– प्रा. डॉ. सुभाष राठोड World Book Day : दरवर्षी 23 एप्रिल रोजी ‘जागतिक पुस्तक दिन’ (World Book Day) साजरा केला जातो. या दिनानिमित्त पुस्तकांचे महत्त्व, वाचन संस्कृतीचे बदलते स्वरूप आणि आजच्या काळातील त्याची आवश्यकता यांचा वेध घेणारा हा लेखनप्रपंच… मानवी संस्कृतीच्या विकासाचा इतिहास पाहिला, तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे ज्ञानाचा सतत चालू असलेला प्रवाह. या प्रवाहाला दिशा देणारे, त्याला साठवून ठेवणारे आणि पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणारे सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे पुस्तक (World Book Day). काळ बदलला, साधने बदलली, तंत्रज्ञान झपाट्याने पुढे गेले; तरीही विचारांची मांडणी, अनुभवांची देवाणघेवाण आणि ज्ञानाची परंपरा जपण्याचे कार्य आजही पुस्तकांद्वारेच प्रभावीपणे घडते. आजच्या डिजिटल युगात माहितीचा महापूर ओसंडून वाहत असला, तरी ज्ञानाची खरी खोली आणि चिंतनाची सखोलता पुस्तकांतच (World Book Day) सापडते. म्हणूनच वाचनसंस्कृती जपणे आणि वाढवणे ही केवळ वैयक्तिक नव्हे, तर सामाजिक जबाबदारी ठरते. माणूस जन्मतः ज्ञानी नसतो; पण त्याच्यात विचार करण्याची, समजून घेण्याची आणि स्वतःला घडवण्याची अद्भुत क्षमता असते. World Book Day या क्षमतेला आकार देणारे सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे पुस्तक. ‘जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन’ म्हणून ओळखल्या जाणार्या या उपक्रमाचा उद्देश वाचनसंस्कृती रुजवणे, प्रकाशन क्षेत्राला चालना देणे आणि लेखकांच्या सर्जनशील कार्याचा सन्मान करणे हा आहे. जागतिक पुस्तक दिन हा प्रामुख्याने ख्यातनाम साहित्यिक, प्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपिअर, स्पॅनिश साहित्यातील दिग्गज लेखक मिगेल डी सर्व्हांटिस यांसारख्या प्रख्यात लेखकांच्या स्मृतींशी निगडित आहे. विशेष म्हणजे, या थोर लेखकांचा जन्म किंवा मृत्यूदिन 23 एप्रिल आहे. या जागतिक साहित्यातील योगदानाला अनोखी श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी युनेस्कोने 23 एप्रिल हा दिवस ‘जागतिक पुस्तक दिन’ म्हणून घोषित केला आहे. हा दिवस पहिल्यांदा 23 एप्रिल 1923 रोजी स्पेनमधील पुस्तक विक्रेत्यांनी साजरा केला होता. स्पेनमध्ये मिगेल डी सर्व्हांटिसच्या स्मरणार्थ साजरा करण्यात आला. त्यानंतर 1995 मध्ये पॅरिस येथे युनेस्कोची सर्वसाधारण सभा पार पडली, ज्यामध्ये जगभरातील लेखकांना आदर आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि पुस्तकांमध्ये अर्थात वाचनामध्ये रस निर्माण करण्यासाठी जागतिक पुस्तक दिन दरवर्षी 23 एप्रिल रोजी साजरा केला जाईल, असा निर्णय घेण्यात आला. आजच्या वेगवान युगात, मोबाइल, इंटरनेट आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) झंझावातात आपण तांत्रिकदृष्ट्या जितके जवळ आलो आहोत, तितकेच संवादाच्या पातळीवर दुरावत चाललो आहोत. या आभासी विश्वाच्या गलबल्यात एक अस्वस्थ करणारी पोकळी निर्माण झाली आहे, ती म्हणजे समृद्ध ‘वाचनसंस्कृती’ची लागलेली ओहोटी. अक्षरांशी जडलेले नाते आणि ग्रंथांमधून मिळणारा विचारांचा प्रगल्भ वारसा आता डिजिटल पडद्यांच्या लखलखाटात हरवत चालला आहे. पूर्वी गजबजलेली वाचनालये आज ओस पडत चालली आहेत, ग्रंथालयातील पुस्तके वर्षानुवर्षे एका जागी न हलता शांतपणे वाचकांची वाट पाहत उभी आहेत. हे चित्र केवळ चिंताजनक नाही, तर सामाजिक-सांस्कृतिक संकटाची चाहूल देणारे आहे. ज्ञानाच्या वाटेवरून स्क्रीनच्या वाटेवर, सोशल मीडियाच्या आक्रमणामुळे विद्यार्थी अवांतर वाचन विसरत चालले आहेत. तात्काळ मनोरंजनाच्या आहारी गेलेली ही पिढी विचार करण्याऐवजी पाहण्यात आणि फॉरवर्ड करण्यात रमू लागली आहे. परिणामी, चिंतनशील वाचनाची गोडी कमी होत चालली आहे. पण याचक्षणी आपण जरा थांबून विचार करायला हवा. ज्ञान हीच खरी शक्ती आहे, हे आपण विसरत तर नाही ना? चांगले वाचन आणि उत्तम विचार यांच्या सहवासातून मनाची शुद्धी होते, भाषेची समृद्धी वाढते आणि वक्तृत्वाला धार येते. वाचनही केवळ माहिती मिळवण्याची प्रक्रिया नाही, तर ती जीवनाला उन्नत करणारी साधना आहे. मनावरील ताण कमी करण्यासाठी, निराशेच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी पुस्तकांचा सहवास अत्यंत प्रभावी ठरतो. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, पुस्तकाने अशक्त मस्तक सशक्त होते, आणि सशक्त मस्तक कोणासमोरही नतमस्तक होत नाही. स्वामी विवेकानंद, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, भगतसिंग यांसारख्या महापुरुषांच्या जीवनाला वाचनानेच नवी दिशा दिली. आज वाचनाच्या (World Book Day) अभावामुळे समाजातून नैतिक मूल्ये हरवत चालली आहेत. त्यामुळे नव्या पिढीने पुन्हा एकदा वाचनसंस्कृतीकडे वळणे ही काळाची गरज आहे. ‘वाचाल तर वाचाल’ या उक्तीप्रमाणे तरुण पिढीला वाचवायचे असेल, तर त्यांच्या मनात वाचनाची गोडी रुजवणे अत्यावश्यक आहे. शासनाने ‘वाचनप्रेरणा अभियान’, ग्रंथालयांसाठी निधी, ‘वाचनदूत’ संकल्पना, अभ्यासक्रमात वाचनसूची, ‘वाचनग्राम’ पुरस्कार, तसेच नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया, राष्ट्रीय ई-पुस्तकालय, ग्रंथम, शोधगंगा, दीक्षा, ई-बालभारती यांसारख्या डिजिटल साधनांचा प्रसार यांसारखे उपक्रम राबवणे आवश्यक आहे. यामुळे वाचन अधिक सुलभ, आकर्षक आणि सर्वसमावेशक होईल. स्पेनमध्ये गुलाब आणि पुस्तकांची देवाणघेवाण, जगभरात बुकफेअर्स, लेखकभेटी, कथाकथन कार्यक्रम यासर्व उपक्रमांतून वाचनाचा उत्सव साजरा केला जातो. भारतातही हा उपक्रम व्यापक प्रमाणात राबवला गेला पाहिजे. माणसाला माणूस म्हणून घडवण्याची ताकद साहित्यात असते. जेव्हा एखादा वाचक पुस्तक हातात घेतो, तेव्हा तो केवळ शब्द वाचत नाही, तर तो एका नव्या संस्कृतीशी, एका वेगळ्या विचारधारेशी आणि प्रगल्भ अशा जीवनदृष्टीशी एकरूप होत असतो. कठीण काळात जगण्याला उभारी देणारे, वैचारिक गोंधळात दिशा दाखवणारे आणि कोरड्या होत चाललेल्या मनात संवेदनशीलतेचा पाझर फोडणारे पुस्तक हे एक अमोघ माध्यम आहे. आजच्या आभासी जगात पुस्तकेच आपल्याला आपल्या अस्तित्वाच्या मुळांशी जोडून ठेवतात. कोणत्याही समाजाची प्रगती ही भौतिक सुखांवरून नव्हे, तर तिथल्या समृद्ध ‘वाचन संस्कृती’वरून मोजली जाते. म्हणूनच पुस्तक हे केवळ बुद्धी घडवणारे साधन नसून, माणुसकी जपणारे एक संजीवनी अमृत आहे. वर्तमानपत्र वाचनातून सामाजिक जाणीव विकसित होते. वाचन माणसाला सर्वगुण संपन्न बनवते आणि नैतिक मूल्यांची पायाभरणी करते. मोबाइलच्या स्क्रीनवर क्षणभंगुर जग दिसते; पण पुस्तकांच्या पानांतून आयुष्य समजते. एक पुस्तक हातात घेऊया आणि स्वतःला नव्याने घडवण्याचा संकल्प करूया!