– डॉ. आश्लेषा मुंगी जगभरात मानवी हक्काचे रक्षण करणे, त्याबाबत जागृती निर्माण करणे यासाठी दरवर्षी ‘जागतिक मानवी हक्क दिन’ साजरा केला जातो. आजच्या बदललेल्या डिजिटल जीवनात मात्र मानवी हक्काची पायमल्ली होत आहे. बदललेल्या परिस्थितीनुसार सर्वांना जगण्याचे स्वातंत्र्य उपभोगता यायला पाहिजे. आज जागतिक मानवी हक्क दिन आहे. त्यानिमित्ताने… संयुक्त राष्ट्रांनी 10 डिसेंबर 1948 रोजी मानवी हक्कांची सार्वत्रिक घोषणा स्वीकारली. भाषा, धर्म, लिंग, आर्थिक स्तर यांच्या पलीकडे प्रत्येक व्यक्तीला समान हक्क मिळणे आवश्यक झाले. या सर्वांमागे एकच महत्त्वाचा उद्देश म्हणजे जीवनाचा हक्क, शिक्षणाचा हक्क, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि भेदभाव मुक्त समाज. समाजातील सर्व घटक महिला, वंचित समाज गट यांच्या हक्कांच्या जनजागृतीसाठीचा हा महत्त्वाचा दिवस आहे. मानवी हक्कांचे रक्षण केले तर लोकशाही अधिक मजबूत होते. प्रत्येक व्यक्तीचा आदर सन्मान हीच मानवी हक्कांची खरी व्याख्या. प्रत्येक व्यक्तीने स्वतःचे हक्क जाणून घेणे, इतरांच्या हक्काचे रक्षण करणे आणि समाजात समानतेची वृत्ती वाढवणे हे माहीत करून घेऊन प्रत्यक्षात अंमलबजावणी केली पाहिजे. आजचा मानवी हक्क दिवस जगाला सहिष्णुता, बंधुता आणि एकतेचा संदेश देतो. मानव हक्कांची जागरूकता शाळा, महाविद्यालयापासूनच निर्माण होणे गरजेचे आहे. आजचा दिवस म्हणजे मानवी अस्तित्वाची, सन्मानाची आणि स्वातंत्र्याची आठवण करून देणारा दिवस. 1948 मध्ये मानवाधिकारांचे सार्वत्रिक घोषणापत्र स्वीकारले गेले तेव्हा जगभर युद्धाचे वणवे ओसरत होते आणि मानवाने माणसाला दिलेल्या जखमा ताज्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मानव समान, प्रत्येकाला जगण्याचा, व्यक्त होण्याचा हक्क आहे ही घोषणा म्हणजे मानवतेचा नवा श्वास होता. आज तंत्रज्ञान मानवतेवर मात करू पाहत आहे. मानवी आयुष्य सोपे सोयीचे करता करता दिवसेंदिवस या सोशल मीडियाच्या मायाजाळमध्ये अडकत जात आहे. माणसातल्या मनामनातलं अंतर वाढत आहे. माणसातल्या प्रत्यक्ष आयुष्यातले संवाद क्षीण होत आहेत. असमानता ठायी ठायी दिसते. काहींना अमर्याद संधी मिळाल्या तर काही अजूनही मूलभूत हक्कांसाठी झगडत आहेत. विचार विनिमय हे लोकशाहीचे सौंदर्य असताना मतभिन्नतेवरून तणावाची परिस्थिती निर्माण होत आहे. तंत्रज्ञानाच्या साथीने तो प्रगतीपथावर मार्गक्रमण करतोय पण दुसर्या बाजूला भावनिक थकवा, ताण, नात्यांमध्ये आलेला दुरावा यामुळे अस्थिरतेचे वातावरण निर्माण होत आहे. अधिकारांविषयी जागरूकता वाढली आहे पण आपल्या अधिकारांइतकेच इतरांच्या अधिकारांची जाणीव ठेवणे ही खरी मानवतेची परीक्षा अजूनही अनेकांना अवघड जाते आहे. मानवी हक्क दिवसाच्या निमित्ताने प्रत्येक मानवाने स्वतःला असा प्रश्न विचारला पाहिजे, मी फक्त माझे हक्क मागतोय की इतरांच्या हक्काचेही जतन करतोय? कारण समाज बदलतो तो बदललेल्या नुसत्या कायद्यांमुळे नाही तर प्रत्येक व्यक्तीने मानवी मूल्यांना दिलेल्या महत्त्वामुळेच. प्रत्येक व्यक्तीच्या संवेदना, समानता यांना आदर देऊन मानवी मूल्याची जपणूक करणे ही काळाची गरज आहे. स्वातंत्र्याचा हक्क मिळालेला असला तरी तो वापरण्याची मोकळीक काही वेळा अडचणी निर्माण करत आहे. आजच्या काळातला समाज आणि माणूस यांच्यातील बदल पाहता या हक्कांचे स्वरूप अधिकच गुंतागुंतीचे होत चालले आहे. आजचा माणूस सुशिक्षित आहे, तर्कशुद्ध विचार करू शकतो पण त्याचवेळी तो अधिक एकाकी, भावनांनी दबलेला आणि डिजिटल मायाजाल मध्ये गुंतत जाणारा असाच दिसतो. मानवी हक्कांचे खरे रक्षण म्हणजे फक्त शोषणाला किंवा अन्यायाला विरोध करणे नव्हे, तर मानवी प्रतिष्ठा टिकवणे आहे. आधुनिक जीवनशैलीने माणसाला सोयी दिल्या; पण मनाची, भावनांची अवस्था विस्कळीत केली. मानवी हक्क ही फक्त संविधानातील कलमे नसून प्रत्येक नात्यात, प्रत्येक संवादात आणि प्रत्येक कृतीत परिवर्तित होणे गरजेचे आहे. जेव्हा दुसर्याच्या हक्कांविषयी माणूस आवाज उठवेल तेव्हाच खरी संवेदनशीलता दिसेल. समाजाच्या एकात्मतेचा पाया म्हणजे समानता आणि परस्पर आदर. त्यामुळे मानवी हक्क दिवस हा केवळ उत्सवाचा दिवस नाही तर आपल्या वर्तनाचा, विचारांचा आणि सामाजिक बांधिलकीचा आरसा आहे. ज्ञान प्रसाराची साधने वाढली, माहिती क्षणात उपलब्ध झाली पण त्याच्या सोबतच खूप मोठ्या समस्या डोके वर काढू लागल्या. चुकीची माहिती, डिजिटल फसवणूक, मतभेदांची तीव्रता, आर्थिक फसवणूक इत्यादी सारखे गंभीर प्रश्न आपली पाळेमुळे एका बाजूला घट्ट करीत आहे. असमानतेची दरी रुंदावत आहे. काहीजण डिजिटल जगात झेपावले तर काही मूलभूत हक्कांसाठी अजूनही झगडत आहेत. तंत्रज्ञानाने जग जोडले गेले पण माणसाला माणसापासून दूर केले. नात्यात ऊब राहिली आहे का? संवेदना उरली आहे का? मानसिक आरोग्याच्या समस्या वाढत आहेत, अनिवार होत चाललेल्या स्पर्धेमुळे मानवता झिजत चालली आहे. मानवी हक्क केवळ कागदावर नसतात ते मनात जपले पाहिजेत. मानवी हक्क दिवस आपल्याला हेच सांगतो, हक्कांचा अर्थ स्वातंत्र्य पण स्वातंत्र्याचा अर्थ जबाबदारी. समानतेचा अर्थ न्याय. आदराचा अर्थ गप्प बसणे किंवा भीती नाही तर मानवी संवेदनशीलता. चांगल्या जगात मानवतेचा दिवा विजू द्यायचा नाही इतकीच काळजी घ्यायची आहे. आपल्या शब्दांत वागण्यातून आणि कृतीतून आपण एक छोटासा प्रकाश निर्माण करू शकतो. तो प्रकाश हक्कांचा, संवेदनांचा आणि सहानुभूतीचा असेल, तर समाज आपोआप उजळेल. कारण मानवतेपेक्षा मोठा कोणताच हक्क नाही आणि माणसापेक्षा मौल्यवान कोणतंच मूल्य नाही.