Pimpri News | मतदान केंद्रांवर ज्येष्ठ दिव्यांग मतदारांसाठी विशेष व्यवस्था

पिंपरी, (प्रतिनिधी) – चिंचवड विधानसभा मतदार संघातील ज्येष्ठ दिव्यांग व्यक्तींना मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर आणून मतदान केल्यानंतर पुन्हा घरी सोडण्यासाठी ३० ऑटो रिक्षांची व्यवस्था, १०२ मतदान केंद्रांवर प्रत्येकी दोन प्रमाणे २०४ व्हिलचेअरची व्यवस्था केली जाणार आहे. माहिती घेण्यासाठी प्रत्येक केंद्रांवर ब्रेल लिपितील मतपत्रिका ठेवली जाणार आहे. आशा सेविकांमार्फत प्रथोमोपचार पेटी देऊन प्राथमिक उपचाराची सुविधा दिली जाणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी सोमवारी (दि. १८) पत्रकार परिषदेत दिली.
चिंचवड विधानसभा मतदार संघासाठी बुधवारी (दि. २०) मतदान होत आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी दिव्यांगांचे मतदान सुध्दा बहुमूल्य ठरत असते. त्यासाठी चिंचवड विधानसभा मतदार संघातील दिव्यांग व्यक्तींना तसेच दिव्यांग ज्येष्ठ मतदारांसाठी विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर व्हीलचेअर्स व ने-आण करणेकामी स्वयंसेवक नेमले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर रॅम्प व्यवस्था केली आहे.
जनसंपर्क अधिकारी ज्या दिव्यांग व ज्येष्ठ नागरीकांना मतदानाच्या दिवशी वाहन व्यवस्थेची आवश्यकता भासेल, अशा नागरिकांनी सहायक आयुक्त श्रीनिवास दांगट (९८२२०१२६८७), सहायक नोडल अधिकारी गणेश टिळेकर (९५१९७६७०८०), इंटरप्रिटर स्मिता घबाडे (९६५७८४११७२) यांच्याशी संपर्क साधून सुविधा उपलब्ध करून घ्यावी, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी केले आहे.
अंध व्यक्तींसाठी ब्रेल लिपीत माहिती
४४४ अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील मतदार माहिती पत्रिका वाटप करण्यात आल्या आहेत. अंध मतदारांकरीता प्रत्येक केंद्रावर ब्रेल लिपीतील डमी मतपत्रिका माहितीसाठी ठेवली जाणार आहे. अंध व्यक्तींसाठी मतदान केंद्रावर भिंग (मॅग्नीफाइंग ग्लास) पुरविले जातील. ईव्हीएम मशीनवर ब्रेलमध्ये क्रमांक छापलेले असतील. ब्रेल लिपीतील मतपत्रिका वाचून त्यावरील क्रमांक लक्षात ठेवून अंध व्यक्ती स्वतःचे मत देऊ शकतील. अंध दिव्यांगांना मतदान करतेवेळी मतदान केंद्रावर बरोबर एका अठरा वर्षावरील व्यक्तीस सोबत घेऊन जाता येईल, ब्रेल लिपीमध्ये मतपत्रिका मतदान केंद्रावर वाचण्यासाठी उपलब्ध असेल.
कर्णबधिर मतदारांसाठी इंटरप्रिटरची व्यवस्था
सक्षम अॅपवर नोंदणी केलेल्या दिव्यांग नागरीकांना त्यांच्या मागणी नुसार मतदानाचे दिवशी आवश्यक सुविधा दिल्या जाणार आहेत. कर्णबधिर दिव्यांग मतदारांकरीता साइन लँग्वेजमध्ये मतपत्रिका समजून घेण्यासाठी इंटरप्रिटर असणार आहेत. ज्या ठिकाणी कर्णबधिर मतदाराला मतदान करताना अडचण येईल, अशा ठिकाणी तात्काळ इंटरप्रिटरची व्यवस्था केली जाईल. कर्णबधिर दिव्यांगाकरीता मतदान सुविधेबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, पुणे येथे हेल्पलाईन क्रमांक ९२२६३६३००२ जाहीर केला आहे. कर्णबधिर नागरिकांच्या बैठका घेवून त्यांना मतदान प्रक्रिया व हेल्पलाइनची माहिती देणेत आली आहे.





