– मधुरा खिरे Jean-Georges Noverre : 29 एप्रिल हा जीन जॉर्जेस नोव्हेर (Jean-Georges Noverre) यांचा जन्मदिवस. हा दिवस दरवर्षी त्यांच्या स्मरणार्थ ‘जागतिक नृत्य दिन’ म्हणून साजरा केला जातो. नृत्य-दिनानिमित्त नोव्हेर यांच्या कार्याचा हा थोडक्यात परिचय. ‘जे शब्दांतून मांडता येत नाही, ते नृत्यातील स्थिती-गतींतून, हावभावांतून व दृष्टिक्षेपांतून सहजपणे अभिव्यक्त होते. शब्दांच्या मर्यादा ओलांडून जाणारी ही नृत्याची भाषा, म्हणूनच एक वैश्विक भाषा असते’, हे उद्गार आहेत 18व्या शतकातील प्रसिद्ध बॅले नर्तक व संरचनाकार जीन जॉर्जेस नोव्हेर (Jean-Georges Noverre) यांचे.अठराव्या शतकाचा काळ युरोपमध्ये बौद्धिक चळवळीचा, प्रबोधनाचा काळ होता. व्यक्तिस्वातंत्र्य, धार्मिक सहिष्णुता, विवेकवादी विचारसरणी व वैज्ञानिक दृष्टिकोन अशा तत्त्वांचा पुरस्कार करणार्या या चळवळीमुळे कला, तत्त्वज्ञान, राजकारण यांसारख्या अनेक क्षेत्रांत क्रांतिकारक बदल घडून आले. नृत्याच्या क्षेत्रातही ‘बॅले’ या नृत्य-प्रकारात बदलांचे वारे वाहू लागले. राजदरबारातील विलासी करमणुकीचे साधन बनलेल्या नृत्यापासून एक अभिजात शास्त्रीय नृत्य म्हणून विकसित होण्यापर्यंतच्या बॅलेच्या प्रवासातील एक महत्त्वाचा दुवा असणारा असा हा कालखंड. फ्रान्समध्ये अठराव्या शतकाच्या सुरुवातीला बॅले दरबारातून बाहेर पडला व रंगमंचावरील नृत्याविष्कारांना सुरुवात झाली. त्यामुळे बॅलेचे तंत्र, संरचना, वेशभूषा, रंगभूषा यांमध्ये तद्नुषांगिक बदल होऊ लागले. या काळात बॅलेचे स्वतंत्र प्रयोग होत नसत. तो ऑपेराचा एक भाग म्हणून सादर होत असे. त्यातही ऑपेराच्या मुख्य विषयाशी किंवा कथेशी नृत्याचा काही संबंध नसे. नृत्य करताना मुखवटे घालण्याची रीत होती. परिणामी नृत्यातील अभिनय विकसित झाला नव्हता. नृत्याला एका कथासूत्रात बांधून त्याचे अर्थपूर्ण व स्वतंत्र प्रयोग करण्याचे प्रयत्न या काळात सुरू झालेले दिसतात. सर्वप्रथम लंडनमध्ये ‘ड्ररी लेन थिएटर’ येथे असा प्रयोग करण्यात आला. जॉन वीव्हर (Jean-Georges Noverre) या ब्रिटिश नर्तकाने ‘The Loves of Mars and Venus’ (1717) या बॅलेमध्ये ‘पँटोमिमे’ (मूकनाट्य) व नृत्य यांची गुंफण घालून कथा मांडण्याचा प्रयत्न केला. Jean-Georges Noverre यातून प्रेरणा घेऊन पुढील काळात फ्रान्समध्येही असे प्रयोग होऊ लागेल. मेरी सॅली (1707-1756) या फ्रेंच नर्तिकेने बॅलेमध्ये मूकनाट्याचा वापर करण्यास सुरुवात केली. त्यांनी वेशभूषेतही अनेक बदल केले जे त्या काळात धाडसी ठरले. या पार्श्वभूमीवर जीन जॉर्जेस नोव्हेर यांचा जन्म 29 एप्रिल 1727 रोजी पॅरिस येथे झाला. त्यांनी लहानपणीच मार्सेल नावाच्या शिक्षकाकडे नृत्याचे धडे गिरविण्यास सुरुवात केली. त्यानंतर तेव्हाचे प्रसिद्ध बॅले नर्तक लुई डुप्रे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. सुरुवातीची काही वर्षे व्यावसायिक नर्तक म्हणून काम केल्यावर त्यांनी शिक्षक व संरचनाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. 1754 मध्ये ऑपेरा कामिक येथे ‘Les fetes chinoises’ या त्यांच्या पहिल्या बॅलेचा प्रयोग झाला. हा प्रयोग खूप यशस्वी ठरला. 1750 ते 1755 या वर्षांमध्ये नोव्हेर यांनी केलेल्या कामावर ‘रोकोको’ या लोकप्रिय शैलीचा प्रभाव पडलेला दिसतो. स्थापत्यकला, चित्रकला, शिल्पकला या क्षेत्रांत ही शैली प्रचलित होती. सोन्याचा मुलामा चढवलेली, वळणदार व नाजूक नक्षीकाम केलेली मोहक सजावट हे या शैलीचे वैशिष्ट्य. या प्रभावामुळे कुठलेही ठोस कथानक नसणारे पण भव्यदिव्य, नयनरम्य व लोकांना आकर्षित करतील, असे बॅले नोव्हेर यांनी केले. लंडनमधील ड्ररी लेन थिएटरचे व्यवस्थापक आणि प्रसिद्ध नट डेव्हिड गॅरिक यांनी नोव्हेर यांना लंडनमध्ये त्यांच्या बॅलेचा प्रयोग करण्यासाठी आमंत्रित केले. दुर्दैवाने तेव्हा लंडनमध्ये फ्रेंच विरोधी दंगली उसळल्यामुळे हे प्रयोग थांबविण्यात आले. तरीही लंडन येथे व्यतीत केलेला हा काळ त्यांच्या आयुष्याला व नृत्यक्षेत्रालाही नवी दिशा देणारा ठरला. डेव्हिड गॅरिक हे त्यांच्या वास्तववादी व नैसर्गिक अभिनयासाठी ओळखले जात. त्यांनी नाट्यक्षेत्रात अनेक सुधारणा घडवून आणल्या. नोव्हेर यांना नाट्यक्षेत्रातील अनेक नवीन संकल्पना त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या. तसेच, येथे त्यांना समकालीन फ्रेंच साहित्य व मूकनाट्यावरील ग्रंथांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. आपल्या नवीन पुस्तकाचे संशोधन नोव्हेर यांनी येथेच सुरू केले. बॅलेमध्ये नाट्यमयता निर्माण करून तो अधिक अर्थपूर्ण कसा बनवता येईल याचे विवेचन या पुस्तकात त्यांनी केले. बॅलेच्या या नवीन शैलीला त्यांनी ‘ballet d’ action’ असे नाव दिले. ‘Letters sur la danse, et sur les Ballets’ या पुस्तकाचे प्रकाशन 1760 मध्ये फ्रान्समधील लियों येथे झाले. या पुस्तकात त्यांच्या सर्व नृत्यविषयक विचारांचे सार आहे. लंडनमध्ये मिळालेल्या अनुभवामुळे त्यांची सर्जनशीलता हळूहळू बहरू लागली. 1757 ते 1760 या काळात त्यांनी बॅलेच्या कथासूत्रात नवीन प्रयोग करून अधिक आव्हानात्मक रचना करण्यास सुरुवात केली. तसेच मुखवट्यांचा वापर न करता मुखज अभिनयाला प्राधान्य दिले. नृत्याच्या हालचालींमध्ये सुलभता येण्यासाठी बॅलेच्या पारंपरिक वेशभूषेतही बदल केले. 1759 मध्ये केलेला ‘Le jaloux sans rival’ हा एक महत्त्वाचा बॅले. व्हॉल्टेअर, डिडेरॉट, मोलियर, क्रेबिलॉन, रेसिन या त्या काळातील प्रतिभावान लेखकांच्या कामावर आधारित असणारा हा बॅले होता. 1761-1767 मध्ये वुटेम्बर्ग, जर्मनी येथील दरबारात आणि 1768-1774 मध्ये व्हिएन्ना येथील दरबारात त्यांनी नृत्यशिक्षक व संरचनाकार म्हणून काम केले. हा त्यांच्या कारकिर्दीतील सर्वांत सर्जनशील कालखंड होता. ग्रीक शोकात्मिका (Tragedies) व फ्रेंच नाट्यकृतींमधील काही घटना त्यांनी बॅले मधून मांडल्या. यासाठी क्रिस्तोफ विलिबाल्ड ग्लुक आणि जीन जोसेफ रोडॉल्फ या नावाजलेल्या संगीतकारांबरोबर त्यांनी काम केले. ज्या संधीची नोव्हेर अनेक वर्षांपासून वाट बघत होते ती 1776 मध्ये चालून आली. राणी मेरी अँटोनेट यांच्या सत्ताकाळात पॅरिस ऑपेरा येथे 1776 पासून 1781 पर्यंत त्यांनी काम केले. या काळात नोव्हेर यांनी बॅलेमध्ये पौराणिक विषयांपासून फारकत घेऊन रोजच्या आयुष्यात आजूबाजूला घडणार्या घटना तसेच ग्रामीण जीवनातील विषय मांडण्याचा प्रयत्न केला. 1778 मधील ‘Les pitets riens’ या बॅलेसाठी वुल्फगॅन्ग अमॅड्युस मोझार्ट या ख्यातनाम संगीतकाराबरोबर त्यांनी काम केले. 1781 ते 1789 मध्ये त्यांनी काही वर्षे लंडन व काही वर्षे फ्रान्समधील लियों येथे त्यांच्या पूर्वीच्या बॅलेंचे पुनर्प्रदर्शन केले. 1789 मध्ये फ्रेंच राज्यक्रांती झाली व नोव्हेर यांना राजाश्रय मिळेनासा झाल्यामुळे त्यांनी पुन्हा काही काळ लंडन मध्ये घालवला. 1795 मध्ये परिस्थिती थोडी निवळल्यावर ते पुन्हा फ्रान्सला परतले. त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली होती. त्यांनी तरुण नर्तकांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांच्या पुस्तकाचे पुनर्प्रकाशनही केले. 19 ऑक्टोबर 1810 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या विचारांचा धागा घेऊन पुढे जाणारे त्यांचे नावाजलेले शिष्य म्हणजे जीन डॉबरव्हल, चार्ल्स डीडलो, चार्ल्स ला पिका इत्यादी. नोव्हेर यांनी बॅलेचा आशय व अभिव्यक्ती दोन्हींमध्ये काळानुरूप केलेले बदल नृत्यक्षेत्राला समृद्ध व सशक्त करणारे ठरले. तसेच त्यांच्या लेखनातून त्यांनी बॅलेला एक वैचारिक बैठक मिळवून दिली. त्यांचे विचार व लेखन आजही नृत्यक्षेत्राला मार्गदर्शक ठरतील असे आहेत. त्यांनी बॅलेच्या पारंपरिक रचनातंत्राला धक्का देत अनेक नवीन प्रयोग केले. कारण त्यांच्याच म्हणण्यानुसार, प्रतिभावंत कलाकार मळलेल्या वाटेने प्रवास न करता नवीन वाटा निर्माण करतो व याच वाटा त्याच्या कलेला परिपूर्णतेच्या दिशेने घेऊन जातात!