– प्राजक्ता पांगारकर Earth Day : आज 22 एप्रिल रोजी वसुंधरा दिन (Earth Day) साजरा केला जातो. आज निसर्गाच्या सान्निध्यात राहून हा दिवस साजरा करा. निसर्ग जसा आपला आहे तसा पशुपक्षी आणि इतर जीवांचाही आहे. निसर्ग वाचला तर जीवसृष्टी वाचेल. निसर्गाला जवळून पाहताना आणि अनुभवताना वृक्षराजीही वाढवूया आणि वसुंधरा दिन साजरा करूया. पृथ्वी (Earth Day) ही एक अप्रतिम कलाकार आहे. निसर्ग दर वेळेस त्याची नानाविध रूपं, त्याचे नानाविध आविष्कार आपल्यापुढे सादर करत असतो. शिवाय निसर्गाचा प्रत्येक आविष्कार हा विनामूल्यही असतो; परंतु बरेचदा, आपण आपल्या कामात इतके व्यग्र असतो, की आपल्याला सकाळची पक्ष्यांची किलबिल, सूर्योदय, सूर्यास्त (शहरांमध्ये तर दिसतच नाही), पण दिसलाच तरी त्याच्याकडे बघायलासुद्धा वेळ नसतो. निसर्गातले सहा ऋतू आणि त्या सहा ऋतूत दिसणारी तिची वेगवेगळी लोभसवाणी रूपं मनाला भुरळ घालतात. वसंताच्या आगमनामुळे झाडांना फुटलेली नवपालवी आणि तिचे दिसणारे ते बहारदार रूप, पावसाळ्यात पावसांच्या सरींमुळे ओलीचिंब झालेली सृष्टी, शिशिर ऋतुतली पानगळ, पानांचे बदललेले रंग आणि त्यामुळे जमिनीवर पडलेला तो पानांचा सडा, बर्फाच्छादित प्रदेशात जणू काही पांढरी शाल पांघरलेली सृष्टी; ही सगळीच दृश्य मन मोहून टाकणारी आहेत. असा हा निसर्ग विविध अंगाने नटलेला आहे. त्यात वैविध्य आहे. या निसर्गात इतक्या प्रकारचे प्राणी आणि पक्षी आहेत, की आपण विचारही करू शकत नाही. World Earth Day 2026 निसर्गामधलं वैविध्य पाहता इतके चित्र विचित्र दिसणारे, कधी कधी तर किळस आणणारे प्राणी या जगात अस्तित्वात आहेत. त्यांच्याकडे बघून नेहमी प्रश्न पडतो, की निसर्गाने इतकी विविधता का निर्माण केली असावी. जसं प्राण्यांचं पक्ष्यांचं तसंच झाडांचं, फुलांचं, फळांचं. विविध रंगांनी आणि ढंगांनी ही सृष्टी सजली आहे. सर्वसाधारण, झाडांची पानं ही हिरव्या रंगाची असतात. पण जर नीट निरखून बघितलं, तर त्या हिरव्या रंगांमध्येही इतक्या छटा बघायला मिळतात, की तेच रंग ‘कलर पॅलेट’वर निर्माण करणंही कठीण.कुठे खोल दरी, तर कुठे उंचच उंच अमर्यादा आकाश, कुठे वसंतात गाणारा कोकीळ, तर कुठे पावसाची वाट पाहात बसणारा चातक, कुठे रंगीबेरंगी निरनिराळ्या नक्षी अंगावर लेवून भिरभिरणारी फुलपाखरं, तर कुठे रातराणीचा धुंद करणारा तो मंद सुगंध, कुठे अमर्याद विशाल असा महासागर, तर कुठे दर्याखोर्यातून दुडूदुडू धावत येणारा धबधबा, कुठे पावसाळ्यात नटलेल्या सृष्टीला इंद्रधनुरूपी घातलेलं तोरण, तर कुठे रात्रीच्या वेळेस चांदण्याची चादर ओढून घेतलेलं शांत आकाश; हे सगळे निसर्गाचेच कलाविष्कार. मनुष्य हासुद्धा निसर्गाचाच भाग आहे. म्हणूनच माणसांच्याही नाना छटा, नाना वृत्ती बघायला मिळतात. मानव हा निसर्गाचा सर्वोत्कृष्ट आविष्कार आहे. निसर्गाची निर्मिती ही परिपूर्ण निर्मिती आहे. निसर्गामध्ये प्रत्येक जण एकमेकांना पूरक आहे. पण हे समजायला माणूस तोकडा पडतो. कारण, निसर्गाशी सैलावत गेलेलं त्याचं नातं. माणूस हा निसर्गाचा एकमेव असा कलाविष्कार आहे, की ज्याला निसर्गाच्या या कलाकृतींचा पूर्णत्वाने अनुभव घेण्याची क्षमता निसर्गाने प्रदान केली आहे. अन्यथा बाकी कोणत्याही जीवांमध्ये निसर्गाला पूर्णत्वाने ग्रहण करण्याची क्षमता नाही. निसर्ग कसा परिपूर्ण आहे, हे आपल्याला एका उदाहरणावरूनसुद्धा समजू शकेल. समजा, एखादी मेलेली म्हैस दोन-चार दिवस तशीच पडून राहिली तर, त्यापासून दुर्गंधी पसरायला वेळ लागणार नाही. परंतु निसर्गातील अन्य पशुपक्षी मात्र इथे सफाई कर्मचार्याचं काम अगदी चोख बजावताना दिसतात. हा मेलेला पशू हे त्यांचं खाद्य होतं आणि मग दोन दिवसांतच म्हशीचा सांगाडा तेवढा तिथे उरलेला दिसतो. अशाप्रकारे निसर्गच अशा मेलेल्या प्राण्यांची विल्हेवाट लावतो. म्हणूनच निसर्ग हा परिपूर्ण आहे. निसर्गातले प्राणी, पक्षी हे एकमेकांना पूरक असतात. आता शेतातले उंदीर हे शेतीसाठी किती उपद्रवी ठरू शकतात, हे आपल्याला माहिती आहे. पण म्हणूनच निसर्गातला गव्हाणी घुबड नावाचा पक्षी, ज्याचं मुख्य अन्न उंदीर आहे, तो मात्र ह्या उंदरांना नियंत्रणात ठेवतो आणि शेतीचं नुकसान टाळतो. म्हणूनच अशा पक्ष्यांचं आणि प्राण्यांचं संवर्धन ही आपलीच जबाबदारी आहे; परंतु आपल्या हव्यासापोटी आपण त्यांच्याकडून त्यांचा अधिवासच हिरावून घेतोय. निसर्गात एखादा पक्षी किंवा प्राणी आजारी पडला, तर निसर्गच त्याला बरा करतो. निसर्गाने या सर्व पशुपक्ष्यांचं पालकत्वच घेतलेलं असतं. तसं ते माणसाचंही घेतलेलं असतं. पण आपण मात्र अगदी क्षुल्लक कारणांवरून डॉक्टरांचे उंबरठे झिजवताना दिसतो. आपण जितके निसर्गाच्या सान्निध्यात जाऊ, तितक्या आपल्याला जडणार्या आजारांचं प्रमाणही कमी होईल. साने गुरुजी त्यांच्या एका पत्रामध्ये लिहितात, की त्याकाळी आई आपल्या मुलाला अंगणामध्ये खाऊ घालत असे. तेव्हा ती त्याला पक्षी, प्राणी, झाडं-झुडुपं, फुलं-पानं हे दाखवत दाखवत भरवत असे. कालांतराने ते मूल निसर्गाशी एकरूप होत असे. मनुष्यप्राणी हा जन्मतःच निसर्गाशी बांधलेला आहे. परंतु प्रगतीच्या नावाखाली माणसानेच निसर्गाला आपल्यापासून लांब केलं आहे. बालकवींच्या कवितांमध्ये निसर्ग आपल्याला ओतप्रोत भरलेला आढळतो. म्हणूनच, त्यांना ‘निसर्गकवी’ असेही म्हणतात. ‘अरुण’ या कवितेत सूर्योदयाला पाहून बालकवी म्हणतात, पूर्व समुद्री छटा पसरली रम्य सुवर्णाची कुणी उधळली मुठ नभी ही लाल गुलालाची। अशी निसर्गाशी एकरूपता साधण्यासाठी आधी त्याच्या जवळ, त्याच्या सान्निध्यात जाणं गरजेचं आहे. तुम्ही निसर्गापासून जितके लांब जाल, तितकंच रोगांना जवळ करत जाता. निसर्गात गेल्यावर तुमची उदासीनता, चिंता दूर पळून जातात. निसर्ग आपल्याला मनःशांतीची अनुभूती देतो. मन प्रसन्न करण्यासाठी निसर्गासारखं दुसरं औषध नाही. निसर्गातली प्रत्येक गोष्ट आपल्याला काही ना काही शिकवत असते. निसर्ग हा आपला गुरू आहे. निसर्गात सगळ्या गोष्टी कशा वेळच्यावेळी घडत असतात. निसर्गाकडून शिकावी ती त्याची निरपेक्ष देण्याची वृत्ती. पण कधी कधी हाच निसर्ग रौद्ररूपही धारण करतो. ते रौद्ररूप आपल्याला आपली गरज आणि आपली हाव ह्यातली सीमारेषा दाखवून देते. महात्मा गांधींजी म्हणतात, पृथ्वी प्रत्येक माणसाच्या गरजा भागवण्यासाठी पुरेशी तरतूद करते; परंतु कोणत्याही माणसाची हाव नाही. प्रकृतेः, ऋते जीवनम्॥ म्हणजेच, निसर्गाशिवाय (Earth Day) जीवन हे अशक्य आहे, म्हणूनच हर प्रकारे ह्या निसर्गाचं आपण रक्षण केलं पाहिजे. या निसर्गाचा समतोल राखणं, हे आपलं आद्यकर्तव्यच आहे. 22 एप्रिल रोजी दरवर्षी साजरा करण्यात येणार्या ‘अर्थ डे’ अर्थात वसुंधरा दिनाच्या निमित्ताने, चला तर मग, निसर्ग वाचवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया.