SpaceX : स्पेसएक्सच्या रॉकेटची चंद्रावर धडक; व्हायरल व्हिडिओ ‘बनावट’, आता खऱ्या फोटोची प्रतीक्षा
SpaceX : स्पेसएक्सच्या फाल्कन-9 रॉकेटचा वापर संपलेला भाग चंद्रावर आदळला. या घटनेचा व्हायरल व्हिडिओ बनावट असल्याचे स्पष्ट झाले असून, खरे फोटो नासा आणि दक्षिण कोरियाच्या ऑर्बिटरकडून लवकरच मिळण्याची शक्यता आहे.

SpaceX : स्पेसएक्सच्या फाल्कन-9 रॉकेटचा वापर संपलेला एक भाग चंद्रावर आदळला आहे. ही घटना 5 ऑगस्ट रोजी घडली. मात्र या धडकेचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ खरा नसून, तो कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) मदतीने तयार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
हे रॉकेट जानेवारी 2025 मध्ये दोन चंद्र मोहिमांसाठी प्रक्षेपित करण्यात आले होते. काम पूर्ण झाल्यानंतर रॉकेटचा वरचा भाग अवकाशातच राहिला होता. नंतर चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे तो सुमारे 8,690 किलोमीटर प्रतितास वेगाने चंद्रावर जाऊन आदळला.
— Elon Musk (@elonmusk) August 6, 2026
ही धडक प्रत्यक्ष पाहण्याची अनेकांना उत्सुकता होती. मात्र धडक चंद्राच्या अशा भागात झाली, जिथे त्या वेळी सूर्यप्रकाश होता. त्यामुळे दुर्बिणीतूनही ती दिसू शकली नाही. धडकेचा प्रकाश किंवा धुळीचा ढगही कोणालाही पाहता आला नाही.
धडकेनंतर एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ अनेकांनी खरा समजून शेअर केला. मात्र नंतर तो बनावट असल्याचे स्पष्ट झाले. स्पेसएक्सचे प्रमुख Elon Musk यांनीही हा व्हिडिओ AI तयार केलेला असल्याचे मान्य केले.
दरम्यान, चिलीतील एका वेधशाळेने धडकेनंतर काही संकेत नोंदवले असून त्यामुळे धडक झाल्याची खात्री मिळाली आहे. आता नासाचे आणि दक्षिण कोरियाचे चंद्राभोवती फिरणारे ऑर्बिटर या ठिकाणाचे फोटो घेणार आहेत. त्यामुळे या धडकेमुळे तयार झालेला नवीन खड्डा आणि त्याचे खरे फोटो लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.





