विशेष : केशवराव जेधे

संताजी जेधे

केशवराव जेधे यांची आज 125वी जयंती. त्यानिमित्त… महात्मा गांधी क्रांतिकारक विचारांचे होते. केशवराव जेधे यांच्यावर गांधीजींच्या कार्याचा फार मोठा पगडा होता. तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगांत “जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा’ असे नमूद केले आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे समाजात अन्यायाचा प्रतिकार करणारे तयार झाले पाहिजेत, अशी हाक निघत होती. या मागणीप्रमाणे महाराष्ट्रात निधड्या छातीने, त्यागी वृत्तीने, कष्ट, जोखीम उचलून पुढे आले असेल तर ते केशवराव जेधे घराणे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेने आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने जी घराणी नावारूपास आली त्यामध्ये प्रामुख्याने पुण्यातील कान्होजी जेधे घराण्याचा उल्लेख करावा लागेल. त्याच जेधे घराण्यामधील केशवराव जेधे होत.

महात्मा फुले व छत्रपती शाहू महाराजांची प्रेरणा घेऊन सत्यशोधक चळवळीचे व सामाजिक चळवळीचे नेतृत्व केशवराव यांनी केले. सत्यशोधक केशवराव जेधे यांचा विवाह सत्यशोधक पद्धतीने साधेपणाने पार पडला.

केशवराव जेधे यांचे जीवन झंझावातासारखे होते. अल्पायुष त्यांना लाभले. अवघ्या 12-14 वर्षांत त्यांनी आपल्या लेखणीने, वक्‍तृत्वाने बहुजन समाजात प्रचंड जागरुकता निर्माण केली होती. कैवारी, तेज, तरुण मराठा, मजूर इत्यादी पत्र काढले. यावेळी त्यांचेबरोबर जिव्हाळ्याचे सहकारी ग. गो. जाधव, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे असायचे.

विठ्ठल रामजी शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रहास जेधे यांनी पाठिंबा दिला. 1925चा काळ कर्मठ आणि सनातनी विचारांचा काळ होता. केशवराव हे पुणे नगरपालिकेचे सदस्य होते. नगरपालिकेचे पाण्याचे हौद व नळ अस्पृश्‍यांना खुले करावेत, असा ठराव त्यांनी मांडला. 

अर्थात, हा ठराव नामंजूर झाला. महात्मा फुले या आद्यसमाज क्रांतिकारकाचा पुतळा उभा करावा, असाही ठराव जेधे यांनी मांडला. नगरपालिकेत बहुसंख्य नगरसेवक बहुजन समाजाचे होते. तरीही तो नामंजूर झाला. आजचा महानगरपालिकेतील जो महात्मा जोतिराव फुले यांचा पुतळा आहे तो बसवण्याकरिता केशवराव जेधे यांनी आंदोलन केले. 

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर व तुकडेबंदी विधेयकाविरुद्ध त्यांनी चळवळ केली. त्यावेळी केशवराव यांचे वय जेमतेम 30 वर्षांचे होते. सविनय कायदेभंगाच्या चळवळीत जेधे यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली. गोलमेज परिषदविरुद्ध ठराव मांडल्यामुळे त्यांना सक्‍त मजुरीची शिक्षा झाली. “चले जाव’ आंदोलनात केशवराव व काकासाहेब गाडगीळ यांना अटक होऊन दोन वर्षे शिक्षा झाली. केशवराव हे महाराष्ट्र प्रांतिकचे 1937 व 1946 दोन वेळा अध्यक्ष झाले. संयुक्‍त महाराष्ट्र समितीचे ते पहिले अध्यक्ष होते.

सत्यशोधक चळवळ, सामाजिक चळवळ, शेतकरी कामगार चळवळ, संयुक्‍त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्‍ती आंदोलन, अस्पृश्‍यता निर्मूलन चळवळ, स्वातंत्र्य आंदोलन इत्यादी विविध चळवळीमधील त्यांच्या कार्याचे योगदान आजच्या तरुण पिढीस स्फूर्तिदायी असे आहे. स्व. केशवराव यांच्या 125व्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.