– उज्ज्वला शिंदे Editorial : चिमणीच्या संरक्षणाची अन् संवर्धनाची आवश्यकता (Editorial) लक्षात घेता, विनाशाला कारणीभूत असलेल्या मानवानेच चिमणीच्या पुनर्संवर्धनासाठी प्रयत्नशील होणे गरजेचे आहे. आज जागतिक चिमणी दिनानिमित्ताने… अतिपरिचयाची वस्तू म्हणून आपण नेहमीच एखाद्या घटकाचा अनादर करीत असतो. परंतु आपण भानावर तेव्हा येतो जेव्हा सहज वा सढळपणे उपलब्ध असणारी ती वस्तू वा घटक दुर्मिळ वा दुर्लभ झाल्याचे आपल्या लक्षात येते. तेव्हा आपसूकच (Editorial) आपल्याला अंतर्मनातून त्या घटकाबद्दल एकप्रकारची ओढ, हुरहुर वाटायला लागते, ही सहज मानवी प्रवृत्ती आहे. एखाद्या गोष्टीची उणीव निर्माण झाली की त्याबद्दलची जाणीव अधिक वाटू लागते. असेच काहीतरी आपल्या अवतीभोवती सहजतेने आढळत होत्या अशा ‘चिमणी’ या पक्ष्याबाबत झाल्याचे लक्षात येईल. कित्येकांना तर याची जाणीवही झालेली नसेल की चिमणी हा चिमुकला जीव दुर्मिळ होत चालला आहे आणि म्हणूनच चिमण्यांच्या संवर्धनासाठी आणि निसर्गचक्रातील तिच्या अस्तित्वाचे महत्त्व प्रतिपादन करण्यासाठी, समाजात जनजागृती करण्यासाठी 20 मार्च हा दिवस ‘जागतिक चिमणी दिन’ म्हणून साजरा केला जातो. लहान बालकाला अगदी त्याच्या अन्नग्रहणापासून जर कुठल्या पक्ष्याची ओळख आपण करून देत असू तर तो पक्षी म्हणजे ‘चिमणी’ होय. लहान बालकांसाठी ती ‘चिऊताई’ म्हणून परिचयाची असते. कावळ्याच्या तुलनेत चिऊताई नेहमीच प्रामाणिक, सालस आणि मायाळू म्हणून मुलांच्या मनावर प्रतिबिंबित केली गेली आहे. मग ती कवितेच्या रूपात असो किंवा ‘चिऊताई चिऊताई दार उघड’ यासारख्या कथांच्या रूपाने असो. लहान मुलांच्या भावविश्वाशी अतूट नाते सांगणार्या अनेक घटकांपैकी चिऊताई ही नेहमीच जिव्हाळ्याची अन् आत्मियतेची बाब ठरलेली आहे. चिऊताई आणि तिची पिलं यांच्यातील वात्सल्यभाव आई आपल्या मुलाला घास भरविताना नेहमीच जगत आणि बालकाला जगवत आली आहे. परंतु अशा या चिऊताईचे अस्तित्व आज धोक्यात आले आहे. मानव हा अन्नसाखळीचा एक घटक आहे. परंतु मेंदूचा वापर करून आपण निसर्गावर सत्ता गाजवू शकतो ह्या उन्मादात तो निसर्ग, झाडे, पशुपक्षी यांना विसरत चालला आहे. Editorial ह्या पशु-पक्ष्यांच्या अधिवासाचे स्थान असलेली जंगले मोठ्या प्रमाणात नष्ट केली जात आहेत. वास्तविक पाहता पक्ष्यांचे परिसंस्थेतील स्थान महत्त्वाचे आहे. परागीभवन, बियांचे वाहक, कीटक भक्षी, इतर प्रजातींचे खाद्य अशा वेगवेगळ्या भूमिका हे पक्षी निभावत असतात. नैसर्गिक जंगल उभे करण्यामध्ये पक्ष्यांचा हातभार असतो, यामुळे जंगलाचे आरोग्य राखले जाते. परंतु काळाच्या ओघात आधुनिकीकरण आणि औद्योगीकरणामुळे पक्ष्यांचे अधिवास नष्ट होत आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे लोकांच्या निवासासाठी, शेतीसाठी तसेच विकासासाठी दळणवळणाच्या सुविधेसाठी माणसांकडून अरण्याचा, नदीचा, तलावांचा तसेच समुद्राचा उपयोग केला जात आहे. त्याचे पर्यावसन पक्ष्यांची निवासस्थाने नष्ट वा विरळ होण्यात झाले. शेतीच्या उत्पादनात दिवसेंदिवस वाढ व्हावी यासाठी मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांचा उपयोग केला जातो आहे. कीटक तर पक्ष्यांसाठीचे भक्ष्य आहेत. त्यांची कमतरता झाली अथवा ते रासायनिक फवारणीमुळे विषमय झाले असता अशा कीटकांना खाऊन पक्षी मृत पावण्याचे प्रमाण वाढले आहे. पाण्याचे नैसर्गिक स्रोतसुद्धा मानवी हस्तक्षेपाने मलीन झाले आहेत. कृषी क्षेत्राच्या विस्तारामुळे वनांचा नाश होऊन जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होत आहे. पृथ्वीवरील माती पावसाच्या पाण्यासोबत नदीपात्रात जाऊन नदीचे पाणी दूषित करीत आहेत. मानवाने निर्माण केलेल्या धरणामुळे असंख्य जलचरांचे निवासस्थान नष्ट होत आहे. त्या जलचरांवर उपजीविका चालविणारे पक्षीसुद्धा भुकेने त्रासले आहे. तहान भुकेने व्याकुळ होऊन ते प्राणाला मुकत आहेत. तसेच पाणथळीच्या जागांचा अभाव अशी अनेक कारणे ह्या पक्ष्यांच्या विनाशाला कारणीभूत ठरलेली आहेत. उत्क्रांती साधणार्या प्रगतिशील मानवाने बुद्धीने सुविधा मिळविण्यासाठी आपल्या गरजा भागविण्यासाठी निसर्गचक्रात हस्तक्षेप केला आहे. निसर्गातील इतर घटकांप्रमाणे आपणही एक घटक आहोत आणि आपल्या प्रमाणेच इतर सजीवांसाठी प्राणी आणि वृक्षांसाठीसुद्धा जल, स्थल, वायू या संसाधनाची आवश्यकता असते. याचा मानवाला विसर पडलेला आहे. काळाच्या ओघात आत्मकेंद्रित वृत्तीमुळे माणसाच्या अज्ञानतेमुळे, हिंसेने, जिभेचे लाड पुरवण्यासाठी म्हणून वा उपभोग परायण वृत्तीमुळे पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे. झाडे, वेली, फुले, फळे, पक्षी आणि प्राण्यांच्या विविधतेमुळे हे जग शोभायमान आहे. प्रात:काली पक्ष्यांच्या कर्णमधुर ध्वनीने संगीतमय झालेली सकाळ काळाच्या ओघात हरवत चालली आहे. आज चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. चीनने 1958-62 च्या दरम्यान चार कीटक मोहीम राबवली. त्यात पिकांचा नाश करणार्या घटकांना नष्ट करायचे ठरवले. यामध्ये चिमणी पक्ष्याचा समावेश होता. चीनमध्ये सांस्कृतिक क्रांतीच्या काळात सुरू झालेल्या या चिमण्या मारण्याच्या अभियानामुळे चीनमध्ये चिमण्या जवळजवळ संपुष्टात आल्या. ज्याचा परिणाम गंभीर पर्यावरणीय असंतुलनात झाला. पुढची बरीच वर्ष चीनमधील लोकांना उपासमारीला सामोरे जावे लागले. परंतु त्यामुळे पर्यावरणापुढे उभे राहू शकणारे धोके लक्षात आले. तेव्हा जागतिक स्तरावर झालेल्या विचार मंथनातून चिमणीच्या संरक्षण आणि संवर्धनाचा विचार व्यक्त झाला. भारतात त्याची सुरुवात नेचर फॉर एव्हर सोसायटीने 20 मार्च 2010 मध्ये पहिला चिमणी दिन साजरा करून केली. अन्नसाखळीतील मूलभूत घटकापुरतेच (Editorial) पक्ष्याचे सृष्टीतील स्थान महत्त्वाचे ठरत नाही तर आपल्या रंग, आकार, ध्वनी आणि गतिमानता या सर्व वैशिष्ट्यामुळे पक्ष्यांनी सृष्टीला बहुरंगी बनविले आहे. म्हणून चिमण्याच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी उपाययोजना करणे आणि आपल्या भावी पिढीला कवितेपुरतीच मर्यादित राहिलेल्या चिऊताईची पुनर्भेट घडून आणणे ही मोठी देण ठरेल. तेव्हा चिमणी संवर्धनासाठी कटिबद्ध होऊया आणि अंतर्मनातून साद घालूया, या चिमण्यांनो परत फिरा रे…