– प्रा. डॉ. जयसिंग गाडेकर दशक्रियाविधी हा एक धार्मिक व भावनिक विधी आहे आणि सध्याच्या काळात आपण त्याला बाजारीकरणाकडे जाण्यापासून थोपवायला हवे. दशक्रिया विधी हा सोळा संस्कारांपैकी शेवटचा आणि महत्त्वाचा संस्कार आहे. दशक्रिया विधी हा केवळ धार्मिकच नाही तर भावनिक विधी आहे. दशक्रिया विधीमध्ये खरे महत्त्व असते ते पिंडदान विधीला. पुढे त्यामध्ये प्रवचन सेवा, श्रद्धांजली भाषणे आणि शेवटी पसायदान असे स्वरूप आले आणि ते रूढ झाले. सद्यस्थितीत गावोगावी दशक्रिया विधीमध्ये श्रद्धांजलीपर भाषणांचे जणू पेवच फुटले आहे. पन्नास-साठच्या दशकात प्रवचन सेवा अत्यंत मर्यादित होती. नंतर हळूहळू ती सर्वत्र स्वीकारली गेली आणि दृढ होत गेली. दशक्रिया विधी चालू असताना आलेल्या आप्तांनी व पाहुण्यांनी करायचे काय? या प्रश्नावर काढला गेलेला प्रवचन सेवा हा अतिशय उत्तम पर्याय आहे. या प्रवचनाचे स्वागतच करायला हवे याचे कारण ज्या घरातील व्यक्तीचा स्वर्गवास झाला आहे त्या व्यक्तींचं व आप्तस्वकीयांचे आध्यात्मिक अथवा पारमार्थिक शब्दांमध्ये कोणीतरी अधिकारवाणीने सांत्वन करण्याची गरज असते आणि हे कार्य प्रवचनाद्वारे उत्तम प्रकारे साधले जाते. या प्रवचनांच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा प्रबोधनाचा वसा घेतलेल्या अनेकव्यासंगी प्रवचनकारांनी समाज प्रबोधनाचे मोठ्या प्रमाणावर कार्य केले आहे. स्मशान ही अशी एकमेव जागा आहे की जिथे माणसाला काही काळ का होईना पण वैराग्य अथवा उपरती येते. तेवढ्या काळात जर त्याला योग्य मार्गदर्शन मिळाले तर त्याच्या विचारसरणीत योग्य असा सकारात्मक बदल घडून येतो, हेही खरेच आहे. थोडक्यात सांगायचे तर प्रवचन सेवा ही दशक्रिया विधीचा एक अविभाज्य भाग बनली आहे. प्रवचनकाराने प्रवचन किती वेळ करावे याविषयी मते मतांतरे आहेत, पण ते किमान चाळीस ते पन्नास मिनिटे असावे. प्रवचनकाराने जी ओवी प्रवचनासाठी घेतली आहे तिचा भावार्थ सद्यस्थितीतील उदाहरणे देऊन स्पष्ट व्हावा यासाठी तेवढा वेळ आवश्यक आहे. अलीकडच्या काळात वाढदिवस, लग्नसमारंभ आणि विविध व्यवसायांचे उद्घाटन समारंभ या प्रसंगी शुभेच्छा देणारी राजकीय नेत्यांची आणि सामाजिक कार्यकर्त्यांची भाषणे भरपूर होतात. पण आजकाल दशक्रियांमध्ये श्रद्धांजली म्हणून दिल्या जाणाऱ्या भाषणांनी जणू कहरच केला आहे. या प्रसंगी निवेदक कोणाला भाषणाची संधी द्यावी आणि कोणाला वगळावे या चिंतेत असतो असे दिसते. कारण इतर शुभ प्रसंगांप्रमाणे याही ठिकाणी आपले नाव आपल्या पदासहित घेतले जावे अशी बऱ्याच कार्यकर्त्यांची अपेक्षा असते. या भाषणांना कंटाळून दशक्रिया विधीतून लोक उठून जात असल्याचे चित्र दिसते. यामध्ये आणखी एक महत्त्वाची बाब नमूद करावी वाटते ती अशी की मयताचे नातेवाईक आणि मित्रमंडळी ही अगदी सुरुवातीपासून दशक्रियेच्या कार्यक्रमात हजर असतात. प्रवचन सुरू झाल्यानंतर हळूहळू मान्यवरांचे आगमन सुरू होते. यात मान्यवरांची त्यामुळे सुरुवातीपासून आलेल्या आप्तांचे नाव घेतले जात नाही पण बड्या लोकांचे नाव घेण्याची अनिष्ठ प्रथा बोकाळली आहे. तसेच त्यांचे उशिरा येणे आणि लवकर जाणे या दोन्ही गोष्टी अनेकांना खटकतात हेही दिसून येते. त्यामुळे दशक्रियेचे गांभीर्य तर कमी होतेच पण ज्या सांत्वन आणि प्रबोधनाच्या उद्देशाने प्रवचन ठेवलेले आहे तो उद्देशही असफल होतो. सामाजिक कार्यकर्त्यांना याचे भान उरले आहे असे वाटत नाही. तात्पर्य हेच की, या संस्कारातील धार्मिक बाजू दूर राहून सध्या चुकीच्या दिशेला आणि दिखाऊपणाकडे झुकला आहे. त्यामध्ये अनेक विसंगती निर्माण झाल्या आहेत. काळानुसार या दोषांचे निराकरण व्हावे यातच सर्वांचे हित आहे. सध्याचा कळीचा मुद्दा एकाच आहे, तो म्हणजे या श्रद्धांजली देणाऱ्यांची संख्या किती असावी? श्रद्धांजलीमध्ये किती भाषणे असावीत या प्रश्नांचे उत्तर कमीत कमी दोन व जास्तीत जास्त तीन श्रद्धांजलीपर तीन भाषणे असावीत हे आहे. दशक्रियाच्या निमित्ताने जर पैसा किंवा वस्तुरूपाने देणगी द्यायचीच असेल तर ती गावातील जिल्हा परिषद शाळा, हायस्कूल, शाळा किंवा महाविद्यालय यांना द्यावी. मदतीची खरी गरज तिथे आहे. गावातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या परिवारातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देणे किंवा त्यांची एका वर्षापूर्वी शैक्षणिक फी भरणे या गोष्टींची सध्या खरी गरज आहे. तेव्हा दशक्रियेच्या निमित्ताने दिल्या जाणाऱ्या देणग्यांचा ओघ हा ज्ञानाच्या मंदिरांकडे वळायला हवा. दशक्रिया विधीची सांगता संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीतील पसायदानाने केली जाते. कोणत्याही चांगल्या कार्यक्रमाची सांगता विश्वात्मक देवाकडे समस्त जगाच्या कल्याणासाठी मागितलेल्या पसायदानाने करणे ही वारकरी संप्रदायाची थोर परंपरा आहे. ती इथेही कायम पाळली जावी. आजकाल बऱ्याच गावांमध्ये दशक्रियेच्या वेळी उद्भवणाऱ्या काकस्पर्श न होणे या समस्येविषयी थोडीशी चर्चा करावीशी वाटते. पूर्वीच्या काळी प्रत्येक गावात भरपूर झाडी आणि वनराई असे. गावात आंबा, कडूनिंब, चिंच, वड, पिंपळ अशी मोठी झाडे असत. स्मशानभूमी ही गावाबाहेर शक्यतो जिथे पाण्याची उपलब्धता आहे अशा पाणवठ्याच्या बाजूला असे. अशा परिसरात असणाऱ्या मोठमोठ्या वृक्षांवर सर्व पक्ष्यांसोबत कावळ्यांची संख्या देखील खूप असे. त्यामुळे पिंडास काकस्पर्श नक्की होत असे. काळानुसार लोकसंख्या वाढली, शहरीकरण वाढत गेले, गावाभोवती पक्ष्यांचे आश्रयस्थान असणारी मोठी झाडे तोडली जाऊन तेथे गृह बांधणी प्रकल्प उभे राहू लागले. अधिकाधिक क्षेत्र शेतीखाली आणण्यासाठी शेतकऱ्यांनी देखील बेसुमार झाडे तोडून जमिनीचे सपाटीकरण केले व तिथे शेतीकार्याला सुरुवात केली. यात बिचारे पक्षी मात्र बेघर झाले. चिमण्या तर शहरातून नाहीशा झाल्या आहेतच; पण गावांमधूनदेखील नाहीशा होत आहेत. गावात किंवा गावासभोवती खाण्यासाठी भक्ष्यच उपलब्ध नसल्याने कावळे त्यातही डोंबकावळ्यांची संख्या अतिशय कमी झाली. जर डोंबकावळेच गावात नसतील तर काकस्पर्श होणार कुठून? सध्या कित्येक गावात कावळेच शिल्लक राहिले नाहीत. जर काकस्पर्श व्हायला हवाच असेल, तर पक्ष्यांची आणि कावळ्यांची संख्या वाढायला हवी. त्यासाठी जाणीवपूर्वक शेकडो झाडांची लागवड, संवर्धन करायला हवे. स्मशानभूमीचा संपूर्ण परिसर वृक्षराजीने आच्छादित व्हायला हवा. कालपरत्वे होत असलेले दशक्रिया विधीचे विकृतीकरण रोखायला हवे यावर सर्वांचे एकमत असावे.