India Alliance – इंडिया या विरोधी ( India Alliance ) पक्षांच्या देशव्यापी आघाडीची पुढील बैठक १७ ते २० डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता आहे. त्या बैठकीची निश्चित तारीख लवकरच जाहीर होईल. बैठकीच्या प्रमुख अजेंड्यावर आगामी लोकसभा निवडणुकीसाठीचे जागावाटप राहणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.
विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण झाल्याने इंडिया आता लोकसभा निवडणुकीच्या राजकीय महासंग्रामासाठी सज्ज होत आहे. आघाडीतील अनेक घटक पक्षांनी विविध राज्यांमधील जागावाटप लवकरात लवकर मार्गी लावण्याचा आग्रह धरला आहे.
मतदारसंघांमधील स्थितीचे आकलन, उमेदवार निवड आणि प्रचारासाठी अधिक कालावधीची उपलब्धता आदींसाठी जागावाटप निश्चिती आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. घटक पक्षांच्या आग्रहानुसार जागावाटपासाठी पाऊले उचलण्याला इंडिया प्राधान्य देणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
काही नेत्यांच्या वक्तव्यांमुळे इंडियात धुसफूस वाढल्याचे चित्र मागील काही दिवसांत पुढे आले. मात्र, सर्व आलबेल असल्याचा संदेश पोहचवण्यासाठी त्या आघाडीची आगामी बैठक महत्वाची ठरणार आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. त्या अधिवेशन काळात आघाडीमध्ये बऱ्यापैकी समन्वय असल्याचे दिसून येत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आघाडीची बैठक झाली.
त्यामध्ये अधिवेशनातील विरोधकांच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर बुधवारी इंडियाच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, काही पक्षप्रमुखांनी उपस्थित राहण्याविषयी असमर्थता व्यक्त केली. त्यामुळे बुधवारी केवळ संसदेतील पक्षनेत्यांची बैठक बोलावण्यात आली. त्या घडामोडींमधून इंडियामध्ये समन्वयाचा अभाव असल्याचेही दिसून आले. मात्र, बहुतांश पक्षप्रमुखांनी समंजस भूमिका घेत लवकरच बैठक आयोजित करण्याचे ठरवले. त्यानुसार, डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात बैठक होणार आहे.