नागपूर : विरोधकांनी विदर्भ पाहावा, गडचिरोली जिल्ह्या पाहावा. 2014 पूर्वीचा आणि त्यानंतरचा विदर्भ यातील फरक विरोधकांना लक्षात येईल. त्यांनी विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा करावी, आम्ही त्यांना समर्पक उत्तर देऊ, असे आश्वासन हिवाळी अधिवेशाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिले आहे. विरोधीपक्ष नेतेपद देण्याचा अधिकार सरकारचा नाही तर विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींचा आहे, याचाही त्यांनी पुनर्रुच्चार केला. अशा प्रकारे हे अधिवेशनही विरोधी पक्षनेत्याशिवाय होणार असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले. दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता न नेमल्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकला. त्यासंबंधीचे पत्र विजय वडेट्टीवार यांच्या लेटरहेडवर मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. त्यावर शरद पवार पक्षाच्या नेत्यांची स्वाक्षरी नसल्यामुळे त्याचा वेगळा अर्थ आम्ही काढणार नाही, पण शरद पवार पक्षाची त्या पत्रावर सही नाही, हे लक्षात आणून देत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुरुवातीलाच टोला लगावला. फडणवीस म्हणाले, 2014 पूर्वीचा आणि आताचा विदर्भ बघावा. त्यांच्या ब्रम्हपुरीजवळचा गडचिरोली जिल्हा त्यांनी बघावा. सिंचन, रस्ते, पायाभूत सोयीसुविधा यामध्ये काय बदल घडला हे त्यांनी बघावे. तसेच राज्य दिवाळखोर झाले हे दाखवण्याची घाई झाली आहे. राज्याची आर्थिक स्थितीची ओढाताण चालली असल्याचे मान्य करत मुख्यमंत्री म्हणाले की, राज्याची आर्थिक स्थिती ओढताणीची चालली असली तरी राज्य दिवाळखोरीत चाललेले नाही. किंबहुना देशाच्या मोठ्या राज्यांमध्ये आजही निकषांमध्ये चालणारी अर्थव्यवस्था आमच्या सरकारची आहे, असा दावा त्यांनी केला. आमच्याकडे खूप पैसे आहेत, असा आमचा दावा नाही. ज्या योजना हाती घेतल्या आहेत. त्या पूर्ण करण्याकरता जेवढे पैसे लागतात ते आम्ही देत आहोत. दुसरीकडे 90 लाख शेतकरी पूरबाधित आहेत. त्यातील 92 टक्के पूरबाधित शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे. 8 टक्के शेतकऱ्यांपर्यंत अजून मदत पोहोचली नाही. त्यांची संख्या 12 लाखांपर्यंत आहे. ज्या 8 टक्के शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, त्यांचा केवायसीचा प्रश्न आहे. त्यातील अर्ध्या शेतकऱ्यांचा केवायसीचा प्रश्न सोडवला असल्याचाही दावा मुख्यमंत्र्यांनी केला.