बीजिंग : अंतराळातील काही कचरा अंतराळ यानाला धडकल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अंतराळ स्थानकातच अडकून पडलेले चीनचे ३ अंतराळवीर आज पृथ्वीवर सुखरुप परतले. शेन्झोउ-२१ अंतराळयानाचे रिटर्न कॅप्सूलमधून चेन डोंग, चेन झोंगरुई आणि वांग जी या अंतराळवीरांना घेऊन उत्तर चीनच्या इनर मंगोलिया स्वायत्त प्रदेशातील डोंगफेंग लँडिंग साइटवर उतरले, असे चीनच्या अंतराळ संस्थेने सांगितले. हे तिन्ही अंतराळवीर ५ नोव्हेंबर रोजी पृथ्वीवर परत येण्याचे नियोजन होते. मात्र अंतराळातील लहानसा पदार्थ अंतराळ यानाला धडकल्यामुळे त्यांचा परतीचा प्रवास ऐनवेळी लांबणीवर टाकावा लागला होता. अंतराळातील काही अज्ञात पदार्थ धडकल्यामुळे अंतराळ यानाला अगदी सूक्ष्म तडे गेले होते. यामुळे या अंतराळवीरांचा परतीचा प्रवास धोकादायक बनू शकला असता. त्यामुळे हा प्रवास लांबणीवर टाकावा लागला होता. चीनचे अंतराळ यान २०११ मध्ये अंतराळात पाठवण्यात आले. तेंव्हापासून प्रथमच अशी घटना घडली आहे. या प्रकारामुळे अंतराळवीरांच्या सुरक्षित प्रवासाबाबत चिंता निर्माण करण्यात येऊ लागली होती. शेन्झोउ-२१ हे अंतराळ यान अंतराळ स्थानकाच्या संयोजनातून अनडॉक केले गेले आणि रिटर्न कॅप्सूल उत्तर चीनच्या इनर मंगोलिया स्वायत्त प्रदेशातील डोंगफेंग लँडिंग साइटवर बीजिंग वेळेनुसार ४:४० वाजता खाली उतरली. सर्व अंतराळवीरांची प्रकृती चांगली आहे. त्यांनी २०४ दिवस कक्षेत घालवले होते, त्यामुळे चिनी अंतराळवीरांमध्ये कक्षेत सर्वात जास्त काळ राहण्याचा एक नवीन विक्रम प्रस्थापित झाला.