– डॉ. आश्लेषा मुंगी मराठी रंगभूमीला जवळजवळ 170 हून अधिक जास्त वर्षांची परंपरा आहे. 1843 मध्ये ‘सीता स्वयंवर’ने सुरू झालेला हा प्रवास आजही अविरत सुरू आहे. आज रंगभूमीदिन. त्या निमित्ताने… समोर लाल पडदा, त्या पहिल्या दोन घंटा, तिकिटासाठी आणि आपल्या जागेवर बसण्यासाठीची लगबग, प्रेक्षागृहात पसरलेला धूप सुगंध, नेपथ्यासाठी व्यासपीठावर होणारी दबकी हालचाल, हळू आवाजात लागलेले संगीत आणि कानावर पडते तिसरी घंटा. पडदा उघडला जातो, लख्ख प्रकाशाने स्टेज उजळतं आणि नाटकाचा पहिला अंक सुरू होतो. हे नाटक पाहणं असो नाटकात एखादी भूमिका करणे असो किंवा बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून काम करणं असो ही एक ऊर्जा देणारी कृती असते. ज्या व्यक्तीला नाटकाचे वेड लागते ना त्याला ती आयुष्यभर नशाच चढते. हो इथे मी नशा हा शब्द खूप विचारपूर्वकच वापरलाय कारण अशी वेड्यासारखी नशा असल्याशिवाय नाटकांसारख्या कलाकृतीची निर्मिती होऊ शकत नाही. मनोरंजन आणि प्रबोधन या दोन्हीही बाबी सांस्कृतिक क्षेत्राने लीलया साधल्या आहेत. यात फक्त मराठी नाटकाचा समावेश आहे असे नाही तर नृत्य, वादन, गायन विविध कलांचाही तितक्याच बरोबरीचा वाटा आहे. 1843 मध्ये मराठी रंगभूमीचा पाया रचला गेला. चिंतामणराव पटवर्धन यांच्या आश्रयात विष्णुदास भावे यांनी 5 नोव्हेंबर या दिवशी ‘सीता स्वयंवर’ या नाटकाचा प्रयोग केला आणि तिथूनच मराठी नाट्य क्षेत्राच्या पर्वाची सुरुवात झाली. 1943 मध्ये या दिवसाच्या स्मरणार्थ या क्षेत्रातील सर्व नामवंत कलाकारांनी एकत्र येऊन सांगली येथे शताब्दी महोत्सव साजरा केला. या संमेलनाचे अध्यक्ष वि. दा. सावरकर हे होते. याच दिवशी नाट्यविद्येच्या संवर्धनासाठी अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समिती स्थापन करण्यात आली. यावेळी सर्व नाट्यरसिकांच्या साक्षीने सांगलीला ठराव करून हा दिवस ‘मराठी रंगभूमी दिन’ म्हणून घोषित करण्यात आला. याच दिवशी रंगभूमीच्या प्रदीर्घ काळ सेवा करणार्या कलावंताला ‘विष्णुदास भावे पुरस्कार’ देऊन गौरवण्यात येते. स्वातंत्र्यपूर्व काळात विष्णुदास भावे यांनी एक टुरिंग थिएटर ग्रुप तयार केला. शतकाच्या उत्तरार्धात मराठी रंगभूमीवर झाशीच्या राणीचे नाटक, मल्हारराव महाराज, सवाई माधवराव इ. अशी उल्लेखनीय नाटके पाहायला मिळाली. याच काळात म्हणजे 1880 मध्ये अण्णासाहेब किर्लोस्करांच्या ‘संगीत शाकुंतल’ या कालिदासाच्या ‘अभिज्ञानकुंतलम’ या शास्त्रीय कृतीवर आधारित मराठी रंगमंचाने एक वेगळे रंगभूमीचे रूप धारण केले. अशा नाटकांच्या यशानंतर नाटक कंपन्यांची निर्मिती व्हायला सुरुवात झाली. मराठी रंगभूमीला संगीत नाटकांची नव्याने ओळख करून देऊन रंगभूमीला समृद्ध करणारे गोविंद बल्लाळ देवल, राम गणेश गडकरी, कोल्हटकर यासारख्या कलाकारांनी नाटक खूप मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलं. याच काळात बालगंधर्व, दिनानाथ मंगेशकर, केशवराव भोळे यासारख्या गायक अभिनेत्यांनी रंगभूमी संगीतमय केली. हळूहळू नाट्य संहितेमध्ये, नेपथ्यामध्ये थोडं वेगळेपण येऊ लागलं. नाटकांमध्येच दशावतार, तमाशांचाही समावेश करण्यात आला. पारंपरिक कलांचा समावेश असणारी नाटके विशेष पसंतीस पडू लागली. बशीर मोमीन, वेडात मराठे वीर दौडले सात, घाशीराम कोतवाल, भंगले स्वप्न महाराष्ट्र यासारखे नाटके व मराठी रंगभूमीला लाभलेले लेखक दिग्दर्शक जसे की विजय तेंडुलकर, विजया मेहता ही माणसे झपाटल्यासारखी विविध प्रयोग करून त्यांनी नाटक क्षेत्राला एक वेगळा आयाम दिला. अजब न्याय वर्तुळाचा, तीन पैशाचा तमाशा, तो मी नव्हेच, ती फुलराणी, वार्यावरची वरात अशी नाटके आजही नवनवीन कलाकारांना अभिनय दिग्दर्शनाचे धडे देत आहेत. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या प्रारंभी कलात्मक आणि प्रायोगिक दृष्टीने रंगभूमीकडे पाहण्याची प्रवृत्ती निर्माण झाली. प्रतिभावंत नाटककार, दिग्दर्शक, कल्पक तंत्रज्ञ, आधुनिक यांत्रिक सुविधा व अभिरुची संपन्न रसिक अशी त्या त्या काळानुसार बदलत गेली; पण नाटकाची मूळ मात्र खोल रुजतच गेली. आधुनिक नाट्यप्रयोगात प्रभावी प्रकाश योजना, रंगमंच तंत्राचा कलात्मक वापर त्या त्या प्रसंगानुसार चपखल बसणारे संगीत यामुळे नाट्य कृती ही सर्जनशीलतेचा भाग बनत गेली. विजय तेंडुलकरांचे ‘शांतता कोर्ट चालू आहे’, वसंत कानिटकरांचे ‘अश्रूंची झाली फुले’, पु. ल. देशपांडे यांचं ‘तू मला मी तुला’ यासारख्या नाटक कृतींनी नाटकांकडे वेगळ्या दृष्टीने पाहायची सवय प्रेक्षकांना लावली. यांनी सामाजिक, राजकीय विषयांवर प्रयोगशील दृष्टी टाकून कलाकृती उल्लेखनीय करून ठेवल्या. सर्वसाधारण 1970 नंतर समकालीन आणि प्रयोगशील रंगभूमीचा उदय झाला. नव्या विचारधारेचा प्रभाव नाट्यकृतींवर पडत गेला. एकांकिका, लघुरूप नाटके यांची गुणवत्तारुपी संख्या वाढू लागली. युवा नाट्य महोत्सव, नाट्य स्पर्धा आणि नाट्यसंस्था वेगाने वाढायला लागल्या त्यामुळे सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कामगिरी होऊ लागली. या पर्वाचं श्रेय नाटककार आणि कलाकार महेश एलकुंचवार, सतीश आळेकर, चंद्रकांत कुलकर्णी, मोहन आगाशे, नाना पाटेकर, मकरंद देशपांडे या आणि यासारख्यांना जातं. आज नाट्यकला फक्त मनोरंजनापुरते राहिलेले नाही. सामाजिक वास्तव, मानसिक ताण, नातेसंबंधांमधील गुंतागुंत, स्त्री पुरुष समानता यासारखे विषयसुद्धा नाट्यरूपात येऊ लागले आहेत. पारंपरिक रंगमंचाऐवजी छोट्या जागेत, खुल्या प्रांगणातही प्रयोगशील नाट्यप्रयोग होताना दिसत आहेत. या क्षेत्राकडे तरुणाईचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलतोय. दिग्दर्शन, अभिनय, संगीत, लेखन इत्यादी सारख्या क्षेत्रात डिग्री प्राप्त करून करिअर करण्याकडे वळणारा वर्गही सध्या वाढतो आहे. ओटीटी आणि सोशल मीडियाच्या जगात प्रेक्षकही नाट्यगृहात जाऊन कलाकृतीचा आनंद घेण्याकडे वळत आहे. ऑनलाइनद्वारे नाट्यकृती पाहता येत असल्याने परदेशातही याची आवड जोपासणे सोपे झाले आहे. अर्थात दुसरा कंगोरा या क्षेत्राचा तितकाच विचार करायला लावणारा आहे की, नाटके टिकवण्यासाठी निर्मात्यांना आर्थिक स्थैर्य आणि प्रेक्षकांचा सातत्यपूर्ण प्रतिसाद गरजेचा आहे. नाटक आजही विचार करायला लावते, समाजाला आरसा दाखवते आणि संवेदनशीलता शिकवते. मराठी रंगभूमी ही श्वासासारखी आहे, जी काळाच्या प्रत्येक टप्प्याशी नाळ जोडते, विचारांच्या नव्या रंगांनी नटते. ‘पळशेची विहीर’सारख्या नाटकातून स्त्री अस्तित्वाचा शोध दिसतो. मराठी रंगभूमीचा इतिहास ‘गोष्ट संयुक्त मानापमानाची’ या नाटकातून उजळून निघाला. अगदी सध्याच्या नाटकांचा उल्लेख करायचा झाला तर लीना भागवतांचं ‘आमने-सामने’ नाटक नातेसंबंध सारख्या विषयाला वेगळ्या प्रकारे स्पर्शून जाते. एका बाजूला असे संवेदनशील विषय हाताळताना दोन वाजून 22 मिनिटे सारखी भयभीत करणारे नाटके प्रेक्षकांची मने जिंकत आहेत. मोहित टाकळकर सारख्या दिग्दर्शकाने मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांमध्ये प्रयोगशील नाटकांना समृद्ध केलं. घंटा घंटा घंटा, हुंकारो सारख्या कलाकृतींना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यासारख्या खूप कलाकारांची नावे घेता येतील पण त्यातील काही म्हणजे निपुण धर्माधिकारी (देहभान, सुलतान, संध्याकाळच्या सावल्या, अमर फोटो स्टुडिओ), चंद्रकांत कुलकर्णी (वास्तव, चारचौघी), प्रसाद वनारसे (दुसरी गोष्ट, लपाछपी, अंतरा), मकरंद साटवलकर (काय बरे झालं असतं तर, कथा अकाल पिढीची), अभिजीत झुंजारराव (एका लग्नाची दुसरी गोष्ट, काय चाललंय काय?) अमित पाटील (साखर खोबरे, एक लाजरे लाडके प्रकरण) या अशा सध्याच्या काळातल्या उल्लेखनीय नाटककार दिग्दर्शकांनी नाट्य क्षेत्रात नव्या विचारांना जन्म दिला. आजकालच्या नाटकांनी केवळ मनोरंजनच नाही केलं तर प्रेक्षकांना विचार करायला शिकवलय. आज मराठी रंगभूमी नवनव्या विचारांनी, प्रयोगातून फुलते आहे. या प्रवासाला शेवट नाही कारण प्रत्येक नवीन नाटक एका नव्या विचाराला, युगाला जन्म देते. अशा या नाट्यकलेने पुन्हा पुन्हा सिद्ध केले आहे की, रंगमंच कधीच वृद्ध होत नाही, तो प्रत्येक पिढीत नव्या रूपात पुन्हा जन्म घेऊन वेगळ्या रूपात प्रेक्षक मायबाप समोर अवतरतो.