– डॉ. आश्लेषा मुंगी भारतीय पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्यानंतर अवघ्या दोन वर्षातच चरित्रात्मक पुस्तक लिहिणार्या काशीबाई कानिटकर या पहिल्या कादंबरीकार म्हणून ओळखल्या जातात. त्यांची आज जयंती. त्यांच्या कार्याचा परिचय… मराठी साहित्यातील आरंभीच्या स्त्री कादंबरीकारांपैकी एक, मराठी भाषेतील पहिली महिला कादंबरीकार काशीबाई कानिटकर (जन्म : 19 जानेवारी 1861) या मराठी साहित्यात कादंबरी, चरित्र आणि कथा प्रकारात लेखन करणार्या पहिल्या मराठी लेखिका म्हणून गणल्या जातात. स्त्रियांना शिक्षणाची परवानगी नसलेल्या त्या काळात घरातच ऐकून व स्व प्रेरणेने लिखाण वाचन केले. अत्यंत सुखवस्तू व सुशिक्षित कुटुंबात जन्मलेल्या काशीबाईंचे वडील मामलेदार होते. तरीही भावा बहिणीमध्ये घरात लिंगभेदाला सामोरे जावे लागत असायचे. नेहमी खटकत असणारी गोष्ट म्हणजे मुलगी म्हणून वेगळी दिलेली वागणूक. भावाकडून त्यांनी शिक्षणाचे धडे घेतले. लग्नानंतर काशीबाई प्रार्थना समाजात चोरून जात. तिथे त्यांना लेख लिहिण्यास सांगितले, त्यांनी तो खूप छान पद्धतीने लिहिला. पुढे तो सुबोध पत्रिकेत छापूनही आला. त्यांच्या या साक्षर मोहिमेला सर्वांचा विरोध होता. परंतु तरीही त्या संस्कृत इंग्रजीचा अभ्यास रात्री व पहाटे उठून करत. 1886 साली काशीबाईंनी कादंबरी लिहिण्यास सुरुवात केली. मनोरंजन व निबंध चंद्रिका या मासिकातून 1892 सालापर्यंत त्या कादंबरीचे 36 भाग प्रकाशित झाले आणि 1903 साली ती कादंबरी पुस्तक रूपाने प्रकाशित झाली. या सर्व प्रवासात हरि नारायण आपटे सारख्या प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाची व गोविंदरावांची हक्काची साथ त्यांना मिळाली. काशीबाईंच्या मताला ते मान देत असत. गोविंदरावांना ज्या ज्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले जाईल तिथे ते काशीबाईंनाही सोबत नेत. पुढे गोविंदरावांच्या निधनानंतर काशीबाई बनारस हिंदू विद्यापीठात मराठी शिकवू लागल्या. रमाबाई रानडे यांच्या बरोबरीने काशीबाईंनी सेवा सदनाच्या कार्यात भाग घेतला. पंडिता रमाबाई यांच्या बरोबर काँग्रेसच्या दुसर्या अधिवेशनाला हजर असणार्या आठ महिला सदस्यांपैकी महाराष्ट्रातील एकमेव हिंदू महिला काशीबाई उपस्थित होत्या. वसंत व्याख्यानमालेतील भाषणाचे अध्यक्ष पद स्त्रीने भूषवण्याची परंपरा इथूनच सुरू झाली. ‘रंगराव’ ही त्यांची एक महत्त्वाची कादंबरी होय, ज्यात त्यांनी सांसारिक जीवनाचे चित्रण केले आहे. स्त्री शिक्षणाची गरज अधोरेखित केली आहे. त्यांनी आपल्या लेखनाद्वारे स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. मराठी साहित्य विश्वात काशीबाई कानिटकर यांचे नाव घेतले की स्त्री मनाचा संयमित पण ठाम आवाज आठवतो. ज्या काळात त्यांनी लेखन केले त्या काळात स्त्रीसाठी घराची चौकट समाजाने आखून दिली होती. घरातल्या जबाबदार्या इतकंच तिचं भावविश्व असायचं असं असतानाही त्यांच्या लेखनातून स्त्रीची असहाय्य प्रतिमा कधीच उमटली नाही. ती नेहमीच अंतर्मनात सकारात्मक बदलाची बीजे पेरणारी स्त्री दिसली. आजची आधुनिक स्त्री या सर्व बदलांचा परिपाक आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय, कला, प्रशासन सर्व क्षेत्र पादाक्रांत करणारी स्त्री तिच्या स्वाभिमानाचा आधार बनली आहे. आजची आधुनिक स्त्री त्यांनी लिहिलेल्या शब्दांना कृतींशी धार देत आहे. त्यांचा साहित्यिक वारसा आणि आजची करिअर केंद्र स्त्री यांच्यातील नाळ स्त्रीच्या आत्मशोधाची, आत्मनिर्धाराची आणि सशक्ततेची कथा सांगते. काळ बदलला तरीही स्त्रीच्या वाट्याला आजही संघर्ष आहेच. त्याचे स्वरूप बदलले पण मागे अजूनही आहेत सामाजिक उपेक्षा, टीका, मानसिक दडपण, करिअर ताण हे सारे प्रश्न आजही स्त्रियांच्या वाट्याला येत आहेत. इथे काशीबाईंच्या साहित्यातील अर्थपूर्णता लक्षात येते. त्यांच्या लेखनातील स्त्री जशी शांतपणे पण ठामपणे आपले अस्तित्व सिद्ध करते तशीच आजची स्त्री शांतपणे आपला मार्ग शोधत आहे. काशीबाई कानिटकरांनी ज्या स्त्री अंतर्मनाला शब्दबद्ध केले त्या शब्दाचेच आज स्वप्न साकार होताना दिसत आहे. आजची आधुनिक स्त्री करिअरच्या वाटेवर उभे राहून केवळ परिस्थितीशी जुळवून घेणारी नाही तर परिस्थिती बदलण्याचे धैर्य बाळगणारी आहे. 30 जानेवारी 1948 रोजी पुण्यात त्यांचे निधन झाले. काशीबाईंच्या साहित्याने सजवलेला आत्मसन्मान, विचार स्वातंत्र्य आणि मूक बंडखोरीचा वारसा आज आधुनिक स्त्रीच्या कृतीतून उतरत आहे. म्हणूनच काळ बदलला तरी स्त्रीच्या स्वप्नांना दिशा देणारा काशीबाई कानिटकर यांचा विचार आजही तितकाच अर्थपूर्ण, प्रेरणादायी आणि काळाच्या पुढे जाणारा आहे.