंबी व्हावे यासाठी त्यांनी कटिबद्ध प्रयत्न केले. ग्रामोद्योगांना चालना मिळावी, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात आणि प्रत्येक गावात प्रचारकांच्या रूपात सक्षम नेतृत्व तयार व्हावे, अशी त्यांची दूरदृष्टी होती. याचे स्पष्ट प्रतिबिंब ग्रामगीता या त्यांच्या ग्रंथात दिसून येते. त्यांनी देवभोळेपणा, कालबाह्य अंधश्रद्धा आणि रूढी-परंपरांचा अंत व्हावा यासाठी सातत्याने जनजागृती केली. स्त्रियांचे शिक्षण, सन्मान आणि स्वातंत्र्य यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या मते कुटुंब, समाज व राष्ट्र उभे राहण्यासाठी महिला सशक्तीकरण अत्यावश्यक आहे. युवापिढी बलोपासक, नीतिमान आणि व्यसनमुक्त व्हावी यासाठी त्यांनी मार्गदर्शनपर लेखन केले. स्वावलंबन, स्वच्छता, नैतिकता, आत्मनिर्भरता, एकोप्याची भावना, लोकशाही व्यवस्थेवर निष्ठा आणि निसर्गसंवर्धन हे त्यांच्या ग्रामराज्य संकल्पनेचे मूळ घटक. आज ज्या संकल्पना ‘स्मार्ट व्हिलेज’, ‘सस्टेनेबल डेव्हलपमेंट’, ‘ग्रामस्वराज्य’ या नावांनी ओळखल्या जातात, त्यांचे मूळ बीज तुकडोजी महाराजांच्या विचारांमध्येच दडलेले आहे. त्यामुळे त्यांच्या आदर्श ग्रामराज्याच्या संकल्पनेचा अभ्यास आणि अंमलबजावणी ही आजही भारतातील आदर्शवत खेड्यांच्या विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. तुकडोजी महाराजांच्या योगदानामुळे महाराष्ट्रात आणि देशात अनेक सामाजिक सुधारणा घडवून आणल्या गेल्या. त्यांनी शेतकर्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली आणि त्यांना एकजूट करून शेतमालाच्या बाजारभावावर प्रभाव टाकण्यास प्रवृत्त केले. ग्रामगीता ग्रंथामधून ‘आदर्श ग्रामराज्य’ ही संकल्पना मांडली, जी ग्रामीण भारताच्या समग्र आणि शाश्वत विकासासाठी आजही अत्यंत उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरते. त्यांच्या मते, आदर्श ग्रामराज्य म्हणजे फक्त भौतिक सुखसुविधांनी युक्त गाव नव्हे, तर ते एक श्रमशील, स्वावलंबी, नैतिक मूल्यांनी समृद्ध आणि लोकसहभागावर आधारित सामाजिक व्यवस्था असावी. तुकडोजी महाराजांनी ग्रामसभेला अत्यंत महत्त्व दिले. त्यांच्या दृष्टीने ग्रामसभा हीच गावाची खरी संसद असावी, जी लोकशाहीच्या मूल्यांवर आधारित निर्णय घेते. त्यांनी जातीपातीचा, धर्माचा, अंधश्रद्धांचा व सामाजिक विषमतेचा तीव्र निषेध केला आणि सर्व ग्रामस्थांनी परस्पर सन्मान व बंधुभावाने वागावे, असे सांगितले. शिक्षणाच्या संदर्भात त्यांनी असे प्रतिपादन केले की, ते केवळ पुस्तकी न राहता जीवनोपयोगी, नैतिकता-आधारित व समाजोन्मुख असावे. गावात सर्वांसाठी आरोग्य, स्वच्छता आणि रोजगार यांची हमी असावी, तसेच ग्रामस्थांनी नियमितपणे श्रमदान करावे आणि गावच्या विकासात सहभाग घ्यावा, हे त्यांनी अनेक ठिकाणी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले. तुकडोजी महाराज हे आधुनिक भारतातील एक महान संत, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी 1942 च्या ‘भारत छोडो आंदोलनात’ सक्रिय सहभाग घेतला आणि अटकही सहन केली. त्यांनी स्वातंत्र्य लढ्याला फक्त राजकीय लढा न समजता, तो सामाजिक क्रांती समजून जनजागृती घडवली. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये विपूल काव्यरचना केली. त्यांची ग्रामगीता, अनुभव सागर भजनावली, सेवास्वधर्म, राष्ट्रीय भजनावली इत्यादी साहित्यरचना प्रसिद्ध आहे. ‘लहर की बरखा’ हे त्यांचे हिंदीतील महत्त्वाचे पुस्तक आहे. तुकडोजी महाराजांचे कार्य हे केवळ संत म्हणून मर्यादित नसून, ते एक युगद्रष्टे समाजसुधारक आणि विचारवंत होते. त्यांनी संतपरंपरेला नवचैतन्य दिले. परंपरेचा आदर राखत नवसृजनाची दिशा दाखवली. त्यामुळेच राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी त्यांना ‘राष्ट्रसंत’ ही उपाधी बहाल केली. आजही अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ त्यांचे विचार समाजात पोहोचवत आहे. तुकडोजी महाराजांचे कीर्तन, लेखन आणि सामाजिक कार्य हे विचारांची शुद्धता, कार्याची नैतिकता आणि मानवतेची जाणीव देणारे आहेत. त्यांच्या जीवनाचे तेज आजही समाजाला दिशा देत आहे. त्यांचे विचार हे काळाच्या कसोटीवर उतरलेले, आजच्या काळातही तितकेच प्रभावी आहेत. महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना केवळ अभिवादन नव्हे, तर त्यांच्या विचारांचे अनुकरण करणे हीच खरी आदरांजली ठरेल.