– विठ्ठल वळसे पाटील विविध विकासकामांच्या नावाखाली जंगले नष्ट केल्यामुळे वन्यजीव धोक्यात आले आहे. अधिवासच नाहीसा झाल्यामुळे वन्यजीव नामशेष होत आहेत. जंगले वाचली तरच वन्यजीव वाचतील. 3 मार्च हा जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा केला गेला. त्यानिमित्त… दिवसेंदिवस मानवी वस्तीवर बिबट, वाघ, लांडगे, कोल्हे यांचे हल्ले होत असल्याच्या बातम्या वाचण्यात येतात. हे वन्यजीव जंगल, वन, अभयारण्य सोडून बाहेर आले कसे? याची वन विभागाने शास्त्रीय चिकित्सा केली पाहिजे. जेव्हा वन समृद्ध होतील तेव्हा वन्यजीवांचे आश्रयस्थान निश्चित होईल. अन्यथा मानवी वस्ती हीसुद्धा त्यांची वस्ती असेल हे आज वास्तव आहे. भारत हा उष्ण कटिबंधीय प्रदेश असल्याने तीनही ऋतूंचे वैशिष्ट्ये महत्त्वपूर्ण आहे. ऊन्हाच्या झळांमुळे जंगल, वन व डोंगर, टेकडी माथ्यावरील वाढलेले गवत, इतर लहान झुडपे वाळली आहेत. सध्या अनेक डोंगर रांगाना आगी लागत आहेत. यात अनैसर्गिक व नैसर्गिकरीत्या वणवे लागून जंगले, त्यातील उपयुक्त वनस्पती, औषधी वनस्पती, पशु, पक्षी, कीटक, नष्ट होत चालले असून ते रोखण्यासाठी केवळ वनविभाग जबाबदारी पेलू शकत नाही. नागरी सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. वणवा लागण्याबाबत अनेक लोकांत व डोंगर दर्यात राहणार्या रहिवाशांमध्ये गैरसमज असतात. ते अनेक वर्षानुवर्षे तसेच आहेत. डोंगर भागात दैवी शक्तीमुळे आग लागते, आग लागल्याने नवीन गवत कुरण चांगले वाढते, हिरवळ मोठ्या प्रमाणात वाढते, झाडांना चांगली पालवी फुटते, पुढील हंगामात तेंदूच्या पानांचा आकार वाढावा म्हणून गडचिरोलीसारख्या भागात कृत्रिम वणवे लावतात, जंगलात वावरणे व शिकार करणे सोपे जाते अशा काही भाकड कारणांमुळे जंगलामधील नव्याने उगवण झालेली झाडे, झुडपे, पक्ष्यांची घरटे, अंडी, नवजात पिल्ले, सरपटणारे प्राणी आगीत होरपळले जातात. वन्यजीव मानवी वस्तीकडे का येऊ लागले हा प्रश्न महत्त्वाचा आहे. 9 डिसेंबर व 22 डिसेंबर 2020 रोजी पुण्यात रानगवा आला कसा? गवा हा प्राणी हिंस्र नसून तो गवत खात असल्याने तो तसा समुहाने राहणारा, लाजाळू स्वरूपाचा आहे. त्यास गायी-म्हशींच्या शिंगांसारखीच शिंगे असतात. सहसा इजा न करणारा पण हल्ला झाल्यावर, गोंधळ झाल्यावर सैरभैर होऊन जातो. तेच त्याच्या बाबतीत घडले. वन्यपशू, पक्षी मानवीवस्तीकडे कसे आले व ते पुन्हा नैसर्गिक अधिवासात कसे जातील याचे प्रात्यक्षिक नागरिकांना माहीतच नसल्याने बघ्यांची गर्दी त्यात फोटो काढण्यासाठी सरसावलेले मोबाइल, नागरिकांचा गोंधळ, गर्दी, सिमेंटच्या जंगलातून वाट काढीत वाट फुटेल त्या मार्गाने तो पळत सुटला. सातशे किलो वजनाच्या जवळपास असलेला हा जीव एकदाचा दमला. त्यात सहा तास हूल देऊन, झुंज देऊन अखेर त्याने जीव सोडला. त्यानंतर अनेकांचे प्राणीप्रेम उफाळून आले होते. नको त्या चर्चा रंगल्या होत्या, त्याच्या माफीचे बॅनरही लागले होते. अशा मंडळींनी कधी वन्यपशू, पक्षी संवर्धनाबाबत एक पाऊल उचलले नसते. मात्र प्राणी मात्रावर प्रेम करायला कधी शिकणार हा प्रश्न प्रत्येकाने आपल्या मनाला विचारला पाहिजे. वन, अभयारण्य तसेच माळरानाची समृद्धता वाढवणे, त्यांची संख्या वाढवणे हे दोन मूळ उद्देश ठेवून वन्यजीव संवर्धनाकडे पाहिले पाहिजे. जंगलांचे रुपांतर विकासाच्या नावाखाली सिमेंटच्या जंगलात होत गेले. वाढत्या शहरीकरणामुळे शहराच्या लगतचे जंगल नष्ट होत गेले. अशा परिस्थितीत वन्यजीव राहणार तरी कुठे? ते मानवी वस्तीकडे अतिक्रमण करणार हे स्वाभाविक आहे. विकासाच्या नावाखाली वन्यजीवांच्या अधिवासावर कधी घाला घातला गेला हे लक्षातच आले नाही. सध्या बदलत्या हवामानामुळे, विकासाच्या नावाखाली अफाट जंगल तोड त्यामुळे वने, डोंगर, दरी व रानातील जैवविविधता नष्ट झाली. त्यामुळे अन्नसाखळी तुटली. अन्न व पाणी शोधात भटकंती करत कधी मृत्यूला सामोरे जात तर कधी शेतपीक, पशुधनावर हल्ले होऊ लागले. जंगलातील पशू, पक्षी त्यांचा अधिवास सोडून मानवी वस्तीकडे अतिक्रमण करू लागले. समृद्ध वने निर्माण करताना अन्नसाखळी टिकवण्यासाठी तसेच वन, जंगलातील मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी नियमावली आवश्यक आहे. भारतात दरवर्षी 14 लाख हेक्टर जंगलतोड होते. त्यामुळे जंगल विकासात स्थानिक नागरिकांनी व स्वराज्य संस्थांनी सहभाग घेतला पाहिजे. तर भविष्यात मानवी वस्तीवरील अतिक्रमण रोखण्यात यश येईल. हिंस्र पशू वन सोडून बाहेर कसे येऊ लागले याचे उत्तर शोधणे आवश्यक आहे. वारंवार लागणार्या वणव्याने अनेक औषधी व चारायुक्त वनस्पती जळून नष्ट झाल्या. मृत झालेले सरपटणारे प्राणी, रानससे, घोरपड, खोकड, माकड, रानडुक्कर, मुंगूस, खार, शेखरू खार, खवले मांजर, साळींदर, हरणांचे कळप असे प्राणी झपाट्याने नाहीसे होत आहेत. या प्राण्यांवर जगणारे बिबट, वाघ, लांडगा, तरस व कोल्हा हे प्राणी जंगल सोडून मानवी वस्तीकडे येऊ लागले. मानवी वस्तीमध्ये संचार करताना रस्ते, विहीर, कुंपण यातील अपघात, शिकार व उपासमारीमुळे अनेक प्राण्यांचे दरवर्षी मृत्यू होतात. वन, जंगल, डोंगरमाथ्यावरून जाणारे रस्ते, प्रकल्प अशा विकास योजनांमुळे 120 वनौषधी वनस्पती संकटग्रस्त झाल्या आहेत. असा जंगलावरील मानवी अतिक्रमणाचा विळखा घातकच ठरणार आहे. हे चक्र नाहीसे करावयाचे असेल, तर वन्यजीव संवर्धनासाठी आणि वनसंपदा राखण्यासाठी लोकसहभाग हा हवाच आहे.