साड्या, मिठाईचे वाटप ; कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद
सातारा (प्रशांत जाधव) – बंदोबस्ताचा कायमचा ताण आणि सणांचा आनंदही घेता येत नसल्याने त्रस्त असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी एसपींनीच गोड केली आहे. जिल्हा पोलीस दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून महिला कर्मचाऱ्यांना साड्या व मिठाईचे वाटप केले. या उपक्रमाचे पोलीस दलात कौतुक होत आहे.
पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची संधी महिलांना पोलीस दलाने दिली, असे म्हटले जात असले तरी महिला पोलिसांच्या व्यथा वेगळ्या असल्याचे अनेकदा समोर आले आहे. एक काळ ज्या व्यवस्थेने स्त्रीला घरातून बाहेर पडण्याचे स्वातंत्र्य दिले नव्हते, त्या व्यवस्थेशी संघर्ष करून स्त्री मुक्त झाली आहे. ती पोलीस दलात काम करून निर्ढावलेल्या चोरांना अद्दल घडवू लागली आहे. गल्लीबोळात शिट्ट्या घालणारी टारगट पोरं तिच्या वर्दीकडे पाहून दबकून राहत आहेत. घरात रांधणारी आता शहरात रात्री-अपरात्री गस्त घालत आहे.
24 तास बंदोबस्तावर तैनात रहात आहे. मुलाबाळांना घरात ठेवून पोस्टिंगच्या ठिकाणी काम करत आहे. मात्र, या खाकी वर्दीतल्या महिलांना आपल्या नोकरीत अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र, कडक शिस्त, प्रशासकीय नियमांमुळे मनातील वेदना उघड करता येत नाहीत. कामाच्या अनियमित वेळा ही सर्वात मोठी समस्या आहे. दंगली, राजकीय नेत्यांच्या सभा, सार्वजनिक उत्सवांमध्ये गर्दीवर नियंत्रण ठेवताना महिलांना पुरुष कर्मचाऱ्यांप्रमाणेच बारा-बारा तास बंदोबस्तासाठी उभे राहावे लागते. बहुतांश पोलीस ठाण्यांमध्ये महिला कर्मचाऱ्यांसाठी वेगळे विश्रांती कक्ष, स्वच्छतागृहे नसतात, तशीच ती फील्डवरही नसतात. घराजवळ पोस्टिंग असेल तर नोकरी सुसह्य असते. दूरवर पोस्टिंग असेल तर लहान मुलांना कुठे ठेवायचे, असा प्रश्न असतो.
मात्र, सातारा जिल्हा पोलीस दलात आता बदल होताना दिसत आहेत. पोलीस अधीक्षक एक महिला असल्याने महिला कर्मचाऱ्यांच्या व्यथा न सांगताच वरिष्ठांना समजत आहेत. निवडणुकीचा बंदोबस्त संपल्यानंतर लगेच आलेल्या दिवाळीतही बंदोबस्त करावा लागल्याने महिला पोलीस कर्मचाऱ्यांना घरात दिवाळीच्या फराळाचे पदार्थ तयार करता आले नाहीत. त्यामुळे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी एका सामाजिक संस्थेच्या सहकार्याने महिला कर्मचाऱ्यांना मिठाई आणि साड्यांचे वाटप केले. त्यामुळे महिला कर्मचारी सातपुते यांना धन्यवाद देत आहेत.
आनंद शब्दात सांगू शकत नाही
पोलीस दलातील नोकरीत सततच्या बंदोबस्तामुळे मानसिक तणाव निर्माण होतो. मात्र, पोलीस अधीक्षक सातपुते यांनी आमंच्या व्यथा जाणून दिलेल्या फराळामुळे आनंद झाला आहे. तो आनंद आम्ही शब्दांत सांगू शकत नाही, अशी भावना एका महिला कर्मचाऱ्याने व्यक्त केली.