South Korea : दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांना पोलिसांकडून तिसऱ्यांदा समन्स

सेऊल : दक्षिण कोरियाच्या पोलिसांनी या आठवड्याच्या शेवटी अध्यक्षीय सुरक्षा सेवेच्या प्रमुखांना चौकशीसाठी बोलावले आहे. महाभियोगाचा ठराव मंजूर करण्यात आलेले निलंबित अध्यक्ष यून सुक येओल यांना ताब्यात घेण्यापासून तपासकर्त्यांना रोखल्याच्या आरोपांवरील हे तिसरे समन्स आहे. अध्यक्षांच्या सुरक्षा सेवेचे प्रमुख पार्क चोंग-जून यांच्यावर अधिकृत कर्तव्यात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यून यांना ताब्यात घेण्याचे वॉरंट अंमलात आणण्यापासून भ्रष्टाचार तपास अधिकाऱ्यांना अध्यक्षांच्या सुरक्षा सेवेच्या अधिकाऱ्यांनी रोखले होते. तब्बल 6 तास तपास पथकाचे अधिकारी यून यांच्या निवासस्थानाबाहेर ताटकळत थांबल्यानंतरही सुरक्षा सेवेच्या कर्मचाऱ्यांनी तपास पथकाला घरात प्रवेश मिळू दिला नव्हता.पोलिसांनी पार्क यांना ताब्यात घेण्यासाठी वॉरंटची मागणी केली जाण्यापुर्वी बजावण्यात आलेले हे तिसरे आणि अंतिम समन्स असण्याची शक्यता आहे.
गेल्या महिन्यात ३ डिसेंबर रोजी यून यांनी अल्पकालीन मार्शल लॉ लागू केल्याबद्दल त्यांच्यावर बंडखोरी आणि सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या आरोपांचा सामना करणारे यून, चौकशीसाठी तीन समन्सकडे दुर्लक्ष केल्यानंतर अटकेचा सामना करणारे पहिले विद्यमान अध्यक्ष बनले आहेत.





