विशेष : ग्रंथपालांचा सन्मान

– प्रा. तानाजी माळी
महान ग्रंथपाल, गणितज्ज्ञ, पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त आज ‘ग्रंथपालदिन’ संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. डॉ. एस. आर. रंगनाथन यांची आज 143 वी जयंती आहे.
भारताच्या प्राचीन संस्कृतीत व इतिहासात ग्रंथालयांचे महत्त्व मोठे आहे. राष्ट्राची सांस्कृतिक उंची मोजण्याचे एक परिमाण म्हणून ग्रंथालयांचे महत्त्व अनन्यसाधारण असून पुस्तकांच्या विश्वात काम करणारा ग्रंथपालदेखील (लायब्ररीयन) तितकाच महत्त्वाचा आहे. आधुनिक काळात भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक म्हणून डॉ. शियाली रामामृतम ऊर्फ डॉ. एस. आर. रंगनाथन यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. त्यांनी केलेल्या कार्यामुळे भारतीय ग्रंथालयशास्त्राला एक नवी दिशा प्राप्त झाली.
डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी आपल्या कार्याची सुरुवात सन 1921 मध्ये गणित या विषयाचे प्राध्यापक म्हणून मद्रास येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमधून केली. यांनतर डॉ. एस. आर रंगनाथन यांची मद्रास विद्यापीठाचे ग्रंथपाल म्हणून निवड झाली व ग्रंथालयशास्त्राचे प्रशिक्षण घेण्यासाठी ते युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन येथे पोहोचले आणि येथून त्यांच्या कार्याला एक नवी कलाटणी मिळाली. त्यांच्याजवळ असलेल्या गणिताच्या विशेष ज्ञानाचा वापर ग्रंथालयांसाठी व्हावा, असे त्यांना वाटू लागले. त्यातूनच पुढे कोलन वर्गीकरण (द्विबिंदू वर्गीकरण पद्धत) पद्धतीचा जन्म झाला.
पुस्तकांच्या वर्गीकरणाच्या एकूण आठ पद्धती आहेत त्यापैकी एक रंगनाथन यांनी तयार केलेली पद्धत आहे. 1925 मध्ये मद्रासमध्ये परत आल्यावर ते कामावर रुजू झाले. डॉ. रंगनाथन युनेस्को, इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ लायब्ररी असोसिएशन, इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ डॉक्युमेंटेशन यांसारख्या आंतरराष्ट्रीय समित्यांवरही आपली कामगिरी केली असून जगातील अनेक देशांमध्ये त्यांनी ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विषयांवर मार्गदर्शनदेखील केले. 1931 ते 1967 या काळात त्यांनी अनेक ग्रंथांचे लेखन केले. ग्रंथालय आणि माहितीशास्त्रावरील त्यांची जवळपास 60 पेक्षा जास्त पुस्तके आणि 2500 पेक्षा जास्त संशोधन लेख प्रकाशित आहेत. या विषयावर इतके विपुल लिखाण केलेले ते जगातील एकमेव अभ्यासक होते.
डॉ. रंगनाथन हे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ग्रंथालय समितीचे अध्यक्षदेखील होते. डॉ. रंगनाथन यांच्या कार्यामुळे 1957 मध्ये भारत सरकारच्या वतीने त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कारने गौरविण्यात आले. ग्रंथालय शास्त्रातील डॉ. रंगनाथन यांनी मांडलेली पंचसूत्रे आजही अगदी तंतोतंत लागू पडतात. इ. स 1931 मध्ये त्यांनी लिहिलेल्या ‘द फाइव्ह लॉज ऑफ लायब्ररी सायन्स’ या जगप्रसिद्ध पुस्तकातून या सूत्रांची प्रचीती संपूर्ण जगाला आली. आजही भारतीय ग्रंथालय शास्त्राची कार्यपद्धती या पाच सिद्धांतांवर अवलंबून आहे.
डॉ. रंगनाथन यांची पंचसूत्रे पुढील प्रमाणे आहेत- 1. ग्रंथ हे वाचण्यासाठी असतात. 2. प्रत्येक वाचकासाठी पुस्तक 3. प्रत्येक पुस्तकासाठी वाचक असतो. 4. ग्रंथपालाचा आणि वाचकाचा वेळ वाचला पाहिजे. 5. ग्रंथालय ही वर्धिष्णू (वाढत जाणारी) संस्था आहे. डॉ. रंगनाथन यांनी शैक्षणिक ग्रंथालयांप्रमाणेच सार्वजनिक ग्रंथालयांच्या विकासातदेखील आपले योगदान दिले. यासाठी त्यांनी 1928 मध्ये मद्रास ग्रंथालय संघाची स्थापना केली.
ग्रंथालयांनी गेल्या अनेक दशकांपासून समाजाला ज्ञान देण्याचे कार्य केले आहे. प्राचीन काळापासून ग्रंथालयांचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे, याचे उदाहरण नालंदा आणि तक्षशिला यांसारख्या विद्यापीठाच्या ग्रंथालयांची भव्यता आणि प्रसिद्धी पाहून लक्षात येते. आधुनिक काळातदेखील ग्रंथालयांचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः उच्च शिक्षणात ग्रंथालयांचे महत्त्व वाढत आहे. विषयांचे सखोल ज्ञान प्राप्त करण्याची गरज भासते ती अधिक ज्ञान संसाधनांची म्हणूनच ग्रंथालयाचा वापर अधिक महत्त्वाचा ठरतो.
ग्रंथालयांमध्ये उपलब्ध असलेल्या पुस्तके, नियतकालिके, संशोधन प्रबंध, वर्तमानपत्रे, ई-पुस्तके, ई-नियतकालिके, डेटाबेस, दृक-श्राव्य साधनांच्या मदतीने विद्यार्थ्यांना विषयाचे सखोल ज्ञान प्राप्त होते. कुठल्याही देशाची प्रगती ही त्या देशात होणार्या संशोधनांवर अवलंबून असते. दर्जेदार संशोधन हे अभ्यासाशिवाय आणि माहिती संसाधनांशिवाय होणे शक्य नाही. दर्जेदार संशोधन करावयाचे असल्यास ग्रंथालयांचा वापर करून अधिकाधिक संदर्भसाहित्यांचा वापर करून संशोधनाला योग्य पुरावे, आधार आणि दिशा देणे शक्य होते. आजच्या आधुनिक ग्रंथालयांत अनेक प्रकारच्या ई-संसाधनांची उपलब्धता असल्यामुळे संशोधकांना आपले संशोधनकार्य पूर्ण करण्यासाठी कुठल्याही भौगोलिक आणि आर्थिक अडचणी उद्भवत नाही. अशी ई-संसाधने इंटरनेटच्या माध्यमाने जगातील कुठल्याही भागातून हाताळता येतात. ग्रंथालयात उपलब्ध करून दिलेली संसाधने ही काही विशेष निकषांवर आणि दर्जांवर आधारित असतात. त्यामुळे त्यातील माहितीदेखील अचूक आणि दर्जेदार असते.
आज आपण सर्व आधुनिक युगात जगत आहोत. आज माहिती संसाधनांची खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. इतकेच नव्हे तर माहिती उपलब्ध करून देणार्या अनेक माध्यमांची उपलब्धता इंटरनेटच्या माध्यमाने झाली आहे. आज माहिती प्राप्तीसाठी आपण सर्व इंटरनेटचा सर्रास वापर करतो आणि आपल्या माहितीची गरज भागवितो. मात्र ही पद्धत योग्य आहे का? त्याची सत्यता किंवा प्रामाणिकता तपासल्या गेल्या आहेत का याचा पाठपुरावा आपल्यापैकी किती लोक करतात हे सांगणे जरा कठीण आहे. यामुळे सुयोग्य ई-संसाधनांची आणि संकेतस्थळांची माहिती असणेदेखील महत्त्वाचे आहे.
अनेकदा हवी असलेली माहिती आपणास कुठे सापडेल याबद्दल पूर्ण माहिती नसते किंवा एखाद्या विषयाबद्दल कोणती संसाधने ही उपयुक्त करतील, याचा अंदाज पूर्णपणे वाचकांना, संशोधकांना किंवा प्राध्यापकांना येत नाही. अशा वेळी ग्रंथालयांचा वापर केल्यास ग्रंथालयांच्या विविध सूची, तालिका संदर्भ सेवा, माहिती सेवा, प्रचलित जागरूकता सेवेच्या माध्यमाने अशी माहिती अचूकरीत्या आणि कमी वेळेत वाचकांना दिल्या जातात व वेळेची बचत होते. अशा सेवा आणि सुविधा या ग्रंथालयांमार्फत इलेक्ट्रॉनिक स्वरूपातदेखील उपलब्ध करून दिली जाते.
यासाठी ग्रंथालयात दर्जेदार आज्ञावली किंवा प्रणालींचा वापर करून ओपॅक सुविधा उपलब्ध करून दिली जाते. इतकेच नव्हे, तर वेबपोर्टल, वेबसाइट, समाजमाध्यमांचा उपयोग करूनदेखील अधिकाधिक माहिती उपलब्ध करून देण्यात येते. ग्रंथालयाच्या माध्यमातून अशा व्यक्तिमत्त्वांच्या पुस्तकांची व साहित्यांची उपलब्धता ग्रंथालयात पारंपरिक व आधुनिक स्वरूपात उपलब्ध करून दिले जातात, यांचा उपयोग करून वाचकांना प्रेरणा मिळते.





