– पांडुरंग म्हेत्रे ज्या शिक्षण व्यवस्थेतून जबाबदार नागरिकाची निर्मिती होते त्या व्यवस्थेवरच गांधीजींनी लक्ष केंद्रित केले. देशाची प्रगती साधायची असेल तर त्या प्रगतीचा आत्मा म्हणजे शिक्षण होय. या त्यांच्या विचारातून शिक्षणाबद्दलची त्यांची आस्था स्पष्ट होते. आपले विचार व कार्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारा युगपुरुष म्हणजे महात्मा गांधीजी. स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, तत्त्वचिंतक व शिक्षणतज्ज्ञ अशा विविध जबाबदाऱ्या पेलताना त्यांचे शिक्षण विषयक विचार स्पष्ट होतात. विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण मोफत, सक्तीने व मातृभाषेतूनच दिले जावे, असा गांधीजींचा आग्रह होता. प्रचलित शिक्षणाबरोबरच शारीरिक श्रम आणि प्रशिक्षण याचाही अंतर्भाव शिक्षणात असणे अतिशय महत्त्वाचे आहे, असे त्यांचे मत होते. विणकाम, सुतकताई, शेती, मातीकाम, हस्तकला, बागकाम, पुस्तक बांधणी या कृतीशील उपक्रमाला त्यांनी महत्त्व दिले. विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण देऊन त्यांची अर्थार्जनाची क्षमता विकसित केली पाहिजे. “स्वच्छता’ हा शिक्षणातील महत्त्वाचा घटक आहे. शरीर स्वच्छता, शाळेची स्वच्छता, परिसराची स्वच्छता यांचा अभ्यासक्रमात समावेश असलाच पाहिजे यावर गांधीजी ठाम होते. श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त होण्यासाठी आश्रमातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना काही कष्टाची कामे करावी लागत असत, हा गांधीजींच्या मूल्यशिक्षणाचा एक भाग होता. गांधीजी स्वतः शारीरिक कष्टाची कामे करीत असत. त्यांनी स्वतःच्या आयुष्यात शारीरिक श्रमाला महत्त्व दिले होते परिणामी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत असे. काम हे काम असून कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते. विद्यार्थ्यांना श्रमाचे महत्त्व त्यांनी कृतीतून दाखवून दिले. गांधीजींनी नैतिकता व प्रामाणिकपणाला शिक्षणाचा महत्त्वाचा भाग मानला. विद्यार्थ्यांना आवडतील अशा उपक्रमांचा समावेशही अभ्यासक्रमामध्ये त्यांनी मुद्दामहून केला होता. जेणेकरून शिक्षण हसत खेळत व आनंददायी प्रक्रिया व्हावी. शिक्षणातून विद्यार्थ्यांनी ज्ञानाबरोबर स्वावलंबन आणि उपजीविकेसाठी लागणाऱ्या क्षमता व कला प्राप्त केल्या पाहिजेत, याविषयी गांधीजींची तळमळ होती. शिक्षणातून विद्यार्थ्यांच्या अंतर्गत असलेल्या सर्वोत्तम गुणांचा विकास गांधीजींना अपेक्षित होता. समाजाने विहित केलेले कायदे आणि नियमांचे पालन करण्यासाठी स्वयंशिस्त महत्त्वाची असून विद्यार्थ्यांना शिस्त बाहेरून लादू नये, असे गांधीजींचे मत होते. विद्यार्थ्यांच्या चारित्र्याची जडणघडण व्हावी. सदाचार, संयम, सहिष्णुता, आत्मनिर्भरता, सत्याग्रह अशा गुणांची जोपासना शिक्षणाच्या माध्यमातून झाली तर विद्यार्थ्यांच्या अपेक्षित व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होईल, यावर गांधीजींचा विश्वास होता. शिक्षणातून विद्यार्थ्यांचा मानसिक, भावनिक, बौद्धिक व शारीरिक विकास साधला पाहिजे. विद्यार्थ्याला दिले जाणारे शिक्षण त्याच्या सामाजिक वातावरणास पोषक असले पाहिजे. त्यातून विद्यार्थ्याला सामाजिक जाणिवेचे भान आले पाहिजे. शिक्षणातून भारतीय संस्कृती जोपासली जावी, असे गांधीजींना वाटत होते. शिक्षणात विद्यार्थ्यांच्या कृतीला वाव असावा. शारीरिक अवयवांच्या माध्यमातून बौद्धिक शिक्षणावर भर दिला जावा. गांधीजींनी शिक्षणात स्वानुभवाला महत्त्वाचे स्थान दिले होते. जेवढा जास्त अनुभव विद्यार्थ्यांना घेता येईल तेवढे त्यांचे ज्ञान व्यापक होईल. अनुभवातून शिकण्याची संधी सर्व विद्यार्थ्यांना मिळाली पाहिजे यावर ते ठाम होते. महात्मा गांधीजींनी वर्ष 1911 पासून भारतात व भारताबाहेर अनेक शैक्षणिक प्रयोग सुरू केले. या प्रयोगातून त्यांची स्वतःची शिक्षण पद्धती निर्माण झाली. मुलोद्योगी शिक्षण, बुनियादी शिक्षण, वर्धा शिक्षण, जीवन शिक्षण अशा नावांनी त्या ओळखल्या जातात. याचे प्रयोग त्यांनी साबरमती आश्रम, शांतिनिकेतन, टॉलस्टॉय अशा ठिकाणी केले. शिक्षणाला श्रमाची जोड घालून कृतिशील शिक्षण दिले जावे असा त्यांचा विचार होता. परस्परांशी सहकार्य वृत्ती, संयम, सहनशीलता, आदर्श सृजनशीलता, उद्योजकता, सामाजिक जबाबदारी ही कौशल्ये शिक्षणातून विकसित झाली पाहिजेत. विद्यार्थ्यांची सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन अध्यापनाची प्रक्रिया पार पाडली जावी परिणामी शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे सामाजिक आणि भावनिक कौशल्य विकसित होईल याची गांधीजींना खात्री होती. शिक्षण आत्मविश्वास वाढवायला मदत करते त्यामुळे मुलांबरोबर प्रौढांनाही साक्षर केले पाहिजे, असे गांधीजींचे मत होते. प्रौढ शिक्षणामुळे प्रौढ स्वावलंबी बनतील. त्यांच्या जीवनातील अडचणी सोडवणे शिक्षणामुळे सोपे होईल. प्रौढ शिक्षण हे अक्षर ओळखीपर्यंत मर्यादित असू नये, त्यातून अपेक्षित व्यवहारी ज्ञान मिळाले पाहिजे यावर गांधीजींचा कटाक्ष होता. पुरुषाबरोबर स्त्रियांनाही शिक्षणाची तितकीच गरज आहे. त्यांनाही पुरुषांच्या बरोबरीने संधी मिळाली तर समाजाच्या विकासाला गती मिळेल यावर गांधीजींचा विश्वास होता. शिक्षण हे विद्यार्थी केंद्रित असावे. विद्यार्थ्यांमधील कला, सुप्तगुण यांना चालना दिली जावी. विद्यार्थ्यांची आवड, निवड, कल, रुची याचा विचार करून त्यांना शिक्षण मिळाले पाहिजे. विद्यार्थ्यांचा फक्त गुणांचा आकडा मोठा होऊन चालणार नाही तर त्यांचे चारित्र्य घडवले जावे. “शिक्षक हे विद्यार्थ्यांचे पाठ्यपुस्तक असावेत’ हा गांधीजींचा विचार म्हणजे शिक्षकांची कर्तव्ये काय असावीत, शिक्षक कसा असावा हे स्पष्ट करणारा आहे. शाळेत विद्यार्थ्यांचे पालक शिक्षकच असतात तेव्हा फक्त पाठ्यपुस्तक शिकवणे हा हेतू नसावा. त्याच्या बाहेर जाऊन आदर्श मूल्ये मुलांमध्ये रुजवावी हे गांधीजींना अपेक्षित होते. प्रत्येक विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन त्याला योग्य न्याय शिक्षकाकडून मिळायला हवा. विद्यार्थी चुकत-चुकत शिकत असतात त्यामुळे विद्यार्थ्यांना गैरवर्तन केल्यास शारीरिक शिक्षा देणे चुकीचे आहे. विद्यार्थ्यांना सुधारण्याच्या अनेक पद्धती त्यांनी स्वतः शोधून काढल्या. विद्यार्थी गैरवर्तन करतात यात त्यांनी शिक्षकांना दोषी मानले. शिक्षकांनी आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे, असे गांधींचे मत होते. आजचे विद्यार्थी उद्याचे देशाचे नागरिक आहेत त्यामुळे त्यांनी जबाबदारीने वागले पाहिजे. आपल्या देशात आदर्शाची कमी नाही. विद्यार्थ्यांनी त्यांचे आदर्श स्वतः निवडून चांगले गुण आचरणात आणावेत. जात-धर्म, अस्पृश्यता, भेदाभेद मानू नये. विद्यार्थ्यांनी सहकार्याची वृत्ती ठेवावी. रुग्णांची सेवा करावी. शिक्षणाचा प्रसार करावा. सगळीकडे स्वच्छता ठेवावी. समाज उपयोगी कामात अग्रेसर राहावे. नवीन ज्ञान मिळवत राहून मिळवलेल्या ज्ञानाचा वापर फक्त स्वतःसाठी न करता समाजासाठी करावा. अहिंसेचे पालन करावे. प्रत्येकाचा आदर करावा. व्यसनापासून स्वतःला दूर ठेवावे. अशी विद्यार्थ्यांची कर्तव्ये गांधीजींनी सांगितले आहेत. आज वाढलेली बेरोजगारी पाहता शिक्षण कार्याभिमुख असले पाहिजे हा गांधीजींचा विचार किती काळानुरूप आहे हे पटते. 2020च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शिक्षणाच्या व्यावसायिकीकरणाला अधिक महत्त्व देण्यात आले आहे, तेव्हा गांधीजींचे शैक्षणिक विचार आजही किती काळसुसंगत आहेत याचा प्रत्यय येतो. आज गांधीजींच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या विचारांचा वारसा आपण जपला तर समाजाच्या पर्यायाने देशाच्या प्रगतीत हातभार लागेल, यात दुमत असण्याचे कारण नाही.