प्रसिद्ध टेलिव्हिजन मालिका ‘भाभीजी घर पर हैं’ मध्ये तब्बल 5 वर्ष अनीता भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सौम्या टंडन अडचणीत सापडली आहे. फ्रंटलाइन वर्कर असल्याचे सांगत ठाण्यातील एका रुग्णालयातून करोना लसीकरण केल्याचा आरोप सध्या सौम्या टंडनवर केला जात आहे. एक ओळखपत्र समोर आले आहे.
ज्यामध्ये सौम्या टंडनचा फोटो दिसत आहे. महत्त्वाचे म्हणजे, या ओळखपत्रात सौम्या टंडन एक फ्रंट लाइन वर्कर असल्याचे नमूद केले आहे. सौम्या टंडनवर ठाणे पार्किंग प्लाझा कोविड रुग्णालयात फ्रंटलाइन वर्कर म्हणून लसीकरण करण्याचा आरोप लावण्यात आला आहे. या बातमीची दखल घेतली असून ठाणे महानगरपालिकेने म्हटलेय की, या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी केली जाईल आणि सत्य सर्वांसमोर आणले जाईल.
दरम्यान, एका वाहिनीने संपर्क साधला असता सौम्याने हे वृत्त फेटाळून लावले. ही सगळी माहिती खोटी असल्याचे सांगितले. मी ठाण्यात त्या ठिकाणाहून लस घेतलीच नाही. समोर आलेली माहिती पूर्णपणे चुकीची आहे, असा सौम्याचा दावा आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, काही दिवसांपूर्वी मीरा चोप्रावरही फ्रंटलाइन वर्कर असल्याचे ओळखपत्र घेऊन लसीचा डोस घेतल्याचे आरोप करण्यात आले होते. प्रकरण समोर आल्यानंतर अभिनेत्रीने सोशल मीडियावर हे वृत्त खोटे असल्याचं सांगितलं होतं. तसेच हे आरोप निराधार असल्याचेही सांगितले होते.
या प्रकरणात एक मोठेच रॅकेट सक्रिय असल्याचा दावा काही माध्यमांतून केला जातो आहे. त्यामुळे फ्रंटलाइन वर्कर्सची कागदपत्रे तयार करणारी एखादी टोळीच निर्माण झालीये का, अशी चर्चा आहे. अर्थात आता सगळ्यांनाच लस खुली असल्यामुळे भविष्यात असे प्रकार थांबतील असे मानायला हरकत नाही.