– प्रा. डॉ. सुभाष राठोड आजचा समाज झपाट्याने बदलतो आहे. या बदलाच्या वेगात अस्वस्थता वाढते आहे, अशा प्रसंगी 30 जानेवारी हा दिवस महात्मा गांधींची (Mahatma Gandhi) आठवण करून देतो. गांधीजींच्या विचारांची चर्चा करताना अनेकदा मोठे शब्द वापरले जातात- सत्य, अहिंसा, समता, मानवता. हे शब्द ऐकायला सुंदर वाटतात; पण प्रत्यक्ष आयुष्यात त्यांचा अर्थ काय, हे समजून घेणे आणि स्वीकारणे कठीण असते. गांधीजींनी कधीही विचारांची मांडणी हवेत केली नाही. त्यांनी जे सांगितले, ते स्वतः जगून दाखवले. म्हणूनच त्यांचे विचार कृतीत मांडणे अवघड आहेत. ते आपल्याला प्रश्न विचारायला लावतात- आपण जे बोलतो, ते जगतो का? सत्याबाबत गांधीजींची भूमिका अत्यंत स्पष्ट होती. सत्य म्हणजे केवळ खोटे न बोलणे नाही, तर परिस्थितीशी, समाजाशी आणि स्वतःशी प्रामाणिक राहणे. सोयीचे मौन, भीतीपोटी गप्प बसणे, किंवा अन्याय दिसूनही दुर्लक्ष करणे हे सत्याच्या विरोधात आहे, असे त्यांचे ठाम मत होते. आजच्या समाजात अफवा, अपप्रचार, अर्धसत्ये सहज पसरतात. अशा वेळी सत्य टिकवणे अधिक कठीण झाले आहे; पण म्हणूनच त्याचे महत्त्व वाढले आहे. अहिंसेबाबतही अनेक गैरसमज आहेत. अहिंसा म्हणजे दुर्बलता नाही, हे गांधीजींनी वारंवार स्पष्ट केले. अन्यायाविरुद्ध उभे राहणे, पण सूडाच्या भावनेपासून दूर राहणे ही अहिंसेची खरी कसोटी आहे. आज सार्वजनिक चर्चांमध्ये वाढत चाललेली आक्रमक भाषा, मतभिन्नतेबद्दल असहिष्णुता पाहिली की, अहिंसेचा हा अर्थ अधिक ठळक होतो. विरोध म्हणजे शत्रुत्व नव्हे, हे आपण विसरत चाललो आहोत. गांधीजींनी सर्वधर्म समभावाचा आग्रह धरला. त्यांचा धर्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन संकुचित नव्हता. प्रत्येक धर्मातील चांगुलपणा स्वीकारणे आणि माणसामाणसांतील अंतर कमी करणे, हा त्यांचा हेतू होता. आज समाजात वाढणारे ध्रुवीकरण, धार्मिक तेढ पाहता, हा विचार किती उपेक्षित झाला आहे, हे स्पष्ट दिसते. धर्म माणसाला जोडण्यासाठी असतो; तोडण्यासाठी नाही हा साधा संदेश गांधीजींनी दिला. mahatma gandhi स्वदेशीचा विचार गांधीजींनी मांडला, तेव्हा तो केवळ परकीय वस्तूंविरोधातला लढा नव्हता. तो आत्मनिर्भरतेचा आणि जबाबदारीचा विचार होता. आपण वापरत असलेली प्रत्येक वस्तू कुणाच्या तरी श्रमाशी जोडलेली आहे, ही जाणीव त्यांनी निर्माण केली. आज जागतिकीकरणाच्या काळात हा विचार अधिक व्यापक अर्थ घेतो. स्थानिक उत्पादनांना पाठबळ देणे म्हणजे केवळ अर्थव्यवस्थेचा प्रश्न नाही; तो सामाजिक आणि नैतिक प्रश्नही आहे. सर्वोदय ही गांधीजींच्या विचारांची मध्यवर्ती संकल्पना होती. समाजातील शेवटचा माणूस केंद्रस्थानी ठेवून विकासाचा विचार करणे, ही त्यांची भूमिका होती. विकासाची फळे काही मोजक्यांपुरती मर्यादित राहता कामा नयेत, हा त्यांचा आग्रह होता. आज आर्थिक प्रगतीची चर्चा होताना वाढती विषमता, बेरोजगारी, ग्रामीण भागातील अडचणी दुर्लक्षित राहतात. अशा वेळी सर्वोदयाचा विचार अधिक महत्त्वाचा ठरतो. शिक्षणाबाबत गांधीजींचे विचार अत्यंत व्यावहारिक होते. शिक्षण म्हणजे केवळ नोकरी मिळवण्याचे साधन नव्हे, तर माणूस घडवण्याची प्रक्रिया आहे, असे ते मानत. ‘नयी तालीम’मध्ये श्रमाची प्रतिष्ठा, नैतिक मूल्ये आणि समाजाशी नाते यावर भर होता. आजच्या शिक्षणपद्धतीत गुण, स्पर्धा आणि यशाच्या मोजमापात अनेकदा ही मूल्ये मागे पडतात. त्यामुळे गांधीजींच्या शिक्षणविषयक विचारांकडे नव्याने पाहण्याची गरज आहे. पर्यावरणाविषयी गांधीजींनी व्यक्त केलेली चिंता आज अधिक तीव्रतेने समोर येते. निसर्गाचा अतिवापर, प्रदूषण, हवामान बदल या सगळ्या समस्या मानवी लोभातून निर्माण झाल्या आहेत. गांधीजींची साधी जीवनशैली म्हणजे दारिद्य्र नव्हे, तर विवेक होता. गरजेपुरते घेणे आणि उरलेले जपणे हा विचार आजच्या काळात अत्यंत उपयुक्त ठरतो. गांधीजींच्या विचारांची ताकद त्यांच्या नैतिक भूमिकेत होती. त्यांनी सत्ता, राजकारण आणि समाज या सगळ्यांना नैतिक अधिष्ठान दिले. सत्ता म्हणजे सेवा, हा त्यांचा आग्रह होता. आज राजकारणात वाढत चाललेली कटुता, आरोप-प्रत्यारोप पाहता, हा विचार अधिक महत्त्वाचा ठरतो. 30 जानेवारी हा दिवस म्हणूनच केवळ स्मरणाचा नाही, तर आत्मपरीक्षणाचा आहे. आपण समाज म्हणून कुठे चाललो आहोत आणि त्या वाटेवर मानवी मूल्यांना किती स्थान आहे, हा प्रश्न विचारण्याचा हा दिवस आहे. गांधीजींच्या विचारांचा स्वीकार म्हणजे भूतकाळात रमणे नव्हे; तो वर्तमान अधिक सुसंस्कृत करण्याचा प्रयत्न आहे. गांधीजींच्या विचारांवर चालणे सोपे नाही. ते अस्वस्थ करतात, प्रश्न विचारायला लावतात. पण कदाचित आज त्याचीच सर्वाधिक गरज आहे. सत्य, अहिंसा, समता आणि सर्वोदय ही तत्त्वे जर आपल्या वर्तनात उतरली, तर समाज अधिक शांत, न्याय्य आणि माणुसकीपूर्ण होऊ शकतो. महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करताना एवढेच म्हणावेसे वाटते, त्यांना आठवणे सोपे आहे; त्यांचे विचार जगणे कठीण आहे; पण तसा प्रयत्नच खरा आदर आहे. या विचारांच्या पार्श्वभूमीवर आजचे सामाजिक वास्तव पाहिले तर अस्वस्थता वाढते. सार्वजनिक जीवनात संवादाची जागा हळूहळू कमी होत चालली आहे. मतभिन्नता असणे हा लोकशाहीचा आत्मा आहे; पण ती मतभिन्नता व्यक्त करताना संयम, आदर आणि समजूतदारपणा लागतो. दुर्दैवाने आज अनेक ठिकाणी मतभिन्नतेऐवजी आरोप, उपहास आणि आक्रमकता दिसते. गांधीजींनी संवादावर नेहमी भर दिला. विरोधकाचे म्हणणे ऐकून घेणे ही कमजोरी नसून प्रगल्भतेची खूण आहे, हे त्यांनी कृतीतून दाखवले. आजच्या काळात हा विचार पुन्हा समजून घेण्याची गरज आहे.