प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना तयार झाली असून, पुढील चार दिवसांत ती नगरविकास विभागास सादर केली जाणार आहे. मात्र, या प्रभाग रचनेत भाजपला झुकते माप मिळाल्याने भाजपच्या काही माजी पदाधिकाऱ्यांनी आपले प्रभाग सुरक्षित केल्याची शहरात जोरदार चर्चा आहे. त्यामुळे महायुतीत भाजपसोबत असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गोटांत कमालीची नाराजी पसरली आहे. त्यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे प्रभाग रचनेसाठी या दोन्ही पक्षांच्या राज्याच्या नेतृत्वांनी भाजपचे स्थानिक पदाधिकारी, तसेच महापालिका प्रशासनाशी चर्चा केल्यानंतरही त्यांना दूर ठेवण्यात आले असल्याचे या दोन्ही पक्षांचे पदाधिकारी खासगीत सांगत असल्याने महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.राज्य शासनाने दिलेल्या वेळापत्रकानुसार पुणे महापालिकेचे १६५ सदस्य संख्येनुसार ४२ प्रभाग तयार होणार आहेत. यामध्ये ३९ प्रभाग चार सदस्यीय आणि ३ प्रभाग तीन सदस्यांचे केले असल्याची चर्चा आहे. प्रभाग छोटा असल्याने, तसेच आपल्याला आवश्यक भागच घेतल्याने निवडून येण्यासाठी हा घाट घातला जात असल्याची चर्चा आहे. त्यात सोमवार पेठ- रास्ता पेठ भागांत तीन सदस्यीय प्रभाग तयार झाल्याची चर्चा आहे. येथे भाजपचे माजी पदाधिकारी निवडणुकीच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. मार्केट यार्ड-सॅलसबरी पार्क परिसरात तयार झालेल्या दुसऱ्या तीन सदस्यीय प्रभागातून डायस प्लॉट झोपडपट्टी वगळल्याने आरक्षण टळण्याची शक्यता व भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांसाठी हे अनुकूल ठरत असल्याचे बोलले जात आहे. तिसरा तीन सदस्यीय प्रभाग मगरपट्टा भागात तयार झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. स्थानिक पातळीवर चर्चाच नाही.. महापालिकेच्या प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर महायुतीतील घटक पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये एकत्रित चर्चेसाठी बसण्याबाबत हालचाली झाल्या. मात्र, त्यानंतर भाजपकडून त्यांच्याशी कोणताही संपर्क साधला नसल्याचा आरोप केला जात आहे. असा प्रकार होत असल्याबाबत राष्ट्रवादी, तसेच शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आपल्या नेत्यांना कल्पना दिली. त्यानंतर राज्यातील नेत्यांनी त्याबाबत प्रशासनाशी चर्चा केल्याचे बोलले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात प्रभाग रचनेत या दोन्ही पक्षांना ठेंगा दाखवत भाजपसाठीच ती सोयीचे केली जात असल्याचे आरोप केले जात आहेत. याबाबत महापालिका प्रशासनाकडून कोणताही खुलासा न देता या केवळ चर्चाच आहेत, असे सांगत वेळ मारून नेण्याचा प्रकार सुरू आहे, असे या दोन्ही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे मत आहे. याबाबत वरिष्ठांकडे तक्रारही केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.