– व्हि. जे. नरवाडे 11 मे 1998 रोजी तीन आणि 13 मे 1998 रोजी दोन अशा भारताने पाच अणुचाचण्या पोखरण येथे केल्या होत्या. त्यामुळे अण्वस्त्रधारी भारतासोबत आता थेट युद्ध करण्यास चीन आणि पाकिस्तान टाळत आहे, हे या अणुचाचण्यांचे आजचे यश म्हणता येईल. पोखरणच्या रणांत 1974 साली, जेव्हा भारताने पहिला अणुस्फोट केला त्यावेळी कमालीची गुप्तता राखण्यात आली होती.तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी याबाबत विशेष दक्षता घेतली होती. चाचणी यशस्वी झाल्यावर त्याची माहिती इंदिराजींना सांकेतिक भाषेत देण्याचे ठरले. त्यासाठी “भगवान बुद्ध हसले’ हा सांकेतिक शब्द प्रयोग वापरण्यात आला. त्यावेळची चाचणी यशस्वी झाली आणि इंदिराजींना पोखरणहून लगेच फोन गेला. फोन करणाऱ्याने एकच वाक्य उच्चारले “द लॉर्ड बुद्धा हॅज स्माइल्ड’. त्यानंतर 24 वर्षांनंतर भारताने 11 मे 1998 रोजी पोखरण येथेच तीन भिन्न वैज्ञानिक पद्धतीने अणुचाचण्या केल्या. तिन्ही यशस्वी ठरल्या. तो दिवसही योगायोगाने “बुद्ध पौर्णिमे’चाच होतो. त्यामुळे त्या घटनेचे वर्णन “बुद्ध पुन्हा एकदा हसले’ असे केले गेले. त्यानंतर लगेच 13 मे 1998 रोजी भारताने पोखरणच्या वाळवंटात आणखी दोन स्फोट करून आपल्या अणुचाचण्यांचा धाडसी कार्यक्रम पूर्ण केला. अवघ्या दोन दिवसांपूर्वीच तीन चाचण्यांमुळे बसलेल्या आश्चर्याच्या धक्क्यातून जगातले अनेक देश सावरत असतानाच अण्वस्त्रधारी राष्ट्रांच्या नापसंतीची पर्वा न करता भारताने आणखी एक दणका दिला होता. त्याबाबत जगभर तीव्र साश्चर्य प्रतिक्रिया उमटली होती. अमेरिकेने भारतावर कडक निर्बंध लागू केले होते. जर्मनी आणि जपानने भारताची आर्थिक मदत थांबवण्याचा निर्णय घेतला होता. आणखी काही देशांच्या राजदूतांना मायदेशी बोलावून घेण्यात आले होते. अणुकार्यक्रम सोडून द्यावा, यासाठी पाश्चात्य देशांनी भारतावर प्रचंड दबाव आणला होता. याविषयी भारताने आपली भूमिका स्पष्ट केली होती. निःशस्त्रीकरणाच्या जागतिक पातळीवरील प्रक्रियेस भारत वचनबद्ध आहे; पण अणुचाचणी बंदी करार हा जागतिक, भेदाभेद नसलेला व सर्वसमावेशक असावा, ही भारताची भूमिका आहे. अमेरिकेने अण्वस्त्रांचे कोठार ठेवावयाचे व इतरांनी अण्वस्त्रे नष्ट करायची किंवा निर्मिती थांबवायची ही भूमिका लबाडीची व मतलबी आहे. केवळ अमेरिकेचे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न असेल, तर भारत अशा सीटीबीटी करारावर सही करणार नाही, ही भूमिका अत्यंत योग्य आहे. भारताने त्यामुळे या करारावर अद्याप सही केलेली नाही. जेव्हा भारताने हा अणुस्फोट घडवून आणला तोपर्यंत चीनने तब्बल 26 अणुचाचण्या केल्या होत्या, हे विशेष. चीनने यापूर्वीच भारताशी युद्ध लढले होते, हा धोका लक्षात घेता अण्वस्त्रधारी चीनला टक्कर द्यायची असेल तर भारतालाही अण्वस्त्रधारी होणे काळाची गरज आहे, हे ओळखूनच भारताने अणुस्फोट घडवला होता. अणुस्फोटामागे भारताचे जे हेतू होते, त्याचे स्वरूप स्पष्ट करणारे पत्र तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी अमेरिका, जपान यांच्यासह आठ राष्ट्रांच्या प्रमुखांना पाठविले होते. “आम्हाला आमच्या परिसरात गेल्या काही वर्षांत अण्वस्त्र स्पर्धेलाही तोंड द्यावे लागत आहे. आम्ही ज्या अणुचाचण्या केल्या, त्यामुळे शेजारील देशांना त्यापासून कोणताही धोका नाही’, असे वाजपेयी यांनी या पत्रात स्पष्ट केले होते. बिल क्लिंटन यांना पाठवलेल्या पत्रात वाजपेयी म्हणतात, “जगात निःशस्त्रीकरण व्हायला पाहिजे, अशी भारताची भूमिका आहे. यासाठी अमेरिकन नेत्यांच्या बरोबरीने प्रयत्न करण्याची आमची तयारी आहे.’ वाजपेयी यांनी आपल्या पत्रात चीन आणि पाकिस्तान या दोन देशांच्या नावाचा उल्लेख केला नाही, फक्त “आमच्या शेजारील देश’ एवढाच उल्लेख त्यांनी आपल्या पत्रात केला आहे. त्यांच्या संदर्भात अधिक स्पष्टीकरण देताना वाजपेयी यांनी म्हटले होते की, या देशांशी असलेल्या संबंधात गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत सुधारणा झाली असली तरी आमच्यातील सीमाप्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. त्यामुळेच गेल्या 50 वर्षांत आमच्यावर तीन वेळा आक्रमण झाले. गेल्या दहा वर्षांत आम्हाला दहशतवादी आणि गनिमी कारवायांना मोठ्या प्रमाणात तोंड द्यावे लागले आहे. या कारवायांना बाहेरचाच पाठिंबा राहिला आहे. तथापि, आमच्या देशातील जनेतचा लोकशाहीवर असलेला विश्वास, प्रखर राष्ट्रभावना या आधारावर आम्ही बाह्यशक्तींच्या मदतीवर चाललेल्या दहशतवादी आणि गनिमी कारवायांचा प्रखर बिमोड करीत आलो आहोत.’ या यशस्वी प्रयोगानंतर भारत हा एक समर्थ देश आहे, तो अण्वस्त्र संपन्न राष्ट्रातील देश आहे ह जगाला कळाले. भारताने प्रारंभापासूनच अणुचाचण्याविषयी स्पष्ट भूमिका घेतली आहे. अगदी 1948 साली देखील भारताची भूमिका स्पष्ट होती. पंडित नेहरू म्हणाले होते की, “आपण आण्विक तंत्रज्ञान शांततापूर्ण कामासाठी विकसित केले पाहिजे. देशाचे संरक्षण करण्यासाठी अणुशक्तीचा लष्करी वापर अनिवार्य ठरला, तर आम्ही मागे-पुढे पाहणार नाही.’ आज हीच भूमिका कायम आहे. 1974 मध्ये अणुचाचणी इंदिरा गांधींनी केली होती आणि 1995 मध्ये नरसिंह राव पंतप्रधान असताना चाचणीचा निर्णय झाला होता. पण त्यावेळी दडपणाने तो मागे ठेवावा लागला. मात्र तसाच विरोध कायम असतानाही 1998 मध्ये चाचण्या घडविल्या गेल्या. यात एक धाडस नक्कीच होते. भारताची भूमिका शस्त्रस्पर्धा वाढविण्याची नाही, भारताला स्वसंरक्षणासाठी सज्ज राहणे गरजेचे आहे. आम्ही चाचण्या केल्या तरी अणुबॉम्ब करून त्याचे साठा करणार नाही, अशीही भूमिका भारताची राहिली आहे. भारताची शांततावादाची भूमिका तसूभरही बदललेली नाही, हे जगाला आजही दिसते आहे. त्याचबरोबर आहे त्या परिस्थितीत आपला विकास करू शकतो, आम्ही स्वावलंबी बनू शकतो, हे भारताने अनेकवेळा जगाला दाखवून दिले आहे.