दक्षिणेतील कामकाजाची पद्धत बदलणार : खा. सुजय विखे

कर्जतला टंचाई आढावा बैठक; पाणी, छावण्यांबाबत पडला तक्रारींचा पाऊस

कर्जत: येत्या पाच वर्षांमध्ये आपण दक्षिणेतील कामकाजाची पद्‌धत बदलणार आहोत. प्रत्येक गावातील प्रलंबित प्रश्‍न मला लेखी स्वरूपात कळवा. ते कसे सुटतील, यासाठी आपण वैयक्तिक लक्ष घालून ते सोडवू अशी ग्वाही खा. सुजय विखे पाटील यांनी दिली. कर्जत तालुका टंचाई आढावा बैठकीत अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते.

या बैठकीत पिण्याचे पाणी, टॅंकर व छावण्यांबाबतच्या तक्रारींचा पाऊस पडला. खा. विखे पुढे म्हणाले, शासन आपल्या दारी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्यास लोकांचे प्रश्‍न तातडीने मार्गी लागून अधिकारी व लोकांचा संपर्क वाढेल. या बैठकीत जनावरांच्या छावण्या, पाण्याचे टॅंकर, रोजगार हमी योजना, कर्जतचा पाणी व वीज प्रश्‍न, सामाजिक वनीकरण विभागाची कामे याबाबत चर्चा झाली. सध्या 84 टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र मंजूर खेपा वेळेवर व नियमित होत नसल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या. भीमा नदीतील पाणी संपल्यामुळे कर्जत शहराला गेल्या पंचवीस दिवसांपासून पाणी नाही. कर्जतला पाणी पुरवठा करण्यासाठी 18 टॅंकर मंजूर केले आहेत. पण याचा ठेका दिलेल्या संस्थेकडे टॅंकर उपलब्ध नसल्याने कर्जतला फक्त दोन टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे. कर्जत तालुक्‍यातील विविध ठिकाणी वृक्ष लागवड करण्याचा निर्णय अनेक ग्रामपंचायती व विविध संस्थांनी घेतला आहे. सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहकार्य करीत नसल्याच्या तक्रारीही यावेळी करण्यात आल्या.

या बैठकीस नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे, जिल्हा बॅंकेचे बॅंकेचे संचालक अंबादास पिसाळ, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, भाजपचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, माजी जिल्हा परिषद सदस्य शांतीलाल कोपनर, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष धनराज कोपनर, पंचायत समितीच्या सभापती साधना कदम, उपसभापती प्रशांत बुद्धिवंत, पंचायत समिती सदस्य राजेंद्र गुंड, शिवसेनेचे तालुकाप्रमुख दीपक शहाणे, युवा नेते दादासाहेब सोनमाळी, स्वप्नील देसाई, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रकाश शिंदे, राशीनचे उपसरपंच शंकर देशमुख, रिपाइंचे तालुकाध्यक्ष संजय भैलुमे, शहराध्यक्ष सागर कांबळे, नगरसेवक बापूराव नेटके, सचिन सोनमाळी, निता कचरे यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


छावण्यांचे 31 कोटी पडून

कर्जत तालुक्‍यात 97 छावण्या सुरू आहेत. छावणी चालकांना होत असलेल्या त्रासाचा या बैठकीत उहापोह झाला. ऑनलाईन पद्धत, रोज बदलणारे नियम, बारकोड पद्धत, बिल मंजूर करण्यासाठी 10 अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून ऑडिट, विविध प्रकारच्या तपासण्या या प्रकारांमुळे छावणी चालक वैतागले आहेत. बिले काढण्याच्या किचकट प्रक्रियेमुळे कर्जत तालुक्‍यातील छावणी चालकांना बिलापोटी वाटप करण्यासाठी आलेले 31 कोटी 5 लाख 49 लाख रूपये टंचाई विभागाकडे पडून आहेत. ही बिले त्वरित अदा करण्याबाबत खा. विखे यांनी तहसील कार्यालयात एक स्वतंत्र टंचाई विभाग निर्माण करण्याच्या व छावणी चालकांचे प्रश्‍न सोडविण्याच्या सूचना दिल्या. याबाबत मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.