विशेष : बालमजुरीमुक्त बालपण
आपल्या आसपास किती मुले शाळेबाहेर आहेत? किती मुले बालमजूर म्हणून काम करीत आहेत? या प्रश्नांची उत्तरे शोधून आज ‘जागतिक बालकामगार विरोधी दिनी’ (World Day Against Child Labour) कृती करण्याची आवश्यकता आहे.

– दिपाली कांबळे
World Day Against Child Labour : आपल्या आसपास किती मुले शाळेबाहेर आहेत? किती मुले बालमजूर म्हणून काम करीत आहेत? या प्रश्नांची उत्तरे शोधून आज ‘जागतिक बालकामगार विरोधी दिनी’ (World Day Against Child Labour) कृती करण्याची आवश्यकता आहे.
प्रत्येक मुलाच्या हातात पुस्तक असावे, कामाचे ओझे नव्हे, ही केवळ एक घोषणा नसून आधुनिक समाजाच्या नैतिक जबाबदारीची जाणीव आहे. तरीही आज जगभरातील कोट्यवधी मुले शिक्षण, खेळ आणि आनंदी बालपणापासून वंचित राहून मजुरी करीत आहेत. या गंभीर समस्येकडे (World Day Against Child Labour) जगाचे लक्ष वेधण्यासाठी दरवर्षी 12 जून हा दिवस ‘जागतिक बालकामगार विरोधी दिन’ म्हणून पाळला जातो.
आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने (आयएलओ) 2002 पासून या दिनाची सुरुवात केली. बालकामगारांच्या समस्येविषयी जागरूकता निर्माण करणे आणि बालमजुरीचे उच्चाटन करण्यासाठी सरकार आणि समाजाला प्रेरित करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
जेव्हा एखादे मूल शाळेऐवजी कारखान्यात, हॉटेलमध्ये, बांधकामाच्या ठिकाणी किंवा घरगुती कामांमध्ये गुंतलेले दिसते, तेव्हा त्याच्या बालपणावर अन्याय होत असतो. बालमजुरी ही केवळ आर्थिक समस्या नाही; ती मानवी हक्कांचे उल्लंघन, सामाजिक अन्याय आहे.
आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आणि युनिसेफच्या संयुक्त अहवालानुसार, जगभरात सुमारे 16 कोटी मुले बालमजुरीमध्ये गुंतलेली आहेत. यापैकी अनेक मुले धोकादायक आणि आरोग्यास अपायकारक कामे करतात. खाणकाम, बांधकाम, शेती, घरगुती कामे, वीटभट्ट्या, कारखाने आणि रस्त्यावरील व्यवसाय अशा विविध क्षेत्रांत बालमजूर आढळतात. आफ्रिका आणि आशिया खंडांमध्ये बालमजुरीचे प्रमाण तुलनेने अधिक आहे.
भारतामध्ये बालमजुरी ही दीर्घकाळापासून सामाजिक आणि आर्थिक आव्हान (World Day Against Child Labour) राहिली आहे. 2011 च्या जनगणनेनुसार देशात सुमारे 1 कोटीहून अधिक बालकामगार होते. ग्रामीण भागात शेती, विटभट्ट्या, कुटीर उद्योग, तर शहरी भागात हॉटेल्स, चहाच्या टपर्या, गॅरेज, घरगुती कामे आणि लहान उद्योगांमध्ये बालमजूर दिसून येतात. अनेक मुले शिक्षण अर्धवट सोडून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काम करतात.
बालमजुरीची कारणे बहुआयामी आहेत. गरिबी हे त्यातील सर्वात महत्त्वाचे कारण मानले जाते. जेव्हा कुटुंबाचे उत्पन्न अपुरे असते, तेव्हा मुलांना कामावर पाठविणे हा काही पालकांसाठी जगण्याचा पर्याय बनतो. शिक्षणाचा अभाव, बेरोजगारी, सामाजिक विषमता, स्थलांतर, कर्जबाजारीपणा आणि नैसर्गिक आपत्ती यांसारखे घटकही बालमजुरीला चालना देतात. काही उद्योगांमध्ये कमी मजुरीत काम करून घेण्यासाठी मुलांचा वापर केला जातो. मुलांचे हात लहान असल्याने काही विशिष्ट कामांसाठी ते उपयुक्त असल्याचा गैरसमजही काही ठिकाणी आढळतो.
समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर बालमजुरी ही केवळ वैयक्तिक किंवा कौटुंबिक समस्या नसून सामाजिक संरचनेतील असमानतेचे परिणाम आहे. कार्ल मार्क्स यांच्या संघर्ष सिद्धांतानुसार आर्थिक संसाधनांचे असमान वितरण शोषणाला जन्म देते. बालमजुरी हे त्याचे एक उदाहरण आहे. गरीब कुटुंबातील मुले स्वस्त मजूर म्हणून वापरली जातात, तर त्याच वयोगटातील आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबातील मुले शिक्षण आणि कौशल्यविकासाच्या संधींचा लाभ घेतात. परिणामी सामाजिक विषमता पिढ्यान्पिढ्या टिकून राहते.
बालमजुरीचे परिणाम अत्यंत गंभीर असतात. धोकादायक कामांमुळे अपघात, शारीरिक दुखापती आणि दीर्घकालीन आजार होण्याचा धोका वाढतो. मानसिक तणाव, भीती आणि असुरक्षिततेमुळे त्यांच्या भावनिक विकासावरही परिणाम होतो. बालपणातील शोषणामुळे अनेक मुलांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होतो आणि भविष्यातील संधी मर्यादित होतात.
बालमजुरी रोखण्यासाठी भारतात विविध कायदे अस्तित्वात आहेत. बालकामगार (प्रतिबंध आणि नियमन) दुरुस्ती कायदा, 2016 अंतर्गत 14 वर्षांखालील मुलांना रोजगार देण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच 14 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांना धोकादायक उद्योगांमध्ये काम करण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय मोफत आणि सक्तीचे शिक्षण हक्क कायदा, 2009, किशोर न्याय कायदा, बंधमुक्त मजूर प्रणाली (उच्चाटन) कायदा यांसारखे कायदेही बालहक्कांच्या संरक्षणासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.
भारतीय राज्यघटनेतही बालकांच्या संरक्षणाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. राज्यघटनेतील कलम 24 नुसार 14 वर्षांखालील मुलांना कारखाने, खाणी आणि इतर धोकादायक उद्योगांमध्ये काम करण्यास मनाई आहे. कलम 21-अ अंतर्गत शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकार म्हणून मान्य करण्यात आला आहे. तसेच राज्याच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची जबाबदारी राज्यावर सोपविण्यात आली आहे.
शिक्षण हे बालमजुरीविरोधातील सर्वात प्रभावी शस्त्र आहे. जेव्हा मुलांना दर्जेदार आणि सर्वसमावेशक शिक्षण उपलब्ध होते, तेव्हा त्यांना रोजगारासाठी लहान वयात काम करण्याची गरज कमी होते. शाळांमधील पोषण आहार योजना, शिष्यवृत्ती, मोफत पाठ्यपुस्तके आणि इतर शैक्षणिक सुविधा यामुळेही बालमजुरी कमी करण्यास मदत होते.
विशेषतः वंचित, आदिवासी, स्थलांतरित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे. जागतिक बालकामगार विरोधी दिन हा केवळ एक औपचारिक दिवस नाही; तो समाजाला आत्मपरीक्षण करण्याची संधी आहे.






